आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

ऑक्सिजन उपलब्धता आणि वापरासह कोविड व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी वाणीज्य आणि उद्योग मंत्रालयाची 12 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा

Posted On: 19 SEP 2020 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2020


कोविड-19 महामारीचा प्रभावी प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारच्या समन्वयाने राबवल्या जाणाऱ्या धोरणाचा भाग म्हणून आज केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च स्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

नीती आयोग सदस्य( आरोग्य), केंद्रीय आरोग्य सचिव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि 12 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव या बैठकीत सहभागी झाले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, ओदिशा, चंदीगड, तेलंगण, केरळ, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम बंगाल या 12 राज्यांचा/ केंद्रशासित प्रदेशांचा या बैठकीत सहभाग होता. देशातील एकूण कोविड रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णसंख्या या राज्यांमध्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. वाणीज्य आणि उद्योगमंत्र्यांनी या राज्यांना संबोधित केले आणि या राज्यांमधील ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. जिल्हा पातळी आणि आरोग्य केंद्रांच्या पातळीवरील ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे मूल्यमापन करण्यावर आणि प्रभावी नियोजन आणि ऑक्सिजनच्या वाहतुकीसंदर्भातील मुद्यांचे निरसन करण्यावर भर देण्याची विनंती वाणीज्य मंत्र्यांनी विशेषत्वाने या राज्यांना केली. रोग नियंत्रणासाठी करत असलेल्या प्रभावी उपाययोजनांच्या माहितीची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केली जेणेकरून त्यांचा अवलंब  ही राज्ये/ केंद्रशासित प्रदेश करू शकतील.

चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्याबद्दल मंत्रिमंडळ सचिवांनी या राज्यांची प्रशंसा करत असतानाच, अद्यापही बऱ्याच राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त मृत्यूदर असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मृत्यूदराचे जिल्हानिहाय आणि रुग्णालय निहाय मूल्यमापन करण्याचे आणि त्यानुसार जास्त लक्ष देण्याची गरज असलेले भाग निर्धारित करण्याचे त्यांनी आवाहन केले. आरटी- पीसीआर क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यावर भर देण्याची देखील त्यांनी सूचना केली. रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये निगेटिव्ह असलेला मात्र लक्षणे असलेला कोणताही रुग्ण उपचारांमधून वगळला जाऊ नये याची खातरजमा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अशा सर्व रुग्णांची तपासणी आरटी- पीसीआर चाचणीने प्राधान्याने केलीज पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या सर्व राज्यांमध्ये केल्या जात असलेल्या चाचण्या, त्यांचा पॉझिटिव्हिटीचा दर आणि त्यांचा दैनंदिन सरासरी सीएफआर, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि जिल्हानिहाय ऑक्सिजनची उपलब्धता या मुद्यांवर विशेष भर देत केंद्रीय आरोग्य सचिवांनी त्याबाबतच्या स्थितीचे तपशीलवार सादरीकरण केले.

 

* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1656756) Visitor Counter : 244