पंतप्रधान कार्यालय

भगवान बसवेश्वर जयंती निमित्त पंतप्रधानांचा संदेश

Posted On: 26 APR 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26  एप्रिल 2020

नमस्कार!

भगवान बसवेश्वर जयंतीनिमित्त आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा.

कोरोना जागतिक महामारीने संपूर्ण जगासमोर उभे केलेले  संकट पाहता,आपण सर्वांवर भगवान बसवेश्वर यांची कृपा कायम राहू दे अशीच माझी प्रार्थना आहे, आपण सर्व भारतवासीयांनी  एकजुटीने या महामारीच्या संकटावर मात  करावी.केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आपण शक्य ते योगदान  देऊ शकू.

मित्रहो,

भगवान बसवेश्वर यांची वचने, त्यांच्या संदेशातून  मला सदैव शिकवण मिळाली आहे.त्यांच्या वचनांचा  देशातल्या 23 भाषातला अनुवाद असो किंवा लंडन मधे त्यांच्या मूर्तीचे अनावरण असो, प्रत्येक वेळी मला नवी उर्जा  अनुभवायला मिळाली आहे.

मित्रहो,

बसवण्णा यांच्या वचनांचे डिजीटायझेशन करण्याचा 2017 मधे मी जो प्रस्ताव मांडला होता त्यावर व्यापक काम झाले आहे अशो माहिती मला देण्यात आली आहे. यावेळचा हा समारंभही डिजिटली संपूर्ण जगभरात आयोजित करण्यात येत आहे.

लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करत एक प्रकारे हे ऑनलाईन संदेशवहनाचे उत्तम उदाहरण आहे.

आपल्या या प्रयत्नामुळे बसवण्णा यांनी दाखवलेला  मार्ग आणि त्यांचा आदर्श याच्याशी जगातले जास्तीत जास्त लोक जोडले जातील.

मित्रहो,

जगात अनेक प्रकारचे लोक असतात.आपण पाहतो की  काही  लोक बोलताना खूप चांगले बोलतात मात्र स्वतः आचरण करत नाहीत. काही लोक असे असतात की काय योग्य आहे हे ते जाणतात  मात्र योग्य गोष्टीला योग्य म्हणायला घाबरतात. बसवण्णा यांनी केवळ उपदेश करण्याचा मार्ग निवडला नाही तर व्यक्ती, समाजात ज्या सुधारणा त्यांना हव्या होत्या त्या त्यांनी स्वतःपासून सुरु केल्या.आपण जेव्हा परिवर्तन,सुधारणा स्वतः मधे घडवून आणतो तेव्हा आपल्या आजूबाजूलाही परिवर्तन घडते. बसवण्णा यांच्याकडून आपण दैवी गुणही शिकू शकतो आणि उत्तम प्रशासक, एक उत्तम सुधारक म्हणूनही त्याच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो.भगवान बसवेश्वर यांची वाणी,त्यांची वचने , त्यांचा उपदेश ज्ञानाचा एक असा स्त्रोत आहे जो अध्यात्मिकही आहे आणि वास्तवात एक मार्गदर्शक म्हणून मार्गही दाखवतो. त्यांचा उपदेश आपल्याला उत्तम माणूस म्हणून घडण्याची आणि आपल्या समाजालाही अधिक उदार आणि दयाळूपणाची शिकवण देतो.

मित्रहो, भगवान बसवेश्वर यांची शिकवण  म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीचेही द्योतक आहे. अनेक शतकांपूर्वी भगवान बसवेश्वर  यांनी सामाजिक आणि स्त्री-पुरुष समानता यासारख्या विषयांवर समाजाला मार्गदर्शन केले होते.दुर्बलांना समान अधिकार आणि सन्मान मिळत नाही  तोपर्यंत आपली प्रगती अपुरीच आहे याची शिकवण त्यांनी त्याकाळच्या समाजाला दिली.

बसवण्णा यांनी अशा सामाजिक लोकशाहीचा पाया रचला होता जिथे समाजाच्या सर्वात शेवटच्या टोकाला असलेल्या व्यक्तीच्या  चिंतेला सर्वात प्राधान्य असेल. बसवण्णा यांनी मानवी  जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करत ते अधिक उत्तम करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. बसवण्णा यांनी नेहमीच कष्टाचा सन्मान केला. मेहनतीला महत्व दिले.समाजातली  मोठी किंवा छोटी प्रत्येक व्यक्ती राष्ट्राच्या सेवेत एक श्रमिकच असते, असे ते म्हणत.

त्यांनी नेहमीच अहिंसा आणि प्रेम यांना भारतीय संस्कृतीच्या केंद्र स्थानी ठेवले. म्हणूनच आज आपला देश,आपला भारत अनेक आव्हानावर मात करत पुढे जात आहे तेव्हा बसवण्णा यांचे विचार तितकेच प्रासंगिक ठरतात.

त्यांचे ईश्वरीय वचन असो  किंवा अनुभव मंटपा ची लोकशाही व्यवस्था किंवा स्वावलंबनाचा प्रयत्न असो, बसवेश्वर यांनी नेहमीच त्याला समाज निर्मितीचा महत्वाचा भाग मानला. समाज आणि निसर्ग,नैसर्गिक आणि सामाजिक संसाधनांचा संयमाने उपयोग ही त्यांची भावना शेकडो वर्षापूर्वी जितकी महत्वाची होती तितकीच महत्वाची आजही आहे.

मित्रहो,

21 व्या शतकात भारतातही  मी आपल्या आजूबाजूला, युवकांमध्ये, देशवासियांमधे, परिवर्तनासाठी एक दृढ इच्छाशक्ती आणि संकल्प शक्ती अनुभवतो आहे. या संकल्प शक्तीची प्रेरणा बसवण्णा यांनी दिली होती.

परिवर्तन त्यांच्यापासुनच सुरु होते असे भारतवासीय मानतात.अशा प्रकारची आशा आणि विश्वास देशाला कठीणात कठीण अशा संकटातून  बाहेर काढण्यासाठी मद्त करते आणि करत आहे.

मित्रहो,

आशा आणि विश्वासाचा हाच संदेश आपल्याला पुढे न्यायचा आहे दृढ करायचा आहे. तोच आपल्याला  मेहनत आणि परोपकारासाठी प्रेरित करेल. तोच या दशकात आपल्या राष्ट्राला नव्या शिखरावर नेईल.

आपण सर्वजण भगवान बसवण्णा यांच्या वचनांचा, त्यांच्या आदर्शांचा जगभरात प्रसार करत रहा, जगाला अधिक चांगले घडवत  रहा या सदिच्छेसह इथे थांबतो.

या सर्व कार्यात आपल्या प्रकृतीची काळजी घ्या,‘दो गज दूरी’ अर्थात योग्य ते अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करत राहा. आपणा सर्वाना पुन्हा एकदा बसव जयंतीच्या खूप शुभेच्छा.

धन्यवाद !

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1618624)
Read this release in: English