माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीतील प्रमुख अशा भारतीय पॅनोरमा विभागाचे आज उद्घाटन
फीचर फिल्म विभागात उद्घाटनाचा चित्रपट म्हणून ‘सांड की आँख’ चा शो, तर बिगर फिचर फिल्म चित्रपट विभागात उद्घाटनाचा चित्रपट म्हणून ‘पंछिका’ या गुजराती चित्रपटाची निवड
पणजी, 17 जानेवारी 2021
51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीमधील प्रमुख विभाग समजल्या जाणाऱ्या भारतीय पॅनोरमा विभागाचे आज गोव्यात उद्घाटन झाले. यावेळी ज्यूरी सदस्य आणि फीचर फिल्म चित्रपटांचे दिग्दर्शक उपस्थित होते.
या प्रसंगी, महोत्सवातील सहभागाबद्दल आभार व्यक्त करत, ज्युरी सदस्य, तसेच दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.
बिगर फिचर फिल्म विभागातील उद्घाटनाचा लघुपट म्हणून निवड झालेल्या ‘पंछिका’चित्रपटाचे दिग्दर्शक अंकित कोठारी यांनी आपल्या लघुपटाविषयी बोलतांना सांगितले की हा मैत्रीची कथा सांगणारा सिनेमा आहे.कच्छच्या वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या सात वर्षांच्या दोन मैत्रिणींची आणि जातीच्या बंधनांशी झुंज देणाऱ्या त्यांच्या नात्याच्या भावविश्वाची ओळख आपल्याला या लघुपटातून होते.
तर ‘सांड की आँख’ चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी सांगितले की ‘चित्रपटाची कथा, चन्द्रो आणि प्रकाशी तोमर या उत्तरप्रदेशातील दोन आज्यांची प्रेरणादायक कथा आहे, ज्या त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः वृद्धापकाळात नेमबाजी शिकतात आणि नेमबाज म्हणून 352 पदके जिंकतात. या नवोदित दिग्दर्शकाने सिनेमा काढण्यात संपूर्ण सहकार्य केल्याबद्दल निर्मात्यांचेही आभार मानले.
या विभागात एकूण 23 फिचर फिल्म आणि 20 लघुपट दाखवले जाणार आहेत.
महोत्सवातील सर्व नोंदणीकृत प्रतिनिधींना मोठ्या पडद्यावर हे चित्रपट बघता येतील. हा महोत्सव 16 ते 24 जानेवारी असा नऊ दिवस चालणार आहे.
भारतीय पॅनोरमा विभागात नेहमीच देशभरातील उत्तमोत्तम चित्रपट दाखवले जात असून प्रादेशिक चित्रपट आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देणारे हे एक उत्तम व्यासपीठ आहे.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689474)
Visitor Counter : 169