आयुष मंत्रालय
कोविड-19 च्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित आयुष मनुष्यबळाचा समावेश करण्याबाबतचे दिशानिर्देश जारी
या निर्णयामुळे, आठ लाख प्रशिक्षित आयुष व्यावसायिक कोविड सेवेसाठी उपलब्ध होणार
Posted On:
07 MAY 2021 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालयाने आज कोविड व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित आयुष डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याविषयीचे दिशानिर्देश जारी केले आहेत.
कोविड व्यवस्थापनासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने घेण्यात येत असलेल्या विविध निर्णयांच्या मालिकेतील हा ही निर्णय आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने नीट पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलून डॉक्टरांना कोविड सेवेत शंभर दिवस पूर्ण केल्यावर सरकारी नोकर भरतीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना त्यांच्या प्राध्यापकांच्या देखरेखीखाली कोविड व्यवस्थापन सेवेत नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या समग्र निर्णयांमुळे कोविड लढ्यासाठी मोठे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
आयुष डॉक्टर्स हे विविध संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतलेले व्यावसायिक असतात तसेच वैद्यकीय शुश्रुषेच्या विविध पैलूंची त्यांना माहिती असते. देशभरात विविध संस्थांमध्ये कोविड व्यवस्थापनाची भूमिका सक्षमपणे पार पाडत त्यांनी आपली कार्यक्षमता आधीच सिद्ध केली आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या काही संस्था जसे दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, कोविड केयर सेंटर म्हणून कोविड रुग्णांवर उपचार करत आहे. तसेच राज्य/केंद्र शासित प्रदेशांनी 1.06 लाख आयुष व्यावसायिकांना कोविड व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले असून 28,473 व्यावसयिक कोविड सेवेत आहेत. केंद्र सरकारच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमातून आयुषच्या 66,,045 व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याशिवाय आयुष आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तपणे 33,000 आयुष प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. याचाच अर्थ विविध माध्यमांतून आयुष व्यावसायिकांना कोविडविरुध्दच्या लढ्यासाठी प्रशिक्षित आणि सज्ज करण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे 8.32 लाख आयुष मनुष्यबळाची माहिती संकलित करण्यात आली असून ती कोविड वॉरियर्स पोर्टल-covidwarriors.gobv.in येथे उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716947)
Visitor Counter : 231