आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची उपलब्धता
Posted On:
18 SEP 2020 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2020
संपूर्ण देशात आजमितीला 541 वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत, त्यापैकी 280 सरकारी आणि 261 खाजगी आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी 80,312 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकतो. यापैकी महाराष्ट्रात एकूण 56 वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून यामध्ये 25 सरकारी तर 31 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
गेल्या सहा वर्षांत देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 45 टक्क्याने वाढली आहे.वर्ष 2014 मध्ये देशात 381 वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत होती. त्याच सोबत या कालावधीत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश क्षमता देखील 48 टक्क्यापेक्षा जास्त वाढली आहे. वर्ष 2014 मध्ये या विद्यालयांची प्रवेश क्षमता 54.348 होती तर वर्ष 2020 मध्ये ती 80,312 झाली आहे. देशात ज्या भागात वैद्यकीय महाविद्यालयांची कमतरता आहे अशा भागांमध्ये जिल्हा किंवा संदर्भित रुग्णालयांशी जोडलेली नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय प्रायोजकता योजना सुरु केली आहे. सद्य परिस्थितीत या योजनेंतर्गत 157 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 43 महाविद्यालयांचे कामकाज सुरु झाले आहे.
आजच्या तारखेला, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमासाठीचे शुल्क संबंधित राज्य सरकारे निश्चित करतात. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शुल्क निश्चितीसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या दिशादर्शक तत्त्वांनुसार, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती काम करते. त्या त्या खाजगी संस्थेने आकारलेले शुल्क योग्य आहे की नाही यावर ही समिती निर्णय देते आणि समितीने याबाबत घेतलेला निर्णय लागू करणे संस्थेला बंधनकारक असते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
* * *
B.Gokhale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656383)
Visitor Counter : 191