माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात आज ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा विशेष कार्यक्रम संपन्न

Posted On: 12 MAR 2021 2:55PM by PIB Mumbai

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले होते त्यांची स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आठवण काढणे एव्हडेच आपले कर्तव्य नाही तर त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा असे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुंबईतील आझाद क्रांती मैदानात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई शहराचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय, बंदरे व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख होते तर,  प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते. 
 


मान्यवरांनी ऑगस्ट क्रांती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले

 

ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नुतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक करावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत या स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात करू अशी शपथ घेऊ असे ठाकरे म्हणाले . 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  राज्यात दिमाखदारपणे साजरा  करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा लढा ऑगस्ट क्रांती मैदानातूनच जन्मला, पुढे इतिहास निर्माण झाला. हे लक्षात घेऊन  या निमित्त वर्षभर आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम हे राज्याच्या लौकिकाला साजेसे आणि राज्याच्या स्वातंत्रलढ्यातील योगदानाला उजाळा देणारे असतील अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुंबई शहराचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय, बंदरे व वस्त्रोद्योग मंत्री श्री. शेख म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी योगदान दिले. त्या प्रत्येकाचे एकच लक्ष्य होते ते म्हणजे स्वातंत्र्य. आजही आपल्याला आपल्या देशाची प्रगती कशी होईल, विकास कसा होईल हेच एक लक्ष्य ठेवावे लागणार आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेला स्वातंत्र्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याची आपली जबाबदारी आहे.      

स्वातंत्र्य लढ्यात आजच्या दिवशी 12 मार्च 1930 रोजी सुरू झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाने वातावरण निर्माण केले. या लढ्यात महात्मा गांधींच्या रुपाने सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व निर्माण केले. महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसा, असहकार चळवळीचे प्रशिक्षण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली राज्यघटना यांना सोबत घेऊन आपल्याला देशातील लोकशाही समर्थ करावी लागणार आहे असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. 
याप्रसंगी  स्वातंत्र्य सैनिक ,माजी सैनिक तसेच कर्तबगार महिलांचा  त्यांच्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यात स्वातंत्र्यसैनिक श्री. सत्यबोध नारायण सिंगीत, शहीद स्क्वाड्रन लीडर मनोहर राणे यांच्या वीर पत्नी श्रीमती माधुरी मनोहर राणे, हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त कु. काव्या कार्तिकेयन यांचा समावेष होता . 

 

 


मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला. आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने  मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सायकल रॅली आणि ऑगस्ट क्रांती मैदान ते मणीभवन मार्गावरील पदयात्रेला   मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. सायकल रॅलीत 25 आणि पदयात्रेत 20 विद्यार्थी सहभागी झाले होते.
 

सायकल रॅली आणि पदयात्रा

***

Jaydevi PS/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704335) Visitor Counter : 275


Read this release in: Hindi , English , Urdu