पर्यटन मंत्रालय

गुजरातच्या केवडिया येथे भारतीय देशांतर्गत सहल आयोजक संघटनेचे तीन दिवसीय संमेलन आजपासून सुरु


पंतप्रधानांच्या ‘देखो अपना देश’ घोषणेमुळे देशांतर्गत पर्यटनाला चालना : केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल

देशांतर्गत पर्यटन प्रगतीपथावर असून, त्यामुळे या क्षेत्राला उभारी मिळण्यास मदत होईल, केवडिया या क्षेत्राच्या उभारीचे प्रतीक ठरेल-पर्यटन सचिव

Posted On: 12 FEB 2021 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘देखो अपना देश’ या घोषणेमुळे देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रह्लाद सिंह यांनी केले. गुजरातच्या केवडीया येथे भारतीय देशांतर्गत सहल आयोजक संघटनेच्या (ADTOI) तीन दिवसीय संमेलनाचे उद्‌घाटन आज त्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या संघटनेचे हे दहावे तीन दिवसीय संमेलन आणि प्रदर्शन असून, केवडिया येथे टेंट सिटीत, स्टेच्यू ऑफ युनिटी परिसरात हे सुरु आहे. या संमेलनाची यंदाची संकल्पना- देशांतर्गत पर्यटन- पुनरुज्जीवनाची आशा-‘देखो अपना देश’ ही आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि ADTOI ने संयुक्त विद्यमाने तसेच गुजरात पर्यटनाच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित केले आहे. भारतात देशांतर्गत पर्यटनाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी पर्यटकांना प्रवास करण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याचे प्रयत्न करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या संघटनेचे देशभरातील 400 प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित आहेत. त्यात हॉटेल व्यावसायिक, हवाई कंपन्यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

या संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पर्यटनमंत्री पटेल यांचा व्हिडीओ लावला गेला, त्या संदेशात त्यांनी सांगितले की ‘आपण जर सद्हेतूने आणि नियोजनपूर्वक काम केले तर आपण मोठमोठ्या गोष्टीही साध्य करू शकतो आणि हे स्मारक (स्टेच्यू ऑफ युनिटी) त्याचाचा पुरावा आहे. या तीन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्मभूमीत आपल्याला अनेक अद्भूत गोष्टी बघायला मिळतील, असेही ते पुढे म्हणाले. पर्यटन क्षेत्रातील सर्व हितसंबंधीयांचे अभिनंदन करतांनाचा सिंह यांनी भारताला पर्यटन क्षेत्राच्या  क्रमवारीत 34 व्या स्थानावरून सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. भारत, वसुधैव कुटुंबकम संस्कृती मानणारा देश असून आपण आतापर्यंत 140 देशांना औषधांचा आणि 16 देशांना लसपुरवठा केला आहे. याचा आपल्या पर्यटन क्षेत्रावरही सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलतांना पर्यटन सचिव, अरविंद सिंह म्हणाले की या महामारीमुळे, आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरही  मानवी वाहतूक आणि पर्यटनात मोठी घट झाली असून हे क्षेत्र आजवरच्या सर्वात निम्न स्तरावर पोचले आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक रद्द करावी लागणे, विमानतळे आणि देशांच्या सीमा बंद करणे, प्रवासावर कठोर बंधने घालणे, या सगळ्यामुळे अनेक उद्योग संकटात सापडले, मात्र त्यातही पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला, अनेकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. मात्र, हे वर्ष थोडे सकारात्मक संकेत घेऊन आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाच्या रूग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे. त्यामुळे, प्रवासावरील बंधनेही शिथिल करण्यात आली असून आंतरराज्यीय वाहतूकही सुरु झाली आहे. लसीबाबतच्या उत्साहवर्धक बातमीमुळे परिस्थिती सुधारण्याची आशा अधिकच पल्लवित झाली आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकीमध्ये, विमान वाहतूक, रेल्वे, महामार्ग वाहतूक आता पूर्ववत सुरु झाल्याची आणि प्रवासीही पूर्वीप्रमाणेच असल्याची माहिती मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

आता देशांतर्गत पर्यटनाने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली असून, त्याचा लाभ या क्षेत्राला उभारी मिळण्यासाठी होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  पर्यटन मंत्रालयाने स्वदेश दर्शन आणि प्रसाद (PRASHAD)या योजनांअंतर्गत 7103.12 कोटी रुपयांच्या 132 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती सचिवांनी दिली. या अंतर्गत, पर्यटन आणि धार्मिक क्षेत्रांना मदत दिली जाणार आहे. यासोबतच मंत्रालय 19 महत्वाच्या पर्यटन स्थळांचा विकास करत असून ही स्थळे जागतिक दर्जाची बनविली जाणार आहेत. सर्व हितसंबंधी गट,सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी या मोहिमेसाठी एकत्र यावे आणि सर्व नागरिकांपर्यंत ‘देखो अपना देश’ हा संदेश पोहोचवावा, असे आवाहन यावेळी सचिवांनी केले.

या संमेलनात कोविडविषयक सर्व उपाययोजना आणि सुरक्षेची काळजी घेतली जात असून, पर्यटन क्षेत्राला पुनर्जीवन देण्याच्या संदेशासाठी केवडियातील स्टेच्यू ऑफ युनिटी पेक्षा दुसरे योग्य स्थळ नाही. पर्यटन प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याला कसा स्पर्श करू शकते, हे अनुभवायचे असेल तर केवडिया त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, असेही अरविंद सिंह म्हणाले. केवडिया हे सर्व सुख-सुविधांसह एक कौटुंबिक सहल क्षेत्र म्हणून सर्वांगाने विकसित झाले आहे. इथे देशभरातल्या सर्व महत्वाच्या शहरांतून थेट रेल्वेसेवा आहे. अहमदाबाद-केवडिया जनशताब्दी एक्स्प्रेसआमध्ये विस्टाडोम कोच सुविधा असून त्याचा पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव घेता येईल, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला, गुजरात पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव ममता वर्मा, पर्यटन आयुक्त जेनू दिवान, पर्यटन महासंचालक रुपिंदर ब्रार, पत्रसूचना कार्यालयाच्या महासंचालक  नानू भसीन, ADTOI चे अध्यक्ष पी पी खन्ना, ADTOIचे  चेअरमन चेतन गुप्ता, को-चेअरमन अशोक धूत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी उद्या, एकता मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्व प्रतिनिधी केवडिया येथील पर्यटन स्थळांना भेट देतील. तसेच, देशातंर्गत पर्यटनाच्या विविध योजनांचे सादरीकरणही केले जाईल.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697594) Visitor Counter : 192


Read this release in: English , Hindi , Gujarati