Posted On:
20 MAY 2020 1:16PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मे 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 च्या रूग्णांना डिस्चार्ज म्हणजेच रूग्णालयातून सुट्टी देण्याच्या धोरणात बदल केला आहे. या सुधारित धोरणाची कोविड-19 च्या त्रिस्तरीय व्यवस्थापन आणि उपचार व्यवस्थेशी सांगड घालण्यात आली असून रुग्णाची अवस्था किती गंभीर आहे, यानुसार त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. जसे की, “सौम्य/अति सौम्य/ लक्षणे दिसण्यापूर्वीची अवस्था असलेल्या रुग्णांना कोविड केअर सुविधेत ठेवलं जाईल आणि त्यांचा ताप तसेच नाडीपरीक्षण नियमित स्वरुपात केले जाईल. लक्षणांची सुरुवात झाल्यापासून 10 दिवसांनंतर, आणि रुग्णाला सलग तीन दिवस ताप आला नाही, तर घरी सोडले जाऊ शकते. त्याला डिस्चार्ज देण्याआधी चाचणी करण्याची गरज नाही,” ज्या रूग्णांमध्ये सौन्य लक्षणे आहेत, त्यांचीही डिस्चार्ज देण्यापूर्वी पुन्हा चाचणी करणे गरजेचे नसल्याचे, सुधारित धोरणात म्हंटले आहे. त्यापुढे, डिस्चार्जच्या वेळी, रुग्णाला गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जाईल आणि सात दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्यासही सांगितले जाईल.
डिस्चार्ज धोरणात बदल करण्याच्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करतांना ICMR च्या ‘साथीचे आणि संसर्गजन्य आजार’ विभागाचे प्रमुख डॉ रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, आधी रुग्णांची RT-PCR चाचणी 24 तासांच्या कालावधीत दोनदा निगेटिव्ह आली तरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जात असे. मात्र, अनेक रुग्णांच्या बाबतीत असे आढळले की जे रुग्ण शारीरिकदृष्ट्या रूग्णालयातूनसुट्टी देण्यास सक्षम आहेत, त्यांच्या केवळ RT-PCR चाचण्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवून घेतले जात होते, असे गंगाखेडकर यांनी सांगितले. ‘सार्स- COV2’ चा विषाणू व्यक्तीच्या घशातल्या स्नायूपेशींमध्ये असतो ज्याचा जीवनकाल तीन महिनेही असू शकतो. हा विषाणू या पेशींमध्ये निष्क्रिय झाला तरीही, तिथून व्यक्तीचे जे स्वॅब नमुने चाचणीसाठी घेतले जातात, त्यात हा विषाणू आढळू शकतो. RT-PCR चाचण्या केवळ विषाणू शरीरात अस्तित्वात आहे की नाही, हे बघण्यासाठी केली जाते आणि विषाणू शरीरात सक्रीय असो वा निष्क्रिय, तो या चाचणीत आढळतोच,’ असे गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.
‘अभ्यासांती असे आढळले आहे की जर व्यक्तीच्या तीन दिवस शरीरात ताप किंवा इतर काही लक्षणे नसतील, तर हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या शरीरात निष्क्रिय झाला असतो’, असेही त्यांनी पुढे सांगितले. याच अनुषंगाने, हे ही लक्षात घेणे महत्वाचे आहे की केवळ सक्रीय विषाणूमुळेच संक्रमण होऊ शकते.’
या अभ्यासातून मिळालेल्या निष्कर्षानुसार, ICMR ने डिस्चार्ज धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला, असे गंगाखेडकर म्हणाले. “जे नमुने स्वॅबमधून घेतले जातात,त्यांची सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी केली जाते.जर तीन दिवसांनंतर जर या नमुन्यातील विषाणूंची संख्या वाढत नसेल तर असे समजता येते की हा विषाणू निष्क्रिय झाला आहे. हा निष्क्रिय विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होऊ शकतो, मात्र त्याच्यामुळे आजाराची सुरुवात होणार नाही.” असे ते म्हणाले.
नव्या धोरणात, व्यक्तीला डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवस गृह अलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामागची तार्किकता स्पष्ट करतांना, गंगाखेडकर यांनी सांगितले की रुग्णाला संसर्ग झाल्यानंतर लगेचच नाही, तर काही दिवसांनी तो रुग्णालयात दाखल होतो. त्यामुळेच 21 दिवसांचा इनक्यूबेशन पिरीयड आणि 10 दिवसांचा रुग्णालयातील कालावधी गृहीत धरुन सात दिवस गृह अलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे डॉ गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली एम्स चे संचालक, डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की आपल्याला जसजशी या विषाणूची अधिकाधिक माहिती कळते आहे, तसतसे आपण आपल्या धोरणात बदल करतो आहोत. आपल्याला रुग्णालयांवरचा ताण कमी करायचा आहे, त्याचवेळी सर्व लोकसंख्या आणि रुग्ण यांचेही संरक्षण करायचे आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यात असे आढळले की RT-PCR ही चाचणी, रुग्ण निगेटिव्ह आला की नाही, हा निष्कर्ष काढणारी गोल्ड स्टँडर्ड चाचणी आहे, त्यामुळे,त्याचा निष्कर्ष कदाचित खरा मानला जाऊ शकत नाही. कारण जो विषाणू निष्क्रिय/मृत झाला आहे, तो ही RT-PCR चाचणीत येऊ शकतो, मात्र ती व्यक्ती अ-संसर्गजन्य झाली असते. म्हणूनच, जर दहा दिवसांच्या कालावधीत सलग 3 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णाच्या शरीरात कुठलीही लक्षणे आढळली नाहीत, तर त्याला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, मात्र सात दिवस गृह अलगीकरणात राहण्याच्या सल्ल्यासह. यामुळे एकीकडे रूग्णाला घरी जातांना बरे वाटेल,त्याचवेळी दुसरीकडे रुग्णालयांवरचा भार कमी होईल.” आपण रोज या आजाराविषयी नवे काहीतरी शकतो आहे, असे त्यांनी नमूद केले. “ अगदी लक्षणे आढळण्यापूर्वीच्या अवस्थेतील रुग्णही संसर्ग पसरवू शकतात. कोविड-19 बाबत रोज येनाणारी नवनवी माहिती आपल्याला पुढची धोरणे ठरवण्यासाठी भविष्यात मार्गदर्शक ठरत राहील.’ असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही काळात, अनेक लक्षणपूर्व अवस्थेतील रुग्णांना 3-4 आठवडे रुग्णालयात ठेवण्यात आले कारण त्यांची RT-PCR चाचणी सातत्याने पॉझिटिव्ह येत होती. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार, हा विषाणू सात-आठ दिवसांनंतर शरीरात निष्क्रिय होऊन जातो. हा मृत विषाणू संक्रमण पसरवू शकत नाही. ICMR ने साधारण 2000 पेक्षा जास्त रुग्णांची आकडेवारी गोळा केली असून त्यानुसार, सरासरी सर्व रुग्णांची RT-PCR चाचणी संसर्गाची लक्षणे दिसायला लागल्याच्या दहाव्या दिवसांनंतर निगेटिव्ह आली होती. रूग्णांमध्ये सामान्यतः संसर्ग झाल्यानंतर 5 ते 7 दिवसांत लक्षणे दिसू लागतात. धोरणात केलेला बदल, संशोधनातील प्रगतीवर आधारित आहे, त्यामुळे या बदलाचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
त्रिस्तरीय उपचार व्यवस्थेची माहिती देतांना गुलेरिया यांनी सांगितले की, “80 टक्के रूग्णांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे असून त्यांची सुमारे 10 दिवसांसाठी रुग्णालयात काळजी घेण्याची गरज असते. काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी खालावते, ज्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. असे रुग्ण देखील पूर्ण बरे होऊ शकतात आणि त्यांनाही रूग्णालयातून सुट्टी दिली जाते. अगदी खूप कमी टक्के रुग्णांना अतिदक्षतेची गरज असते. अशा गंभीर आणि उच्च धोका असलेल्या रुग्णांच्या बाबतीत डिस्चार्ज आधी RT-PCR चाचणी करण्याचे जुनेच धोरण कायम राहील.”
मेदांता रुग्णालयाच्या ICU आणि क्रिटीकल केअर विभागाचे प्रमुख डॉ यतीन मेहता यांनीही या नव्या डिस्चार्ज धोरणाचे स्वागत केले आहे. प्रत्येक रुग्णाला लवकरात लवकर घरी जाण्याची इच्छा असते. आणि रुग्णालयात इतरही संसर्गित रुग्ण असल्याने धोका अधिक असतो, त्यामुळे वैद्यकीय निगा घेणे शक्य असेल, तर घरी राहणे अधिक सुरक्षित आहे, असे ते म्हणाले.
जोधपूर एम्सचे संचालक डॉ संजीव मिश्रा यांनीही या धोरणाचे स्वागत केले आहे. ज्या रुग्णांना 10 दिवसात डिस्चार्ज मिळतो आहे, त्या सर्वांनी पुढचे सात दिवस गृह अलगीकरणात राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
या आजाराविषयी समाजात जरा अधिक भीतीचे वातावरण आहे, अशी भावना, डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, रुग्णांना घरी पाठवण्यापूर्वी यांचे समुपदेशन केले जावे, अशी सूचना डॉक्टरांनी केली आहे. समाजानेही शांत राहून, न घाबरता, रुग्ण आणि त्यांच्या घरच्यांना योग्य वागणूक द्यायला हवी, अशी अपेक्षा डॉ मेहता यांनी व्यक्त केली. रुग्णांना नैराश्य आणि तणावातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com