दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

‘कोविड-19 शी लढा देण्यासाठी आपल्या मानसिक आरोग्याची घ्या काळजी’या विषयावरील विशेष कॅन्सलेशन तिकीटाचे प्रकाशन

Posted On: 09 NOV 2020 8:20PM by PIB Mumbai

गोवा, 9 नोव्‍हेंबर 2020


“कोविड-19 शी लढा देण्यासाठी आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या’ या विषयावरील एक विशेष लिफाफा आणि कॅन्सलेशन तिकीटाचे गोवा टपाल कार्यालयाने प्रकाशन केले. पणजी इथल्या टपाल भवनातील मुख्य सभागृहात आज हा कार्यक्रम झाला. गोवा फिल्टेलिक आणि न्यूमिझमॅटिक सोसायटी- या प्राचीन चलन तसेच टपाल तिकीट संग्राहक संस्थेने हा लिफाफा आणि कॅन्सलेशन पुरस्कृत केला आहे.

याशिवाय, गोवा टपाल कार्यालयाने, “कोविडशी लढा देण्यासाठी संपर्क शोधण्यात सहभागी व्हा” या घोषणेचे आणखी एक कॅन्सलेशन तिकीटही जारी केले असून त्यावर संपर्काचा माग आणि आरोग्य सेतू ही चित्रे आहेत. कोविड-19 बाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. कोविडच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रभावी उपाय असून, याद्वारे रुग्ण आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन, आजाराचा फैलाव रोखता येऊ शकतो. यात रूग्णांना अलगीकरणात आणि संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात राहण्याच्या सूचना देणे याचाही समावेश आहे.  

गोवा टपाल विभागाच्या पणजी कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक, डॉ सुधीर जाखेरे आणि सायकायट्रिक सोसायटी ऑफ गोवा चे अध्यक्ष डॉ अभिजित नाडकर्णी या दोन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लिफाफा आणि विशेष कॅन्सलेशन चे प्रकाशन झाले. यावेळी गोवा फिल्टेलिक आणि न्यूमिझमॅटिक सोसायटीचे सचिव, आश्लेष कामत आणि टपाल विभागातील अधिकारी  उपस्थित होते.

“कोविड-19 शी लढा देण्यासाठी आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या’ हे रुपेरी कॅन्सलेशन असून या विशेष लिफाफ्याची किंमत 25 रुपये आहे आणि ते पणजीच्या मुख्य टपाल कार्यालयात फिलाटेली  काउंटरवर  आजपासून विक्रीस उपलब्ध आहे.  

“कोविडशी लढा देण्यासाठी संपर्क शोधण्यात सहभागी व्हा”  या विशेष कॅन्सलेशनचा शिक्का पणजी आणि  मडगावच्या टपाल कार्यालयातल्या सर्व वस्तूंवर मारण्यात आला आहे. पणजीच्या मुख्य कार्यालयात हे विशेष कॅन्सलेशन आजपासून पाच दिवस लाल रंगात आणि त्यानंतरचे पाच दिवस हिरव्या रंगात उपलब्ध असेल.
 

* * *

JPS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1671513) Visitor Counter : 153


Read this release in: English