आयुष मंत्रालय
‘‘महात्मा गांधी- द हिलर’’ या संकल्पनेवर आधारित वेबिनार मालिकेचे 48 दिवस थेट प्रक्षेपण करणार, 48 दिवसांच्या वेबथॉन कार्यक्रमाचे कर्टन रेझर सादर
Posted On:
01 OCT 2020 11:26PM by PIB Mumbai
मुंबई/ पुणे, 1 ऑक्टोबर 2020
पुण्याची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (एनआयएन) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आउटरिच ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 48 दिवसांच्या वेबथॉन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गांधी जयंतीनिमित्त दि. 2 ऑक्टोबर पासून सुरू होणा-या या वेबथॉन कार्यक्रमाच्या कर्टन रेझरचे आयोजन आज करण्यात आले होते.
‘‘महात्मा गांधी- द हिलर’’ या संकल्पनेवर आधारित या 48 वेबिनारचे प्रसारण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या फेसबुक पेजवर 48 दिवस दररोज सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या वेबनारचे प्रसारण करण्यात येणार आहे. यासाठी संकेतस्थळ पुढील प्रमाणे आहे.
https://facebook.com/punenin
या वेबिनारमध्ये महात्मा गांधी यांचे निसर्गोपचाराविषयीचे तसेच आरोग्य, पोषण याविषयीचे विचार 21 व्या शतकातल्या लोकांनाही कसे लागू पडतात, याची माहिती देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालिका डॉ. के. सत्यलक्ष्मी यांचे स्वागतपर भाषण झाले. या वेबथॉनमध्ये गांधी तत्वज्ञान आणि निसर्गोपचारचे पुरस्कर्ते असलेल्या श्रेष्ठ 48 व्यक्तींचा परिचय करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर चर्चात्मक आणि सादरीकरणाच्या माध्यमातून वेबिनार घेण्यात येणार आहे.
गांधी कथा, गांधी भजन यांचे दुर्मिळ चित्रीकरणही यामध्ये दाखविण्यात येणार आहे. यावेळी प्रा. आर.के. मुटाटकर यांचे भाषण झाले. गांधींजींनी कुष्ठरूग्णांसाठी केलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव पी.एन रणजित कुमार यांनी गांधीजींचे विचार, धोरणे यांचा कोविड-19 सारख्या महामारीच्या काळात लढा देण्यासाठी किती उपयोग झाला, याविषयी मनोगत व्यक्त केले. या महामारीच्या काळात लोकांमध्ये आरोग्यविषयक जाणिवा जागृत झाल्या. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करण्याची गरजही सर्वांना लक्षात आली, असेही त्यांनी सांगितले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आउटरिच ब्युरो महाराष्ट्र आणि गोवाचे महा संचालक मनीष देसाई यावेळी म्हणाले, महात्मा गांधी यांचा भोजन-अन्न आणि पोषण यांच्याविषयी गाढा अभ्यास होता, हे फारच कमी जणांना माहिती आहे. आत्मनिर्भरता आणि शाश्वत जीवनशैली यांची ओळख महात्मा गांधी यांनी अनेक वर्षांपूर्वीच सर्वांना करून दिली आहे, असेही देसाई यांनी नमूद केले.
महात्मा गांधीजींनी अन्नसुरक्षेच्या संकल्पनेचाही प्रचार केला होता. लोकांची होणारी उपासमार आणि कुपोषणाची समस्या कमी करण्याची नितांत गरज आहे, यावर त्यांनी भर दिला होता. गाव पातळीवर स्वावलंबी बनणे आवश्यक आहे, याचा त्यांनी प्रसार केला. तसेच भोजन-अन्नाच्या बाबतीतही आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच पुरेसे पोषकद्रव्ये मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवर जे पिकते त्या अन्नाचे सेवन करण्यात यावे, याचा पुरस्कार गांधीजींनी केला. ही आत्मनिर्भरतेची संकल्पना, त्यांनी मांडली होती. आत्मनिर्भर हा शब्द अलिकडे जास्त वापरण्यात येत आहे, मात्र गांधींजींनी शाश्वत जीवनशैली या अर्थाने त्या काळात ही संकल्पना मांडली होती, असेही मनीष देसाई यांनी यावेळी सांगितले.
आयुष मंत्रालयाच्या योग आणि निसर्गोपचार विभागाचे संचालक विक्रम सिंह यांनी आभार मानले.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660853)
Visitor Counter : 120