अणुऊर्जा विभाग
अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिव डॉ. शेखर बसू यांचे निधन
Posted On:
24 SEP 2020 5:25PM by PIB Mumbai
मुंबई, 24 सप्टेंबर 2020
अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिव डॉ. शेखर बसू यांचे आज सकाळी(24 सप्टेंबर,2020) कोलकाता येथे निधन झाले. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
डॉ. बसू भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे (डीएई) ऑक्टोबर 2015 पासून सप्टेंबर 2018 पर्यंत सचिव होते. त्यापूर्वी त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक म्हणून जून 2012 ते ऑक्टोबर 2015 पर्यंत जबाबदारी पार पाडली होती. याआधी त्यांनी ‘न्यूक्लीअर सबमरीन’ कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्य केले होते. नंतर त्याच संस्थेमध्ये अणु पुनर्वापर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले. उत्साही आणि अपार क्षमता असलेले धडाडीचे अभियंता असणारे डॉ. बसू यांनी अणुविज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रामध्ये भारताला आघाडीचा देश म्हणून प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
डॉ. बसू यांच्या कार्यामुळे अणुऊर्जा वापर, युरेनियम आणि खनिजांचा शोध, आरोग्य दक्षता आणि मेगा सायन्स प्रकल्पांच्या उभारणीला गती मिळाली. ‘10 पीएचडब्ल्यूआर’ आणि ‘पीडब्ल्यूआर’ या महत्वपूर्ण प्रकल्पांना त्यांच्या प्रयत्नांमुळे शासकीय मान्यता मिळू शकली. त्यामुळे अणु ऊर्जा केंद्राच्या स्थापित क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी मोठी चालना मिळाली.
बिहारमधल्या मुझफ्फरपूर येथे 1952 मध्ये डॉ. बसू यांचा जन्म झाला होता. कोलकात्याच्या सरकारी शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. तर मुंबई विद्यापीठाच्या व्हीजेटीआय महाविद्यालयातून त्यांनी 1974 मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली. अणुविज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयामध्ये बीएआरसीच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून एक वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी न्यूक्लीअर सबमरीन प्रोपल्शन प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यामध्ये यश मिळवले. त्याच्याच जोडीला त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अणु पुनर्वापर प्रकल्पाविषयी काम सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम सुरळीत करून त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी एकीकृत अणु पुनर्वापर प्रकल्पाची संरचना आणि बांधकाम करण्याचे मोठे आव्हान स्वीकारले. असे काम भारतामध्ये पहिल्यांदाच झाले होते. अणुऊर्जा क्षेत्रामध्ये डॉ. बसू यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे अणु तंत्रज्ञान वापरामध्ये परिपूर्णता आली आणि देशाच्या अणु कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली.
डॉ. बसू यांच्याकडे एकाचवेळी अनेक तंत्रज्ञान विकसित करण्याची अतुलनीय क्षमता होती. त्यांनी भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी दिलेले महत्वपूर्ण योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना 2014 मध्ये पद्मश्री सन्मानाने गौरविले होते. त्यांनी विकसित केलेला वैद्यकीय समस्थानिक उत्पादनासांठी सायक्लोट्रोन तंत्रज्ञानाचा विकास हा अखेरचा प्रकल्प ठरला.
M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658811)
Visitor Counter : 2505