वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जीआय अर्थात भौगोलिक निर्देशक म्हणून प्रमाणित घोलवड सपोटा चिकूंची महाराष्ट्राकडून इंग्लंडकडे निर्यात सुरु

Posted On: 19 MAY 2021 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2021

जीआय अर्थात भौगोलिक निर्देशक म्हणून प्रमाणित असणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देत, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चिकू- 'डहाणू-घोलवड सपोटा' आज इंग्लंडकडे रवाना करण्यात आले.

घोलवड सपोटाचे जीआय प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाकडे असून, अनोखी मधुर चव ही या फळाची विशेष ओळख आहे. घोलवड गावातील कॅल्शिअम समृद्ध मृदेमुळे चिकूला ही चव येत असल्याचे मानण्यात येते.

सध्या पालघर जिल्ह्यात सुमारे 5000 हेक्टर क्षेत्र चिकू लागवडीखाली आहे. चिकू पिकवणाऱ्या 5000 शेतकऱ्यांपैकी 147 शेतकरी अधिकृत जीआय प्रमाणपत्र वापरून पीक घेतात.

अधिकृत जीआय वापरकर्त्यांनी पिकवलेल्या डहाणू-घोलवड सपोटा चिकूचे  अपेडा (शेतकी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) मार्फत सहाय्यित आणि नोंदणीकृत वेष्टन सुविधा असलेल्या- मेसर्स के बी (Kay Bee) ऍग्रो इंटरनॅशनल प्रा.लि., तापी (गुजरात)' येथे वर्गीकरण व श्रेणीकरण  केले गेले. व मेसर्स के बी (Kay Bee) एक्स्पोर्ट्स ने त्याची निर्यात केली.

सध्या, आयातदार देशांमध्ये मुख्यत्वे विशिष्ट वांशिक आणि सांस्कृतिक गटांकडूनच मागणी आहे. "मुख्य प्रवाहातील ग्राहकांवर लक्ष केंद्रित केल्यास निर्यातीत अनेक पटींनी वाढ होऊ शकते. चिकूची इतर फळांसारखा एखादाच विशिष्ट हंगाम असण्याची गरज नसून चिकूचे उत्पादन वर्षभर होऊ शकते, याचा उपयोग निर्यातवाढीसाठी करून घेता येईल", असे मत अपेडाचे अध्यक्ष- डॉ.एम.अंगामुथू यांनी मांडले आहे.

जीआय उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यावर अपेडाचा भर असतो. जीआय उत्पादने वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यांच्यातील आंतरिक गुणांमुळे त्यांना खरोखरच बाहेरच्या कोणत्याही ठिकाणहून स्पर्धा उत्पन्न होण्याची शक्यता नसते. परिणामी, निर्यातीसाठी ती उत्पादने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.

चिकूचे उत्पादन कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये होते. कर्नाटकात सर्वाधिक उत्पादन होत असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. त्याचा उपयोग फ्रुटसॅलडची रंगत वाढविण्यासाठी होतो, तसेच दूध किंवा योगर्टमध्ये मिसळून त्याचे सेवन करता येते. चिकूपासून चविष्ट स्मूदी करता येते आणि चिकूवर प्रक्रिया करून त्यापासून मोरांबाही तयार करता येतो.

 

 

M.Chopade/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720112) Visitor Counter : 332


Read this release in: English , Urdu , Hindi