माहिती आणि प्रसारण मंत्रालय
लहान असतांना प्रश्न विचारण्यासाठी ‘लहान’ ,मोठे झाल्यावर प्रश्न विचारण्यासाठी ‘मोठे’ : पांढरा चिवडा चित्रपटाचे दिग्दर्शक हिमांशू सिंग
‘मुलांमधली निरागसता जपायला हवी आणि ती तशीच असू द्यायला हवी.’
Posted On:
23 JAN 2021 11:20PM by PIB Mumbai
पणजी, 23 जानेवारी 2021
“एक मूल म्हणून जेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, आणि आपण ते मोठ्यांन विचारतो, त्यावेळी आपल्याला असे सांगितले जाते की याचे उत्तरं ऐकण्यासाठी आपण खूप लहान आहोत, आणि नंतर जेव्हा आपण मोठे होतो, त्यावेळी, आपल्याला प्रश्न पडले तर असे म्हटले जाते की एवढे मोठे असूनही इतक्या सोप्या प्रश्नांची उत्तरे का माहित नाही. अशाप्रकारे, समाजच ठरवत असतो की आपण कोणत्या वयात लहान आहोत आणि केव्हा मोठे, आणि त्यांच्या अपेक्षांअनुरूप आपण केव्हा कसे वागायचे हे ही समाजच ठरवतो.” समाजातील या विसंगतीवर मार्मिकपणे भाष्य करणारा, दिग्दर्शक हिमांशू सिंग यांचा चित्रपट ‘पांढरा चिवडा’ 51 व्या इफ्फिच्या इंडियन पॅनोरमा विभागात बिगर फिचर फिल्म गटात काल दाखवला गेला.
या चित्रपटाच्या संकल्पनेविषयी सांगतांना,सिंग म्हणाले की हा चित्रपट सात वर्षांच्या विठूची कथा सांगतो, ज्याला मृत्यूविषयी अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र आज आपल्या समाजात आपण बघतो, मृत्यू आणि संभोग या विषयांवर मोकळेपणाने अगदी क्वचित बोलले जाते.
एका घट्ट बांधलेल्या चौकटीतल्या ग्रामीण कुटुंबातल्या विठूला एका विशिष्ट चवीची गोडी लागते, जी त्याच्याही साठी नवलाची गोष्ट असते. हळूहळू ही चव विष्णूचे सर्व भावविश्व व्यापून टाकते, त्याचे कुतूहलही वाढू लागते. या चित्रपटात मग विठूचा या चवीसाठीचा शोध सुरु होतो. या प्रवासात अनेक अनपेक्षित वळणे लागतात, ज्यातून विठूला आयुष्यभर पुरतील असे धडे मिळतात.
मुलांची निरागसता, त्यांचे भावविश्व जपायला हवे, असे सिंग म्हणतात. पांढरा चिवडा या चित्रपटातून आम्हाला ही निरागसता जपण्याचा संदेश द्यायचा आहे. ते लहान असतांना आपण त्यांना रागावतो, हुसकून लावतो, मात्र त्यामुळे जेव्हा ही मुले मोठी होतात, तेव्हा त्यांच्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याइतके धैर्य त्यांच्यात विकसित झालेले नसते.
मुलांना नीट प्रश्न विचारणे आणी त्याची उत्तरे देण्याची पद्धत कशी सुरु करता येईल, असे विचारले असता, “मोठ्यांविषयीचा आदर आणि प्रश्न विचारण्याची वृती यातला फरक आपण समजून घ्यायला हवा, जेव्हा एखादे मूल प्रश्न विचारते तेव्हा, ते निरागसपणे विचारत असते, त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत.”
एफटीआयआय मधले आमचे टीव्ही दिग्दर्शन विभागप्रमुख मिलिंद दामले यांच्याकडून आम्हाला ही कथा मिळाली, आणि मग आम्ही मित्रांनी मिळून यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. दामले सरांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे, असे त्यांनी सांगितले.
या चित्रपटाला किड सिनेमा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा ब्राँझ एलिफंट पुरस्कार 2020 मिळाला आहे.
कोविड महामारीच्या काळातही इफ्फीचे आयोजन केल्याबद्दल, सिंग यांनी आयोजकांचे आभार मानले. इफ्फिमध्ये आपल्या चित्रपटाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असे त्यांनी सांगितले.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691747)
Visitor Counter : 295