पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा स्वयंपाकाच्या इंधनासाठी स्वच्छ उर्जेच्या नवोन्मेषांचा आग्रह, उद्योजकांना खुले निमंत्रण


भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीला चालना देण्यामध्ये स्वच्छ उर्जेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन

Posted On: 02 MAR 2021 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

देशाच्या लोकसंख्येच्या आकांक्षा आणि गरजांची पूर्तता करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीला चालना देण्यामध्ये स्वच्छ उर्जा मोठी भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने आयोजित केलेल्या ग्लोबल बायो इंडिया 2021मध्ये स्वच्छ उर्जा परिसंवादामध्ये ते आज बोलत होते. स्वयंपाकाच्या इंधनासाठी स्वच्छ उर्जेचा वापर व्हावा  यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आल्या पाहिजेत असा आग्रह त्यांनी धरला आणि त्यासाठी उद्योजकांना खुले निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने शाश्वत विकास आणि स्वच्छ आणि हरित भवितव्यासाठी उर्जा संक्रमणाच्या आणि सर्वांच्या सर्वोत्तम सामाईक हिताच्या  जबाबदार मार्गावर वाटचाल सुरू केली आहे, असे ते म्हणाले.

आम्ही सातत्याने उर्जा धोरणविषयक उपक्रम हाती घेत आहोत, धोरणांमध्ये सुधारणा करत आहोत आणि आवश्यक उपाययोजना करत आहोत, असे प्रधान यांनी सांगितले. सर्वांना उर्जेची उपलब्धता, गरिबातील गरिबांना परवडणाऱ्या दरात उर्जा उपलब्ध करणे, उर्जेचा कार्यक्षम वापर, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जबाबदार जागतिक नागरिक म्हणून उर्जा शाश्वती आणि जागतिक अस्थैर्याच्या स्थितीला तोंड देण्यासाठी सुरक्षा या पाच मार्गदर्शक मूल्यांवर आधारित अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आपल्यासाठी नैसर्गिक वायू हा एक महत्त्वाचा संक्रमणकारी इंधनाचा पर्याय ठरणार आहे, असे ते म्हणाले. देशभरात वायू इंधनाचे जाळे विकसित करून आणि शहरी गॅस वितरण सुविधा आणि एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनलसहित इतर पायाभूत सुविधा निर्माण करून 2030 पर्यंत नैसर्गिक वायूच्या वापराचे प्रमाण 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर नेऊन वायू आधारित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

प्रधान यांनी यावेळी 11 राज्यांमध्ये सुमारे 14,000 कोटी रुपये खर्चाने 12 टूजी- इथॅनॉल व्यावसायिक प्रकल्पांच्या उभारणीसाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या बायो रिफायनरीज महत्त्वाचे योगदान देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702060) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi