शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आभासी / ऑनलाईन पद्धतीने आयआयआयटी भागलपूर संस्थेच्या कॅम्पसची कोनशीला बसविली

Posted On: 21 DEC 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020 

 

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल ’निशंक’ यांनी 21 डिसेंबर 2020 ला आभासी / ऑनलाईन पद्धतीने आयआयआयटी भागलपूर या तंत्रज्ञानविषयक शिक्षण संस्थेच्या परिसरातील स्थायी स्वरूपाच्या इमारत प्रकल्पाची कोनशीला बसविली. या इमारतीत शैक्षणिक विभाग, प्रशासकीय विभाग, तासिकांसाठीचे मोठे वर्ग, संगणक केंद्र आणि ग्रंथसंग्रहालय विभाग, कार्यशाळा आणि इनक्युबेशन केंद्र, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, अध्यापकांची निवासस्थाने, इत्यादी सुविधा असतील. या प्रसंगी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकासह इतर प्रख्यात साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या संग्रहाचे उद्घाटन केले.

बिहारचे शिक्षण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अशोक चौधरी, भागलपूर येथील संसद सदस्य अजय मंडल, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अमित खरे, आयआयआयटी भागलपूरचे संचालक अरविंद चौबे हे देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते.

देशातील उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या तोडीचे शिक्षण देऊन आयआयआयटी भागलपूर ही संस्था नवे आदर्श निर्माण करीत आहे असे पोखरीयाल म्हणाले. तंत्रज्ञानविषयक ज्ञान देण्यासाठी परिसरातील 4-5 गावांना दत्तक घेण्याच्या संस्थेच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. आयआयआयटी भागलपूर ही संस्था टाळेबंदीच्या काळात देखील अविरत कार्यरत होती हे समजल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. कोविड – 19 आपत्तीशी लढा देण्यात उपयुक्त ठरणाऱ्या संशोधन कार्यात देखील या संस्थेने भाग घेतला अशी माहिती पोखरीयाल यांनी पुढे दिली.

 

रेशीम तंत्रज्ञानात अधिक प्रगती घडवून आणण्यासाठी आयआयआयटी भागलपूर ही संस्था सुधारणात्मक काम  करू शकेल असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले.  रेशीम उद्योगासाठी ही संस्था करत असलेल्या भरीव कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

प्राध्यापक अरविंद चौबे यांनी प्रस्तावित इमारतीचा आराखडा, लक्ष्य आणि संस्थेच्या आगामी योजनांबद्दल माहिती दिली. तसेच, कोविड-19 च्या संकट काळात संस्थेने हाती घेतलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली. नव्या इमारतीच्या विकासानंतर, आयआयआयटी भागलपूर या संस्थेत देशभरातील सुमारे 600 विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊ शकतील अशी माहिती प्राध्यापक अरविंद चौबे यांनी दिली.   

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682473) Visitor Counter : 91


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu