उपराष्ट्रपती कार्यालय

शैक्षणिक व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करून ती अधिकाधिक मूल्याधारित, अध्यात्मिक आणि परिपूर्ण बनवावी: विद्यापीठे आणि शिक्षण तज्ञांना उपराष्ट्रपती वेंकैया नायडूचे आवाहन


अध्यात्मिक वैदिक शिक्षण परंपरेतून स्फूर्ती घेण्यास सांगितले

शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांनी फक्त पदवीधारकच नव्हे तर सुघड आणि सह्रदय व्यक्ती तयार करणे अपेक्षित आहे : उपराष्ट्रपती

मूल्य नसलेले शिक्षण म्हणजे शिक्षण नसल्यासारखेच आहे. : उपराष्ट्रपती

विविध शाखीय शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रशंसा

विद्यार्थ्यांना ध्येयप्राप्तीसाठी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून प्रामाणिकपणे व शिस्तशीर काम करण्याची सूचना

ICFAI विद्यापीठाच्या ई-पदवीदान समारंभात संबोधन

Posted On: 26 NOV 2020 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  26 नोव्हेंबर 2020

आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करून ती अधिकाधिक मूल्याधारित, अध्यात्मिक आणि परिपूर्ण बनवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी आज विद्यापीठे आणि शिक्षण तज्ञांना केले.

ICFAI विद्यापीठाच्या तेराव्या ई-पदवीदान समारंभात दूरस्थ पद्धतीने संबोधित करताना आज उपराष्ट्रपतींनी शिक्षण तज्ञांनी आपल्या अध्यात्मिक वैदिक शिक्षण परंपरेतून स्फूर्ती घेऊन नवीन शैक्षणिक धोरणामागील दृष्टिकोन समजून घ्यावा असे सांगितले.

गुरु रवींद्रनाथ टागोरांना उद्धृत करत उपराष्ट्रपती म्हणाले की मूल्य नसलेले शिक्षण म्हणजे शिक्षण नसल्यासारखेच आहे. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांनी फक्त पदवीधारक तयार करु नये तर सुघड आणि सह्रदय व्यक्ती तयार करणे अपेक्षित आहे, असं ते म्हणाले.  पगाराच्या शर्यतीत या गोष्टीकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हवामान बदलाचे उदाहरण देत नायडू म्हणाले की या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी अध्यात्मिक उत्तरे ही निसर्गाचा आदर करणाऱ्या मूल्याधारित शिक्षणात अंतर्भूत असावीत. आपल्या अभियंत्यांनी, तंत्रज्ञांनी पुढे येत संशोधन आणि चौकटीबाहेरचा विचार करत अशा टोकाच्या हवामानाशी संबधित घटनांनी उभे केलेले आव्हान स्वीकारून त्यासाठी नवीन संरक्षण साधने तसेच उपाययोजना शोधून काढायला हव्यात, यावर त्यांनी जोर दिला. निसर्गाच्या प्रकोपावर कोणतेही मानवी उपाय पुरे पडणार नाहीत पण आपल्याला त्याचे परिणाम निश्चितच कमी करता येतील असं ते म्हणाले.

आपल्या पुरातन व्यवस्थेत ही मुल्ये अंतर्भूत होती हे नमूद करताना उपराष्ट्रपती म्हणाले आपले वेद आणि उपनिषदे यांनी आपण स्वत:, कुटुंब, समाज आणि निसर्ग यांच्या प्रति असलेली आपली कर्तव्ये निर्धारित केली आहेत. आपल्याला निसर्गाशी मिळून मिसळून राहण्यास शिकवले आहे,

कोणाच्याही आयुष्यातील निसर्गाचे आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना निसर्गापासून शिकण्यास आणि पुरातन संस्कृतीत अंतर्भाव असलेल्या मूल्यांचे पालन करण्यास सांगितले.

गुरुकुल पद्धतीची प्रशंसा करताना नायडू म्हणाले की ते शिक्षण सर्व दृष्टीने परिपूर्ण होते आणि त्यामुळेच आपल्याला त्यावेळी विश्वगुरू असे नामाभिधान मिळाले होते.

ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा या आदर्शांचा आदर करत आणि पुन्हा एकदा भारताला विश्वगुरू बनवण्याचे ध्येय बाळगून आहे.

नवीन शैक्षणिक धोरण(NEP),  करू पहात असलेला आमूलाग्र बदल अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की यामुळे शिक्षणातील कप्पेबंद दृष्टिकोण दूर होईल आणि सर्वंकष दृष्टिकोन अवलंबिला जाईल.

नवीन शैक्षणिक धोरणाचे वर्णन ‘सर्वाधिक अत्यावश्यक सुधारणा’ असं करून त्यांनी. विविध शाखिय शिक्षण पद्धत हे या धोरणाचे लक्ष्य असल्याचे तसेच संशोधन आणि नियामक यंत्रणा पुनर्बांधणी करण्याचे प्रयत्न असलेल्या या धोरणाची प्रशंसा केली.

मुल्याधारित शिक्षणाची सांगड तंत्रज्ञानाशी घालणे ही काळाची गरज आहे असे सांगून ते म्हणाले आपल्याला फक्त नवीन तंत्रज्ञानाशी चांगले परिचित असलेले नव्हे तर सहृदयी आणि समजूतदार व्यावसायिक हवे आहेत.

मुल्ये हा ज्या शिक्षणाचा पाया असतो ते शिक्षण फक्त मोठे आणि समृद्ध करिअरच बहाल करत नाही तर ही मुल्ये बहाल करत असलेल्या भावनिक हुशारीमुळे जीवनातल्या कोणत्याही कठीण परिस्थितीशी झगडण्याची शक्ती या व्यक्तीमध्ये आलेली असते.

विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टिको बाळगून  आणि त्यादृष्टीने गंभीरपणे व शिस्तीने प्रयत्न केल्यास त्यांना जीवनाचे लक्ष्य गाठता करता येते, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

विद्यापिठांनी विद्यार्थ्यांना खऱ्या जगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करावे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. यावेळी त्यांनी कोविड-19चे उदाहरण दिले व याचा सामना करण्यासाठी सर्वच देश बेसावध होती असे सांगितले. आपल्याला या महामारीपासून धडा शिकणे आवश्यक आहे त्याच बरोबर तज्ञांनी एकत्र येऊन भविष्यात अशा तऱ्हेची समस्या उद्भवल्यास काय करायला हवे, यावर मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.

उपराष्ट्रपती विद्यार्थ्याना म्हणाले कोविड महामारी ही सध्या त्यांच्या पुढील सर्वात मोठी प्रतिकूलता आहे. तरीही त्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत संकट उगाळत न बसता  संधी निर्माण करावी. तुमच्यापैकी रोजगारदाते होण्याची इच्छा बाळगतात त्यांच्या कल्पना राबविण्यास  सध्याचा भारत हे सर्वोत्कृष्ट स्थान आहे. कारण हा देश आता पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टीकोनातून साकार होत आहे.

विद्यार्थ्यांनी इतर कशाही पेक्षा देशकार्य हे सर्वोच्च स्थानी ठेवले पाहिजे असे सांगत उपराष्ट्रपतींनी त्यांना सामाजिक तसेच विकासात खीळ घालणाऱ्या इतर दुष्प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी पुढे येण्याचे आणि देशाला सर्वच आघाड्यांवर पुढे नेण्याचे आवाहन केले.

ICFAIसमूहाचे अध्यक्ष एन. जे. यशस्वी यांची प्रशंसा करताना उपराष्ट्रपतीनी हे विद्यापीठ या भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देत असल्याचे नमूद केले.

सिक्किमचे राज्यपाल गंगाप्रसाद, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, सिक्किमचे शिक्षणमंत्री कुंगानिमल लेपचा, खासदार अच्युत सामंता, श्री श्री रवीशंकरजी, सिक्किमचे मुख्य सचिव एस सी गुप्ता, ICFAI विद्यापिठाचे कुलगुरू आर पी कौशिक, आणि विद्यार्थी तसेच पालक या ई-पदवीदान सोहळ्याला उपस्थित होते.

संपूर्ण भाषणाची लिंक येथे आहे.

 

 

 

U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676026) Visitor Counter : 317