आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पर्यावरण आरोग्यविषयक राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नव्या हरित परिसराचे डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
13 MAR 2021 6:52PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज भोपाळ येथे आयसीएमआरच्या पर्यावरण आरोग्यविषयक राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या (NIREH) नव्या हरित परिसराचे उद्घाटन झाले.
हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक घटना असल्याचे सांगत, डॉ हर्ष वर्धन यांनी एनआयआरईएच ने केलेल्या कार्याचे महत्व विशद केले. “सध्याच्या काळात, सगळीकडे सुरु असलेल्या व्यापक शहरीकरण आणि विकासकामांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. पर्यावरण संतुलनाचे अनेक निकष, जसे की हवा, पाणी, जमीन, जैव विविधता यांची हानी होत असून त्याचा थेट परिणाम जागतिक पातळीवर मानवी आरोग्यावर होतो आहे. त्यामुळेच, पर्यावरणातील बदलांचे मानवी आयुष्यावर होणारे परिणाम तपासणे आणि त्यावर उपाययोजना करणे ही काळाची गरज झाली आहे. भारत या पर्यावरणीय हानीसाठी फार जबाबदार नाही, ही आपल्यासाठी चांगली बाब आहे. मात्र असे असले तरी, आपण पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कटीबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण सुरु केलेले जागतिक सौर सहकार्य, पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वच्छ इंधनाची व्यवस्था आणि स्वच्छ भारत अभियान, हे आपल्या या कटीबद्धतेचेच दाखले आहेत’, असे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.
सध्याच्या कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, पर्यावरण आणि आरोग्य यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करतांना डॉ हर्ष वर्धन म्हणाले, “अलीकडे मिळालेल्या काही पुराव्यांवरुन हे लक्षात आले आहे, की प्रदूषित वायू, विशेषतः PM2.5 आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड (NO2) यामुळे सार्स कोविड विषाणूंचा फैलाव आणि संसर्ग लवकर होऊ शकतो.
त्याशिवाय, वातावरणातील वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर अत्यंत विपरीत परिणाम होतो. यात हृदय आणि श्वसनाच्या विकारांचा समावेश आहे, यामुळेही कोविडचा अधिक धोका संभवतो, असे ते म्हणाले.
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704615)
Visitor Counter : 329