माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ब्राझिलमधील ट्रान्स्जेंडर विद्यार्थ्यांना झेलाव्या लागणाऱ्या सामाजिक बहिष्काराच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा व्हॅलेंटिनाचा प्रयत्नः दिग्दर्शक कॅसियो परेरा दॉस सांतोस
पणजी, 22 जानेवारी 2021
“ब्राझिलमधील 80% ट्रान्स्जेंडर विद्यार्थी अर्ध्यावर शिक्षण सोडतात- अनेकांना देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलले जाते” “जर आपल्याला वस्तुस्थिती बदलायची असेल तर आपल्याला समस्या अधिक ठळकपणे मांडाव्या लागतील. ब्राझिलमधील ट्रान्स्जेंडर्सचे वास्तव फारसे चांगले नाही. दुर्लक्षामुळे त्यांच्याबाबतीत अनेक पूर्वग्रहदूषित समज आहेत, खूप मोठ्या भेदभावांना त्यांना तोंड द्यावे लागते, तिरस्काराच्या भावनेतून होणाऱ्या गुन्ह्यांचे ते बळी ठरतात. त्यांच्या वेगळ्या ओळखीमुळे शाळेमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या प्रतिकूल वातावरणामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. ब्राझिलमध्ये तृतीय पंथाच्या लोकांची संख्या जास्त असल्याने ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यांना भेडसावणाऱ्या या सामाजिक बहिष्काराच्या समस्येकडे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने आम्ही व्हॅलेंटिना बनवण्याचा निर्णय घेतला, असे या चित्रपटाच्या निमित्ताने पदार्पण करणारे दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांनी गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत आज सांगितले. साओ पावलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने सर्वोत्तम ब्राझिलियन फिक्शन फिचरसाठी प्रेक्षकांच्या पसंतीचा चित्रपट पुरस्कार मिळवला असून 51व्या इफ्फीमध्ये त्याचा आशियाई प्रिमिअर शो झाला. या चित्रपटात एका ट्रान्स्जेंडर महिलेला केवळ ती वेगळी असल्याने प्रत्यक्ष आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या समस्या आणि हालअपेष्टांचे चित्रिकरण आहे. तिचे समाजातील नाव वापरून शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ती आपली खरी ओळख गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करते. पण ज्यावेळी शाळेकडून तिच्या पित्याच्या सहीची मागणी केली जाते तेव्हा तिला खऱ्या अर्थाने अडचण निर्माण होते कारण पित्याशिवाय एकाकी मातेकडून तिचा सांभाळ होत असतो. मात्र, येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करून अखेर ती कशा प्रकारे आपले उद्दिष्ट साध्य करते याची कहाणी या चित्रपटात आहे.
“आम्ही केलेल्या सर्वेक्षणात आम्हाला 80% ब्राझिलियन ट्रान्स्जेंडर विद्यार्थी त्यांच्यावर घातल्या जाणाऱ्या सामाजिक बहिष्कारामुळे शाळा अर्ध्यावर सोडतात या वस्तुस्थितीची जाणीव झाली. हे सर्व तिथेच थांबत नाही. शिक्षणाच्या अभावामुळे आणि त्यामुळे रोजगार मिळवण्यात असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापैकी बरेच जण देहविक्रयाच्या व्यवसायाकडे वळतात. ब्राझिलमध्ये ही सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे.” या चित्रपटाचे दिग्दर्शक सांतोस यांनी ही माहिती या वार्ताहर परिषदेत दिली.
व्हॅलेंटिनाची भूमिका अभिनयात पदार्पण करणाऱ्या थिएसा वोईनबाक हिने केली आहे जी स्वतः ट्रान्स्जेंडर आहे. या निवडीचे कारण सांतोस यांनी स्पष्ट केले. त्या व्यक्तीच्या भावना नैसर्गिक रित्या व्यक्त व्हाव्यात असा आमचा उद्देश होता, असे ते म्हणाले. त्यांना भेडसावणाऱ्या भेदभावाच्या समस्येबाबत हा चित्रपट असल्याने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
M.Chopade/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691274)
Visitor Counter : 171