आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्राने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांना संक्रमण साखळी तोडण्यावर आणि मृत्यु दर 1 टक्क्याखाली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करायला सांगितले.
Posted On:
05 SEP 2020 7:55PM by PIB Mumbai
जिथे कोविड रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येत आहे किंवा काही जिल्ह्यांमध्ये मृत्युदर अधिक आहे अशा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी आरोग्य मंत्रालय नियमितपणे संपर्क साधत आहे.
केंद्र सरकारने आज महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना संक्रमण साखळी तोडण्यासाठी आक्रमक उपाययोजना करण्यावर आणि मृत्युदर1 टक्क्याखाली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. चाचण्यांचे प्रमाण वाढवणे, मृत्युदर कमी राखण्यासाठी प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन आणि विविध स्तरांवर प्रभावी देखरेखीसह जीव वाचवण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये गेल्या 24 तासांत राष्ट्रीय स्तरावर नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी 46% सक्रिय रुग्ण आढळले आहेत . गेल्या 24 तासात नोंद झालेल्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 22 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत.
त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत देशभरात झालेल्या कोविड मृत्यूंपैकी 52% मृत्यू या तीन राज्यांमध्ये झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी एकट्या महाराष्ट्रात 35% मृत्यू झाले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रत्येक राज्यातील चिंता वाढवणारे जिल्हे अधोरेखित केले आहेत. महाराष्ट्रात, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा आणि पालघर हे जिल्हे अधोरेखित करण्यात आले असून या ठिकाणी प्रभावी नियंत्रण आणि संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याच्या गरजेवर भर देण्यात आला आहे .
आंध्र प्रदेशात, प्रकाशम आणि चित्तूर हे चिंता वाढवणारे जिल्हे म्हणून अधोरेखित करण्यात आले आणि सुविधानिहाय मृत्यूच्या दैनंदिन देखरेखीची आवश्यकता, रुग्णालयातील सुविधा बळकट करणे, आयसीयूची , ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणे आणि कार्यक्षम क्लिनिकल व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले आहे.
कर्नाटकात, कोप्पल, म्हैसूर, दावणगेरे आणि बेल्लारी या जिल्ह्यांत आरटी-पीसीआर चाचणी सुविधांचा चांगल्या प्रकारे उपयोग करावा, घरोघरी जाऊन सक्रिय रुग्णांचा शोध घेण्याचा आणि त्यांच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याची सूचना करण्यात आली आहे.
एकत्रित संख्येचा विचार केला तर, देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 60 % पेक्षा जास्त रुग्ण पाच राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे 25% सक्रिय रुग्ण आहेत, त्याखालोखाल आंध्र प्रदेश (12.06 %), कर्नाटक (11.71%), उत्तर प्रदेश (6.92 %) आणि तमिळनाडू (6.10 %) मध्ये रुग्ण आहेत.
यापैकी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यात सक्रिय रुग्णांपैकी जवळपास 49% रुग्ण आहेत आणि एकूण कोविड मृत्यूंपैकी 57% पेक्षा जास्त मृत्यू आहेत.
देशातील एकूण मृत्यूंपैकी 70% मृत्यू महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांमध्ये नोंदले गेले आहेत. एकूण मृत्यूंपैकी 37.33% एकट्या महाराष्ट्रातले आहेत.
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
M.Jaitly/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651649)
Visitor Counter : 259