उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी सर्व राष्ट्रांना विलंब न करता फरार आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यर्पण करण्याचे आवाहन केले
“आत्मनिर्भर भारत” ही भारतीय उद्योगांसाठी मोठी संधी - उपराष्ट्रपती
Posted On:
05 MAR 2021 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2021
इतर देशांमध्ये फरार झालेले आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यर्पण संबंधित देशांकडे त्वरित करावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सर्व देशांना केले. ते म्हणाले की, जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या आणि परदेशात सुरक्षित आसरा शोधणाऱ्या लोकांसाठी कठोर व्यवस्था असणे आवश्यक आहे.
दक्षिण गुजरात वाणिज्य व उद्योग चेम्बरने सुरत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दक्षिण गुजरातच्या औद्योगिक आणि व्यापार समुदायाशी संवाद साधताना उपराष्ट्रपतींनी उद्योगांना संपूर्ण व्यापारी समुदायाचे नाव खराब करणाऱ्या उद्योगांना वाळीत टाकण्याचे आवाहन केले आणि देशातील नैतिक कॉर्पोरेट प्रशासनाच्या गरजेवर भर दिला.
संपत्तीचे वितरण होण्यापूर्वी तिची निर्मिती होणे गरजेचे आहे असे सांगत संपत्ती निर्माण करणार्यांना योग्य आदर देण्याचे आवाहन त्यांनी केले. “उद्योजकतेचे कौतुक केले पाहिजे , त्याचा हेवा वाटू नये”, असे ते म्हणाले
उपराष्ट्रपती म्हणाले की “आत्मनिर्भर भारत” अभियानाला चालना दिल्यामुळे भारतीय उद्योगांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे आणि त्यांनी या संधीचा लाभ घेत पीपीई किटची यशोगाथा इतर क्षेत्रातही साकार करावी.
कोविड -19 महामारीने ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हा एक महत्त्वाचा धडा दिल्याचे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग कायमच परदेशी पुरवठ्यावर अवलंबून राहू शकत नाही. अशा प्रकारच्या अवलंबत्वामुळे जागतिक पुरवठा साखळीत कोणत्याही अडथळ्याला आपल्याला सामोरे जावे लागू शकते असा इशारा त्यांनी दिला.
पीपीई किट्ससारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किरकोळ किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे नमूद करून नायडू म्हणाले की, आपल्या देशात अशा वस्तूंच्या उत्पादनाची क्षमता आपण विकसित केल्यास आपण खर्च कमी करू शकतो असे महामारीने आपल्याला शिकवले आहे. यामुळे केवळ आपल्या ग्राहकांनाच फायदा होणार नाही तर जागतिक बाजारपेठेतून हा माल खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या आपल्या मौल्यवान परकीय चलनाचीही बचत होईल, असे ते म्हणाले. आरोग्य सेवा, संरक्षण, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोविड -पूर्व काळात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग चांगला होता असे सांगत उपराष्ट्रपतींनी आशा व्यक्त केली की यावर्षीच्या अर्थसंकल्पात 11.5 टक्के वाढीचा अंदाज आहे. “हा दर निःसंशयपणे जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोच्च मानला जाऊ शकतो”, असे ते म्हणाले.
त्यांनी भारताच्या समृद्ध व्यापार आणि वाणिज्य परंपराची आठवण करून दिली आणि सांगितले की आपण पूर्वीचा गौरव नक्कीच परत मिळवू शकतो.
वेगाने बदलणार्या तंत्रज्ञान विषयक परिस्थितीकडे आणि आगामी चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे लक्ष वेधत नायडू यांनी उद्योगाना त्यासाठी तयार राहायला सांगितले. ते म्हणाले की, भारताची अफाट लोकसंख्या आपल्याला यात महत्त्वपूर्ण फायदा करून देते आणि योग्य प्रकारे कौशल्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन तसेच योग्य संधी मिळाल्यास आपले तरुण आवश्यक परिवर्तन घडवून आणू शकतात.
तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि नवोदित उद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी उद्योगाने अधिक सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन करत नायडू यांनी कोणत्याही अर्थव्यवस्थेची यशोगाथा लिहिण्यात खासगी क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असल्यावर भर दिला.
या तीव्र स्पर्धेच्या युगात, तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीची आस असलेल्या राष्ट्रांना उत्तम भवितव्य असेल, असे सांगून नायडू यांनी कौशल्य निरंतर अद्ययावत करण्यावर भर दिला. “आपल्याला नवीन संशोधन आणि शोध लावावे लागतील”, असे त्यांनी सांगितले आणि खासगी क्षेत्राला संशोधन आणि विकास खर्चात वाढ करण्याचे आवाहन केले. शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी सीएसआर निधी राखून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
सहकार चळवळीत गुजरातच्या यशाचे नायडू यांनी कौतुक केले. पूर्वी अनेक सहकारी संस्था राजकारणाचा आणि स्वार्थी हितसंबंधाच्या बळी ठरल्या असे सांगत ते म्हणाले की, देशभरातील सहकारी चळवळ अधिक बळकट करण्याची वेळ आली आहे.
सुरत हे रेशीम आणि हिरे यासाठी प्रसिद्ध आहे, असा उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी सुरतला देशातील एक मोठे औद्योगिक आणि वाणिज्य केंद्र बनवल्याचे श्रेय सुरतच्या जनतेच्या मेहनत आणि उद्योजकतेच्या भावनेला दिले.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702793)
Visitor Counter : 156