विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय जैवतंत्रज्ञान उद्योग उद्योजकता, नवोन्मेष, स्थानिक गुणवत्तेचा विकास आणि उच्च मूल्य आधारित देखभालीचे दर्शन या चार मुख्य धारणांवर उभारलेला असल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

ग्लोबल बायोइंडिया 2021 ने जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले- केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन

Posted On: 03 MAR 2021 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2021

 

ज्या प्रकारे कोविड-19 महामारीने अचानक आलेल्या आणि कधीही न पाहिलेल्या साथीच्या आजारांचा आणि महामारीचा फैलाव झाल्यास त्यांना तोंड देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची गरज अधोरेखित केली त्या प्रकारे नव्या आणि अचानक निर्माण होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शास्त्रज्ञ आणि संशोधकांना केले आहे. ग्लोबल बायो इंडिया 2021च्या समारोप समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. अलीकडच्या काळात जैवतंत्रज्ञान विविध औद्योगिक क्षेत्रांचा कणा म्हणून उदयाला आले आहे, असे त्यांनी सांगितले. उद्योजकता, नवोन्मेष, स्थानिक गुणवत्तेचा विकास आणि उच्च मूल्य आधारित देखभालीचे दर्शन या चार मुख्य धारणांच्या आधारे जैवतंत्रज्ञान उद्योगापासून जैव अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाच्या वैशिष्टपूर्ण स्थितीमध्ये भारत पोहोचला आहे असे ते म्हणाले.

  

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आपत्तीची हाताळणी करण्यासाठी निदानाच्या आणि तातडीच्या नियामक प्रतिसाद क्षमतांमध्ये झपाट्याने वाढ करण्याबरोबरच निदानकारी, संरक्षक उपकरणांचा आणि लसींचा विकास करण्यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी जैवतंत्रज्ञान विभागाची प्रशंसा केली.

भारताने विविध देशांना कोविड-19 प्रतिबंधक लसींचा पुरवठा करून खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम या भावनेचे आणि वाटप करा आणि काळजी घ्या या प्राचीन तत्वज्ञानाचे दर्शन घडवले, असे ते म्हणाले. भारताच्या या कृतीची जागतिक आरोग्य संघटनेने देखील प्रशंसा केली आहे आणि या संघटनेच्या महासंचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लसींचा पुरवठा केल्याबद्दल आभार मानले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

  

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या प्रचंड क्षमतेचा त्यांनी दाखला दिला आणि सरकारने या क्षेत्रातील उद्योजकांसाठी नियामक मान्यता शिथिल केल्या असल्याचे सांगितले. यामुळे गेल्या वर्षी महामारी येऊन देखील नवोन्मेषी व्यक्ती, तंत्रज्ञान आणि उत्पादने, इन्क्युबेशन स्पेस आणि आयपीज यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

  

2025 पर्यंत 150 अब्ज डॉलरचा उद्योग बनण्याचे आणि ज्ञान आणि नवोन्मेष आधारित अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देण्याचे जैवतंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष्य आहे असे त्यांनी सांगितले. त्या दृष्टीने युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि कुशल बनवण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.

मेक इन इंडिया उपक्रम किंवा आत्मनिर्भर भारत या संकल्पनेमुळे भारताचे जैवतंत्रज्ञानाकडून जैवअर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल आणि या नव्या धोरणांमुळे शाश्वत जैवअर्थव्यवस्थेचा विकास होत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जैवतंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या प्रचंड क्षमतेचा फायदा घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. रेणू स्वरुप, सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी, बायोकॉनचे अध्यक्ष डॉ. किरण मझुमदार शॉ, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रॉड्रिको एच ऑफ्रिन आणि इतर मान्यवर या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

डॉ. हर्षवर्धन यांनी डॉ. रॉड्रिको यांच्या उपस्थितीत इंडियन पॅथोजेन प्रायॉरिटी लिस्टचे यावेळी प्रकाशन केले. कोविड-19च्या जागतिक परिणामांमुळे नवोन्मेष आणि औषधनिर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान, कृषी आणि संबंधित क्षेत्रे, स्पष्ट उपाय आणि औद्योगिक जैव- उत्पादन यामधील तंत्रज्ञानाचा अंगिकार यावरील जैवतंत्रज्ञानाच्या थेट प्रभावाचे महत्त्व अधिक जास्त प्रमाणात लक्षात आले आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. महत्त्वाच्या उत्पादनांच्या आणि कच्च्या मालाच्या आयातीसह इतर प्रकारच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामांमुळे भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या आवश्यकतेवर लक्ष केंद्रित झाले, असे ते म्हणाले. 2025 पर्यंत भारताला 100 अब्ज डॉलरचे जैव उत्पादन केंद्र बनवण्याचा आणि या उद्योगाला 150 डॉलरचा उद्योग बनवण्याचा पंतप्रधानांनी दिलेला नारा म्हणजे जैवतंत्रज्ञान क्षेत्राकडून देशाला अपेक्षांचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. ग्लोबल बायोइंडिया 2021 ने या महत्त्वाच्या क्षेत्रात भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले असे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पुरस्कार मिळवणाऱ्या विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि इंडियन प्रायॉरिटी पॅथोजेन लिस्टच्या प्रकाशनाबद्दल आनंद व्यक्त केला.

Please CLICK HERE for details of the Best Startup Award .

Please CLICK HERE for details of the Best Bioincubator Award.

Please CLICK HERE for details of the BIRAC Innovator Awards


* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1702362) Visitor Counter : 2


Read this release in: English , Urdu , Hindi