विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सार्वजनिक वाहतुकीचा नवीन दृष्टिकोन

Posted On: 07 MAY 2020 7:41PM by PIB Mumbai

मुंबई-नवी दिल्‍ली, 7 मे 2020

 

कोविड-19 महामारीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने लागू केलेला लॉकडाऊन 17 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. वस्तू, सेवा आणि अर्थव्यवस्थेचा गाडा पूर्वपदावर येण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणे गरजेचे असले तरी प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखणे तितकेच महत्वाचे आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर लाखो प्रवासी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडतील अशी अपेक्षा असताना आता हा प्रसार कसा नियंत्रित करायचा हे सरकार समोर आव्हान आहे.

या पार्श्वभूमीवर, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अंतर्गत ‘सेंटर फॉर रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सीआरआरआय) ही प्रयोगशाळा सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी एक कृती आराखडा घेऊन आली आहे. सुरक्षित शारीरिक अंतर नियमांचा विचार करून सार्वजनिक वाहतूक आणि फीडर मोडच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये सीआरआरआयने सार्वजनिक वाहतुकीच्या प्रत्येक पध्दतीसाठी सुरक्षा उपायांचा मसुदा तयार केला आहे.

सीआरआरआयच्या अहवालानुसार, सध्या मेट्रो कार्यरत असलेली  10 शहरे आहेत - एकूण 700 किलोमीटरहून अधिक अंतरावर मेट्रोचे जाळे असून सुमारे 525 मेट्रो स्थानके आहेत. भारतात 1.6 दशलक्षहून अधिक बसेस नोंदणीकृत आहेत आणि सार्वजनिक बस क्षेत्र दररोज अंदाजे 1,70,000 बसद्वारे 7 कोटी प्रवासी वाहतूक करते.

लॉकडाऊन नंतर प्रसार नियंत्रित करण्यासाठी सीआरआरआय दोन भिन्न दृष्टिकोनांचे संयोजन सूचित करते.

दृष्टिकोन अ: सुरक्षित शारीरिक अंतर सक्षम करणार्‍या सुविधांची पुनर्रचना करणे.

  1. सुरक्षित शारीरिक अंतरासाठी चित्रखुणांव्दारे लोकांना बसस्थानक, पदपथ इत्यादींच्या आसपास आवश्यक अंतर राखण्यासाठी प्रोत्साहन.
  2. बस व मेट्रोमध्ये चढण्या/उतरण्यासाठी प्रवाशांचा वाट बघण्याच्या कालावधीत वाढ.
  3. बस आणि मेट्रोने प्रवास करताना चढण्या/उतरण्यासाठी स्वतंत्र दरवाजा.
  4. बस / मेट्रो मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मर्यादित करणे.
  5. बससेवेची क्षमता सुधारण्यासाठी बससाठी स्वतंत्र मार्गिका.

दृष्टीकोन ब: मागणी आणि क्षमता यातील वाढ कमी करणे.

  1. सार्वजनिक वाहतुकीची मागणी कमी करण्यासाठी छोट्या प्रवासासाठी सायकलींचा वापर तसेच सायकल रिक्षा, रिक्षा यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर.
  2. मोठी  गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक वर्दळीची दुकाने / बाजारपेठा / कार्यालये अधिक कालावधीसाठी उघडली पाहिजेत.
  3. 80 टक्केपर्यंत बस / मेट्रोसाठी आगाऊ नोंदणीला प्रोत्साहन द्या.
  4. ऑफिसला जाणाऱ्यांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवणे.

याव्यतिरिक्त, सीआरआरआयने पदपथ, मेट्रो स्थानक, बसस्थानक आणि त्याच्या आसपासच्या भागात ई-रिक्षा, रिक्षा आणि टॅक्सी यासह बस चालकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित शारीरिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

  1. पदपथ : प्रत्येक दिशेसाठी झेब्रा क्रॉसिंगचे दोन भागात विभाजन करून किंवा दोन स्वतंत्र झेब्रा क्रॉसिंग चिन्हांकित करणे. याद्वारे चौकांवर सुरक्षित शारीरिक अंतर सुनिश्चित करून पादचाऱ्यांमध्ये संसर्गावर नियंत्रण ठेवता येईल.
  2. मेट्रो : 
    1. विशिष्ट डब्यातील रिक्त जागांविषयी माहिती दर्शविणे.  प्रत्येक डब्यातील रिकाम्या असलेल्या जागांची संख्या संबंधित स्थानकांवर / डब्यांवर दर्शक फलकाद्वारे दर्शविली जावी.
    2. प्रवाशांनी टोकन / कार्ड्स वापरुन स्कॅनिंग मशीनला स्पर्श करणे टाळावे, त्याऐवजी त्यांनी ते स्कॅनिंग पॉईंटच्या किमान 10 मि.मी. अंतरावर ठेवावे.
  3. बस : बसमधून प्रवास करताना, एका बाकड्यावर फक्त एका व्यक्तीस परवानगी असावी. तसेच प्रवाशांनी त्यांच्या सह प्रवाशांच्या काटकोनात तिरपे बसले पाहिजे.
  4. बस चालक : बसमध्ये बसण्याची क्षमता मर्यादित करावी (प्रत्यक्ष क्षमतेच्या 50टक्के) तसेच, चालकाच्या कॉकपिट क्षेत्रात प्रवेश मर्यादित करावा.
  5. इ-रिक्षा, रिक्षा, टॅक्सी : इ-रिक्षा, रिक्षा, टॅक्सी संदर्भात वाहनचालकांना असे सूचित करण्यात येत आहे कि त्यांनी सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्यासाठी स्वतःमध्ये आणि प्रवाशांमध्ये तसेच बसलेल्या प्रवाशांमध्ये प्लास्टिकचा पत्रा लावावा.

कमी अंतराच्या प्रवासासाठी रिक्षा सारख्या सार्वजनिक वाहतूक पर्यायाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या जलद वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवावी.

नवीन जीवनशैलीसाठी मार्ग

सीआरआरआय मार्गदर्शक तत्त्वे येथे वाचली जाऊ शकतात. मार्गदर्शक सूचना जाहीर करताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “कोविड -19 नंतर समाजात एक नवीन जीवनशैली निर्माण होईल जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने जगण्याचे नवीन मानक ठरेल आणि जो अखेरीस चांगल्या आरोग्याचा मानदंड होईल ”.

भारतीय बस आणि कार चालक महासंघाच्या सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, वाहतूक आणि महामार्ग खुले केल्यावर लोकांमधील आत्मविश्वास वाढायला बराच काळ लागेल. काही मार्गदर्शक सूचनांसह सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होऊ शकेल, असे त्यांनी नमूद केले आहे. बस आणि मोटार चालविताना सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याबरोबरच हात धुणे, सॅनिटायझर्सचा तसेच मास्कचा वापर करणे, यासारख्या सर्व सुरक्षेच्या उपायांचा अवलंब करण्याविषयी खबरदारी घेण्यास त्यांनी  सांगितले आहे.

मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे सीआरआरआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे आणि नागरिकांच्या सहकार्याने कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात सुरक्षित वातावरणाचा मार्ग प्रशस्त केला जाईल.

 
* * *

G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621914) Visitor Counter : 693


Read this release in: English