श्रम आणि रोजगार मंत्रालय

गमावलेल्या रोजगाराची पुननिर्मिती

Posted On: 16 SEP 2020 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

कोविड-19 महामारीचा उद्रेक सर्वत्र झाल्यामुळे भारतासह जगाभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. टाळेबंदीमुळे देशामधले स्थलांतरीत कामगार मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी परतले आहेत. या आव्हानाला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. भारत सरकारने त्यासाठी 20 लाख कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, कार्यप्रणाली आणि विशिष्ट क्षेत्राची मागणी लक्षात घेवून त्यानुसार युवकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. 

सरकारने कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेवून त्याची झळ समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकाला बसू नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) सुरू केली आहे. या योजनेनुसार गरीबातल्या गरीबापर्यंत अन्नधान्य, तसेच आर्थिक मदत पोहोचविण्यात येत आहे. गरीब समाजाला काही खरेदी करायची असेल, तर त्यांना समस्या निर्माण होणार नाही, असा विचार करून ही मदत देण्यात आली आहे. 

‘पीएमजीकेवाय’अंतर्गत सरकारने ज्या कर्मचारी वर्गाचे वेतन 15,000 रुपयांपर्यंत  आहे, त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये मार्च ते ऑगस्ट 2020 या कालावधीमध्ये नियोक्तांचा 12 टक्के हिस्सा आणि कर्मचारी वर्गाचा 12 टक्के हिस्सा असा एकूण 24 टक्के निधी जमा केला आहे. 

वैधानिक भविष्य निर्वाह निधीमध्ये सर्व आस्थापनांच्या योगदानामध्ये तीन महिन्यांसाठी 12 टक्क्यांऐवजी 10 टक्के निधी देण्याची सवलत कोरोना काळामध्ये देण्यात आली होती.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांवरच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करून देशामध्ये रोजगार निर्मितीसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही तारणाविना 10 लाखांपर्यंत ऋण देण्याच्या योजनेअंतर्गत आता सूक्ष्म,लघु व्यवसाय करता येतील तसेच व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कर्ज देण्यात येत आहे. 

कोणत्याही तारणाविना खेळते भांडवल म्हणून 10,000 रुपये कर्जाची सुविधा देण्यात येत असून प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली आहे. 

देशातल्या अनेक कामगारांना कोरोना काळामध्ये रोजगार गमवावा लागला, त्यांना पुन्हा रोजगार मिळण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याविषयी सरकारने केेलेल्या प्रयत्नांची माहिती श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोषकुमार गंगवार यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये दिली.

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1655211) Visitor Counter : 135


Read this release in: English , Bengali , Assamese