विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
परवडण्याजोग्या आणि विश्वासार्ह स्वच्छ उर्जा प्रणालीचे स्वप्न साकार करण्यासाठी परस्पर सहकार्याने वैज्ञानिक प्रयत्नांची आवश्यकता- डॉ. हर्ष वर्धन
मिशन इनोवेशन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक 2021
Posted On:
08 FEB 2021 11:16PM by PIB Mumbai
मिशन इनोवेशन 2.0 च्या दिशेने आपली वाटचाल सुरू असताना, या मिशनला बळकटी देण्यासाठी संसाधने उपलब्ध करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि त्याचे सर्व मंच उर्जा क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवतील याचा पुनरुच्चार आपण आपल्या सरकारच्या वतीने करत आहोत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मिशन इनोवेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. 2023 मध्ये जेव्हा भारत आठव्या मंत्रीस्तरीय मिशन इनोवेशनचे यजमानपद भूषवेल त्यावेळी या उपाययोजनांमुळे स्वच्छ उर्जानिर्मितीचे मार्ग मिळालेले असतील, क्षमता वृद्धी झालेली असेल, ज्ञान आणि शास्त्रज्ञांच्या देवाणघेवाणीचे कार्यक्रम राबवले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्यात मिशन इनोवेशन अधिक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्न विकसित करेल आणि त्यांना चालना देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि या मिशनशी संबंधित संपूर्ण समुदायाला त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळावे, अशा शुभेच्छा दिल्या. या बैठकीमध्ये मिशन इनोवेशन देशांचे सदस्य आणि वरिष्ठ प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मिशन इनोवेशनच्या महत्त्वाकांक्षी पुढच्या टप्प्यातील चर्चेसंदर्भात वातावरण निर्माण करण्यासाठी, प्रगतीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपाययोजना हाती घेण्यासाठी पॅरिसमध्ये जागतिक नेते एकत्र आले असताना 30 नोव्हेंबर 2015 रोजी मिशन इनोवेशनची घोषणा झाली होती. मिशन इनोवेश हा 24 देशांचा आणि युरोपीय संघाचा जागतिक कार्यक्रम आहे आणि शुद्ध उर्जानिर्मितीसाठी नवोन्मेषाला आश्चर्यकारक गती देण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तुलनेने अतिशय कमी कालावधीत नवोन्मेषाच्या आव्हानांसाठी या कार्यक्रमातील सदस्यांचे नेतृत्व आणि स्वेच्छेने केलेल्या प्रयत्नांमुळे या कार्यक्रमांच्या उद्दिष्टांना चालना मिळाल्याचे दिसून आले आहे. स्वच्छ उर्जेसाठी नवोन्मेषाला गती देण्यामध्ये या कार्यक्रमाने दिलेल्या योगदानाची आणि या कार्यक्रमाने सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक आणि भागीदारी करण्यामध्ये बजावलेल्या भूमिकेची डॉ. हर्षवर्धन यांनी प्रशंसा केली. मिशन इनोवेशन 2.0 अधिक महत्त्वाचे बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली आणि मिशन इनोवेशन समुदायाला नव्या टप्प्यात आणि नव्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या दशकांमध्ये 2020 हे वर्ष उल्लेखनीय वैज्ञानिक प्रयत्न आणि नवोन्मेष यासाठी कायम स्मरणात राहील, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. या वर्षात जागतिक महामारीने लॉजिस्टिक्स, व्यापार, औषधनिर्मिती आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये एका मागोमाग एक अशी आव्हाने निर्माण केली असताना जगभरातील सर्व नवोन्मेषकर्त्यांनी चाकोरीबाहेरच्या आश्चर्यकारक उपाय शोधून काढत जगभरातील लाखो लोकांचे जीवाचे आणि चरितार्थांच्या साधनांचे संरक्षण केले, असे त्यांनी सांगितले. भारताने आपल्या सौरउर्जा निर्मिती क्षमतेत 13 पट वाढ केली आहे आणि बिगर जीवाश्म इंधन आधारित उर्जा निर्मितीची क्षमता 134 गिगावॉट्स पर्यंत वाढवली आहे, जी देशाच्या एकूण उर्जानिर्मितीक्षमतेच्या 35 टक्के आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भारताने 2030 पर्यंत 450 गिगावॉट उर्जानिर्मितीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निर्धारित केले आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करेल, असा विश्वास हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये जैवइंधनाचे प्रमाण वाढवण्याचा देखील भारताचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. स्वयंपाकासाठी सर्वात शुद्ध इंधनाच्या वापराची जगातील सर्वात मोठी योजना असलेली उज्ज्वला योजना भारतात सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेंतर्गत आतापर्यंत 15 कोटी कनेक्शन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात बायोब्युटॅनॉल, बायोहायड्रोजन आणि बायोजेट इंधन यांसारख्या अत्याधुनिक जैवइंधनांविषयी संशोधन करण्यासाछी जैवइंधन विभागाकडून पाच केंद्रे काम करत आहेत, असे ते म्हणाले.
शाश्वत भवितव्यासाठी भारत आणि स्वीडन यांनी ऍव्हायडेड एमिशन फ्रेमवर्क नावाची एक भागीदारी विकसित केली आहे आणि या भागीदारी अंतर्गत आठ कंपन्यांची निवड केली असून या कंपन्या 2030 पर्यंत कार्बन डाय ऑक्साईड वायूच्या उत्सर्जनात वार्षिक 10 कोटी टन कपात करून दाखवणार आहेत.
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696357)
Visitor Counter : 170