नौवहन मंत्रालय

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांचा मोडीत निघालेल्या आयएनएस विराट या जहाजाला गुजरात मधील अलंग येथे निरोप


विराट बजावत असलेले सेवाकर्तव्य येथेच संपत नाही तर अजूनही अलंगमधील हजारोंना ती रोजगार देत राहिल : मांडविय

Posted On: 28 SEP 2020 11:38AM by PIB Mumbai

 

केंद्रीय नौकानयन(स्वतंत्र कार्यभार), रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आज गुजरात मधील अलंग येथे एका समारंभात मोडीत निघालेल्या आयएनएस विराट या जहाजाला निरोप दिला. आयएनएस विराट ही भारतीय नौदलात तीस वर्षे सेवा बजावून अलंग येथे पुनर्वापर प्रक्रियेसाठी आणली गेली आहे.

भारतीय नौदलात 30 वर्षे कामगिरी बजावलेली विराट ही सर्वात जास्त काळ सेवा बजावणारी युद्धनौका आहे. असे मांडविय यांनी आपल्या भाषणात सांगितले.  जगातील सर्वात मोठे जहाज पुनर्वापर प्रक्रिया केंद्र असणाऱ्या अलंग या जागी आणल्यामुळे  विराटचा प्रवास पुढेही सुरूच राहील, असेही त्यांनी नमूद केले. इथे यामुळे हजारएक लोकांना रोजगार मिळेल. विराटचे संग्रहालयात रुपांतर करण्याबाबत अनेक योजना सुचवल्या गेल्या परंतू एकही योजना व्यवस्थित अभ्यासाअंती तयार केलेली नव्हती तसेच आर्थिकदृष्ट्याही अमलात आणण्याजोगी नसल्याने त्या प्रत्यक्षात आणता आल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या या संबधात काही योजना सरकारच्या विचाराधीन आहेत, जेणे करुन भविष्यात कालावधी संपलेल्या युद्धनौकांचे संग्रहालयात रुपांतर करता येणे शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले. लोथल येथे आकार घेत असलेल्या, हडप्पा संस्कृतीचे पुनर्निमाण दाखवणाऱ्या अत्याधुनिक संग्रहालयाचाही त्यांनी उल्लेख केला.

जहाज पुनर्वापर पर्यावरणपूरक प्रक्रिया या संबधी हाँगकाँग आंतरराष्ट्रीय ठराव 2009 या 28 नोव्हेंबर 2019 ला झालेल्या कराराअन्वये जहाज पुनर्वापर पर्यावरणपूरक प्रक्रिया करण्याच्या उद्योगासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत भारताने बाजी मारून जहाज पुनर्वापर पर्यावरणपूरक पद्धत यासंबधी कायदा 2019 मंजूर केला, असेही ते म्हणाले. हाँगकाँग आंतरराष्ट्रीय ठरावाला पाठिंबा देत जहाज पुनर्वापर पर्यावरणपूरक प्रक्रिया कायदा लागू करण्यामुळे भारताचा जहाज पुनर्वापर उद्योग हा पर्यावरणपूरक म्हणून जगभर ओळखला जाईल आणि पर्यावरणपूरकता तसेच सुरक्षितता यामुळे बाजारपेठेत या भारतीय उद्योगाची ओळख होईल, असेही ते म्हणाले. यामुळेच रोजगार हमी आणि व्यापारातील संधी यासोबतच गोदीमधील कामगारांना योग्य प्रमाणात सुरक्षिततेचीही खात्री मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गुजरातचे शिक्षणमंत्री भुपेंद्र  सिंग चुडासामा, आमदार विभावरीबेन दवे, पोरबंदर नौदल अधिकारी पुर्वीर दास यांसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

 

आयएनएस विराटबद्दल

आय एस विराट या मोहक युद्धनौकेने भारतीय नौदलात 30 वर्ष तर रॉयल नेव्हीत 27 वर्ष सेवा बजावली आणि 6 मार्च 2017 ला निवृत्त झाली. जगातली सर्वात जास्त कार्यकाळ बजावणारी सगळ्यात मोठी युद्धनौका म्हणून विराटने गिनेस बुक'मध्ये स्थान मिळवले आहे. गेल्या तीन दशकात 22,622 पेक्षा जास्त वेळा विमानांनी तिच्या वरून उड्डाण केले आहे. तसेच 2252 दिवस समुद्रात घालवत या नौकेने 5, 88, 287 नॉटिकल मैल इतका प्रवास केला आहे. म्हणजेच विराटने सात वर्ष समुद्रात काढली तर 27 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घातली. 1987 पासून 22 कप्तानांची तिच्यावर नेमणूक झाली. नौदलात कामगिरीवर रुजू झाल्यापासून ती नौदलाचे भूषण ठरली होती. जवळपास 5 नौदल प्रमुखांसह,  40  अधिकारी ह्यांनी आपला कार्यकाळ तिच्या कुशीत काढला.

 

अलंग

अलंग हा जगातील सगळ्यात मोठा जहाज पुनर्वापर प्रक्रिया परिसर आहे, ज्यामध्ये वर्षाकाठी जगातील 30 टक्के जहाजांची मोडतोड होते. हा उद्योग जवळजवळ तीस हजार लोकांना रोजगार पुरवतो यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील पण प्रामुख्याने ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि गुजरात मधील कामगार आहेत. याशिवाय वेगवेगळ्या संबंधित उद्योगातून साडेतीन लाख लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळतो.

*****

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659979) अभ्यागत कक्ष : 82
Read this releasein: English , हिन्दी