अल्पसंख्यांक मंत्रालय
हज यात्रा 2021 साठी सौदी अरेबिया सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल: मुख्तार अब्बास नक्वी
हज यात्रा 2021 साठीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया आजपासून सुरु
Posted On:
07 NOV 2020 3:54PM by PIB Mumbai
हज यात्रा 2021 साठीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत ही घोषणा करतांना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हज यात्रेच्या नियमात झालेल्या महत्वपूर्ण बदलांची माहितीही दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर, हज यात्रा 2021 साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. यात्रेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2020 असून हे अर्ज ऑनलाईन, ऑफलाईन किंवा हज मोबाईल ॲप वरून करता येणार आहेत, अशी माहिती नक्वी यांनी दिली.
हज यात्रा 2021 जून-जुलै महिन्यात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, या यात्रेसाठीची संपूर्ण प्रक्रिया सौदी अरेबिया सरकार आणि भारत सरकारने जारी केलेल्या आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुनच पूर्ण केली जात आहे, असे नक्वी यांनी सांगितले.
कोविड महामारीची साथ आल्यानंतर, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि इतर सबंधित मंत्रालयांसह सौदी अरेबियातील भारतीय दूतावास आणि जेद्दा येथील महावाणिज्य दुतावासाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होऊन, 2021 साठीची नोंदणी प्रक्रिया ठरवण्यात आली आहे.
सध्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन, हजसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे,त्यानुसार, विशेष नियम, आरोग्य आणि वयाची बंधने, पात्रतेचे निकष या सर्व नियमात बदल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
हजच्या संपूर्ण प्रवासातही कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष बदल करण्यात आले आहेत. यात निवास व्यवस्था, धर्मस्थळी राहण्याचा कालावधी, वाहतूक, आरोग्य आणि इतर सुविधांचा समावेश आहे.
हज यात्रा 2021 साठी सौदी अरेबिया सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.प्रत्येक यात्रेकरूला प्रवासाला निघण्याच्या 72 तास आधी, कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असेल. तसेच त्यांना आपली PCR चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र, प्रवासापूर्वीच सादर करावे लागेल.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही यात्रा सुरु करण्यासाठीची ठिकाणे, आता दहापर्यंत कमी करण्यात आली आहेत.याआधी 21 ठिकाणांहून ही यात्रा सुरु करता येत असे. मात्र आता मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोचीन, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि श्रीनगर या ठिकाणांहून ही यात्रा सुरु करता येईल. मुंबई केंद्रावरुन महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, दमण आणि दीव तसेच दादरा नगरहवेली येथील यात्रेकरू बसू शकतील.
ज्या मुस्लीम महिलांनी 2020 साली ‘मेहरम’ (पुरुष सहप्रवासी) शिवाय यात्रा करण्यासाठी अर्ज केले होते, त्यांचे अर्ज 2021 साठीही वैध असतील, त्याशिवाय इतर महिलांचे नवे अर्जही स्वीकारले जातील. तसेच मेहरम शिवाय यात्रा करु इच्छीणाऱ्या सर्व महिलांना लॉटरी पद्धतीतून सवलत दिली जाईल.
सौदी अरेबियाचे मुंबईतील उपमहावाणिज्य दूत, मोहम्मद अब्दुल करीम अल-एन्काझी, अल्पसंख्याक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय हज समितीचे कार्यकारी प्रमुख एम ए खान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
M.ChopadeR.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670960)
Visitor Counter : 181