शिक्षण मंत्रालय
13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा एक भाग म्हणून आयआयटी मुंबईने आयोजित केली ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठांची परिषद
जैव-इंधन, कमी किंमतीचे बॅटरी तंत्रज्ञान यामुळे वाहतूक क्षेत्रात परिवर्तन सुरु - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
ई-मोबिलिटीत क्रांती घडविणारे अभिनव संशोधन करण्याचे आयआयटींना आवाहन
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2021 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2021
आयआयटी मुंबई येथे आज इलेक्ट्रिक मोबिलिटी या विषयावरील ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठांच्या तीन दिवसीय आभासी परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.यावर्षी तेराव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषद अंतर्गत भारत आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांचा हा एक भाग आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका येथील अठरा तज्ञ आगामी तीन दिवसांत वाहतूक व्यवस्थापन, हायड्रोजन तंत्रज्ञान, संकरित वाहने, लिथियम-आयन बॅटरी आणि ई-मोबिलिटीआणि जीवनमान यांच्यातील संबंध इत्यादी इलेकट्रीक मोबिलिटीच्या विविध पैलूंबद्दल चर्चा करतील.या परिषदेत पाच सदस्य देशांच्या ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठातील 100 हून अधिक विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
उद्घाटनपर भाषण करताना भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की, ट्रक ते ई-रिक्षा, सायकली, ई-कार्ट्स आणि ई-फूड स्टॉल्सपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये जैव-इंधनाच्या वाढत्या वापरामुळे भारतातील वाहतूक क्षेत्रात वेगाने परिवर्तन होत आहे.कमी किमतीच्या बॅटरी तंत्रज्ञानाच्या बाबतीतही देशाने बरीच प्रगती केली असल्याचे ते म्हणाले.हे परिवर्तन केवळ शाश्वत पर्यावरण आणि आरोग्यासाठीच चांगले नाही तर देशातील उपजीविकेचे नवे मार्गही खुले करीत आहे.ई-मोबिलिटीत आणखी क्रांती आणण्यासाठी , श्री गडकरी यांनी देशातील आय.आय.टी. ना नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन करण्याचे आवाहन केले. या क्षेत्रामध्ये ब्रिक्स देशांमध्ये अधिकाधिक संशोधन सहकार्य करावे, असेही मंत्र्यांनी सांगितले.
भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव श्री. अमित खरे यांनी अपेक्षा व्यक्त केली की, ब्रिक्स देशांमधील उत्तम विचारांमधील या सुसंवादांमुळे शास्त्रोक्त ज्ञान निर्मिती होईल ज्यायोगे प्रत्येक सदस्य देशाला शाश्वत आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या प्रयत्नांच्या माहितीचा फायदा होईल. त्यांनी ब्रिक्स शिक्षण प्रवाहांतर्गत येणाऱ्या कार्यक्रमांच्या आगामी कामकाजाविषयीही माहिती दिली. यात ,या महिन्यात 29 तारखेला ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठांच्या नियामक मंडळाची बैठक,2 जुलै रोजी शिक्षणाशी संबंधित ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आणि 6 जुलै रोजी ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक यांचा समावेश आहे.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1727752)
आगंतुक पटल : 277