आयुष मंत्रालय
भारतीय औषध प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उचललेली पावले
Posted On:
18 SEP 2020 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2020
वैश्विक स्तरावर भारतीय औषध प्रणालीच्या शिक्षणाला आणि आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाने परदेशी शिक्षण संस्था आणि विद्यापीठांबरोबर 13 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. या करारानुसार आयुष मंत्रालयाच्यावतीने त्या परदेशातल्या शैक्षणिक संस्थांमधे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच संशोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. पारंपरिक चिकित्सा आणि होमिऑपॅथी क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी विविध 23 देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण अशा विविध प्रकारे सहकार्य करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाच्यावतीने शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 104 जणांना दरवर्षी पात्र परदेशी उमेदवारांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यानुसार विविध 99 देशातले विद्यार्थी भारतामध्ये येवून मान्यवर संस्थांमध्ये प्रवेश घेवून भारतीय वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी पदवी प्राप्त करू शकणार आहेत. परदेशामध्ये भारतीय पारंपरिक औषध पद्धतींना मान्यता मिळावी, यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
आयुष मंत्रालयाने योग व्यावसायिकांसाठी ऐच्छिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामुळे योग व्यावसायिकांची क्षमता प्रमाणित करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातून औषधोपचाराविना आरोग्यवर्धन उपचार प्रणालीला प्रोत्साहन मिळणार आहे. प्रमाणित, अधिकृत योग व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचाही यामागे हेतू आहे. या सर्व क्रियांमध्ये एकरूपता आणण्याच्या उद्देशाने योग प्रमाणन मंडळ (वायसीबी) स्थापण्यात आले आहे. या माध्यमातून जगभरातल्या योग व्यावसायिकांच्या ज्ञान आणि कौशल्यांमध्ये समन्वय साधणे, गुणवत्ता कायम राखण्याचे काम करण्यात येत आहे.
पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून भारतीय औषधांना असलेले महत्व लक्षात घेवून दरवर्षी देशात आयुर्वेद दिन, युनानी दिन आणि सिद्ध दिन साजरे केले जातात. जगभरातल्या 190 देशांमध्ये दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. तर 35 पेक्षाही जास्त देशांमध्ये आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. आयुष मंत्रालयाच्यावतीनेही 2015पासून आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.
भारतीय औषध प्रणालीच्या संवर्धन आणि विकासासाठी केंद्र सरकार पुरस्कृत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या सहकार्याने राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम) राबविण्यात येत आहे. आयुष ग्राम संकल्पनेमध्ये, आयुष आधारित जीवनशैली, वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी संवाद साधणे, ग्रामीण आरोग्य कर्मचा-यांना स्थानिक औषधी वनस्पतींचा परिचय करून देण्यासाठी प्रशिक्षित करणे आणि आयुष आरोग्य सेवांच्या तरतुदीनुसार प्रोत्साहन दिले जात आहे.
आयुषच्यावतीने माहिती, शिक्षण आणि प्रसारण या कार्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आरोग्य शिबिरांसारखे उपक्रम घेण्यात येत आहे. विविध प्रसार माध्यमांतून जाहिरात करणे, दृक-श्राव्य सामुग्रीचे वितरण करण्यासाठी आवश्यक तयारी आयुष मंत्रालयामार्फत करण्यात येत आहे. तसेच आयुष विषयांशी संबंधित विषयांवर चर्चासत्रे, परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळामध्ये आयुष मंत्रालयाने जाहिरात प्रसारण आणि आरोग्य विषयक कार्यक्रमांसाठी इलेक्ट्राॅनिक आणि डिजिटल प्रसार माध्यमांचा जास्तीत जास्त वापर केला आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार संवर्धन योजनेनुसार आयुष मंत्रालयाने आयुर्वेद आणि आयुष औषधांविषयी संपूर्ण जगभरामध्ये जाहिरात आणि प्रचार करण्यासाठी पावले उचलली आहेत. आयुष प्रणाली प्रचार आणि प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय बैठक, परिषद,प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे यांच्यासाठी आयुष तज्ज्ञांना परदेशात पाठवले. तिथे त्यांनी कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून वैज्ञानिक संशोधन पत्रिकांचे सादरीकरण केले. यासाठी आयुष मंत्रालयाने आर्थिक मदत देण्यात आली.
आयुष औषधांचे उत्पादक, उद्योजक, आयुष संस्था यांच्या प्रणालीविषयी जनजागृती करण्यासाठी-1. आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, परिषदा, कार्यशाळा, व्यापारी मेळावे यांना प्रोत्साहन दिले जात आहे. 2. आयुष उत्पाादनांची परदेशातल्या नियामक अधिका-यांकडे नोंदणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत जवळपास 50 पेक्षा जास्त युनानी आणि आयुर्वेदिक उत्पादनांची परदेशात नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये केनिया, अमेरिका, रशिया, लॅटविया, कॅनडा, ओमान, ताजिकिस्तान आणि श्रीलंका या आठ देशांमध्ये नोंदणी केली आहे.
आयुष प्रणालीची अधिकृत माहिती प्रसारित करण्यासाठी 31 देशांमध्ये एकूण 33 आयुष माहिती कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाने आयुर्वेद आणि सिद्ध यामधल्या दोन तज्ज्ञांची नियुक्ती मलेशियातल्या पोर्ट डिक्सन रूग्णालय आणि चेरस पुनर्वसन रुग्णालयामध्ये केली आहे. ही सेवा परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने आयटीईसी कार्यक्रमा अंतर्गत आयुष मंत्रालय देत आहे.
सर्वसमावेशक आणि सर्वांना परवडणारी उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी व्यापक समन्वयाचे धोरण निश्चित करण्यासाठी नीती आयोगाने एकात्मिक आरोग्य धोरण सल्लागार समिती स्थापन केली आहे. यामध्ये आधुनिक आणि पारंपरिक अशा एकात्मिक पद्धतींवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये रोग प्रतिबंधक आणि निरोगी आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. यासाठी आयुष मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाबरोबर सामंजस्य करार करून रेल्वेच्या क्षेत्रिय रूग्णालयांमध्ये आयुष विभाग स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. तसेच संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र लष्करी वैद्यकीय सेवा महासंचालनालयाच्या आरोग्य संस्थांमध्ये आयुर्वेदाचा सहभाग करण्यासाठीही सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656440)