कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

लसीकरणाची गरज असणारे व आताच्या लसीकरण मोहिमेतील लसीकरणास पात्र असणाऱ्यांनी लस घेऊन लसीकरण उत्सवात सहभागी व्हावे- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेन्द्र सिंग यांचे आवाहन

Posted On: 11 APR 2021 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 एप्रिल 2021
 

देशाचे जबाबदार नागरिक म्हणून लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपले मित्रमंडळ व परिचितांनाही कोविड आजारामुळे उद्भवलेल्या वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू नये म्हणून मदत देणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन,  केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ जितेन्द्र सिंग यांनी केले. ‘लसीकरण उत्सव’विषयी दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  विशेषतः जे कोविडमधून बरे झाले आहेत त्यांनी जबाबदारीने, स्वतःचे अनुभव सांगत त्यासंबधी जागृती करावी,  त्यामुळे त्याबद्दलची भीती व गैरसमज दूर होतील, असेही डॉ सिंह यावेळी म्हणाले.

कोविडशी सुरू असणारा भारताचा लढा आणि न्यू नॉर्मलशी जुळवून घेण्यासाठी,  व्यक्ती आणि समाजस्तरावरील मार्गांविषयी त्यांनी सहभागी लोकांशी चर्चा केली. डॉ. जितेंद्र सिंह हे स्वतः वैद्यकीय व्यावसायिक व मधुमेहतज्ञ आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहीमेचा प्रारंभ करतांना दिलेल्या चार-मुद्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला.   1)प्रत्येकाचे लसीकरण, 2) प्रत्येकाला- प्रत्येकाने उपचारात मदत करणे, 3) प्रत्येकाने प्रत्येकाला संरक्षित करणे आणि  4) लघु प्रतिबंधात्मक क्षेत्र  तयार करणे हे ते चार मंत्र आहेत. येत्या चार दिवसांत वैयक्तिक, सामाजिक आणि  प्रशासकीय अशा  विविध स्तरांवरून ही लसीकरण मोहीम चालवली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  

लसीकरण झाल्यानंतरही प्रत्येकाने कोविड विषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याची स्वयंशिस्त बाणवणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

 

* * *

R.Aghor/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711053) Visitor Counter : 292