रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

एनएचएआयच्या कंत्राटदाराने रस्ते बनविण्यासाठी 24 तासांत सर्वात जास्त सिमेंट वापरण्याचा जागतिक विक्रम केला

Posted On: 03 FEB 2021 8:44PM by PIB Mumbai

 

एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने 24 तासांत 2,580 मीटर लांबीचा चौपदरी महामार्ग तयार करण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात रस्त्यांसाठीचे दर्जात्मक सिमेंट वापरण्याचा जागतिक विक्रम केला आहे. 1 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 8 वाजता त्यांनी काम सुरु केले.दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांनी 2,580 मीटरच्या चौपदरी रस्त्यासाठी म्हणजे सुमारे 10.32 लेन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. 18.75 मीटर रुंदीच्या या रस्त्यावर 24 तासांत द्रुतगती महामार्ग तयार करण्यासाठी 48,711 वर्ग मीटर क्षेत्रफळावर सिमेंट पसरले. या कामादरम्यान, 24 तासांत सर्वात जास्त – 14,613  घनमीटर सिमेंट वापराचा विक्रम प्रस्थापित झाला.

पटेल इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादित या कंत्राटदाराने केलेला हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा दोन्ही संस्थांनी प्रमाणित केला आहे.

हा विक्रम दिल्ली- बडोदा-मुंबई ह्या 8 पदरी हरित द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचा भाग आहे आणि हा विक्रम करताना जगातील सर्वात मोठ्या, संपूर्णपणे स्वयंचलित,अत्याधुनिक अशा सिमेंट पसरविणाऱ्या यंत्राची मदत झाली.

महामार्ग निर्माण मंत्रालयाने 2020-21 या आर्थिक वर्षात एप्रिल 2020 ते 15 जानेवारी2021 या कालावधीत 8,169 किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण केले, म्हणजेच प्रतिदिन 28.16 किलोमीटर या गतीने रस्ते निर्माण होत असतानाच हा जागतिक विक्रम झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात, याच कालावधीत, 26.11 किलोमीटर प्रतिदिन या वेगाने 7,573किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आले होते. रस्तेनिर्मितीचा हाच वेग कायम राहिला तर 11हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करायचे सरकारचे लक्ष्य 31 मार्च पर्यंत पूर्ण होईल.

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

 

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1694928) Visitor Counter : 138


Read this release in: English , Urdu , Hindi