संरक्षण मंत्रालय

कोविड-19 च्या संक्रमणाशी लढण्यासाठी संरक्षण मंत्रालय करत असलेल्या प्रयत्नांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतला आढावा


प्रशासकीय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठीचे प्रयत्न चौपट करण्याचे सर्व संस्थांना दिले निर्देश

Posted On: 01 APR 2020 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020


कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे विविध विभाग करीत असलेल्या मदतीचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आढावा घेतला. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सी डी एस अर्थात सैन्यदल प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख अडमिरल करमबीर सिंग, हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल आर के एस भदौरिया, लष्कर प्रमुख एम एम नरवणे, संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह संरक्षण दलाशी संबंधित सर्व मुख्य विभागांचे प्रमुख तसेच सचिव या बैठकीला उपस्थित होते.
संरक्षण मंत्रालयाचे विविध सेवा विभाग, संस्था तसेच संरक्षण विभागाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विभाग या सर्वांनी परदेशात अडकलेल्या भारतीय तसेच परदेशी नागरिकांना सुखरूपपणे भारतात घेऊन येणे, त्यांना विलगीकरण कक्षांची सुविधा पुरवून उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे तसेच सॅनिटायझर, चेहेऱ्याचे मास्क तसेच वैयक्तिक संरक्षण उपकरणे यांच्या संशोधन आणि निर्मितीसाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांचे संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केले. देशात सध्या निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन या सर्वांनी त्यांचे प्रयत्न चौपट करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
केवळ कोविड-19 संसर्गाने बाधित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एकूण 9000 खाटांची क्षमता असलेल्या विशेष रुग्णालयांची सोय करण्यात आल्याची माहिती सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी राजनाथ सिंग यांना दिली. संरक्षण दलाच्या जैसलमेर,जोधपुर, चेन्नई, मानेसर, हिंदन आणि मुंबई येथील विलगीकरण कक्षात सध्या 1000 व्यक्ती उपचार घेत असून त्यांचा विलगीकरण कालावधी 7 एप्रिलला संपेल असे त्यांनी सांगितले.
या संकटाचा सामना करण्याकामी कोणतीही मदत करण्यासाठी नौदलाची जहाजे जय्यत तयार आहेत असे नौदल प्रमुख अडमिरल करमबीर सिंग यांनी सांगितले. स्थानिक नागरी प्रशासनाला लागेल ती मदत नौदल करीत आहे असे ते म्हणाले. 
देशाच्या विविध भागांमध्ये आवश्यक वैद्यकीय साहित्य पोहोचविण्यासाठी गेल्या पाच दिवसांत हवाई दलाच्या विमानांनी अनेक फेऱ्या करून सुमारे 25 टन साहित्याची वाहतूक केली अशी माहिती हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी संरक्षण मंत्र्यांना दिली.
कोविड-19 संसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या कामात नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी साडे आठ हजार डॉक्टर आणि इतर द्यकीय कर्मचाऱ्यांचा ताफा तयार ठेवण्यात आला आहे अशी माहिती लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांनी राजनाथ सिंग यांना दिली. शेजारी देशांना कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मदत पुरविण्याच्या संरक्षण मंत्र्याच्या निर्देशांना अनुसरून लवकरच नेपाळला वैद्यकीय उपकरणांचा साठा पाठविला जाईल असेही ते म्हणाले. 
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास मंत्रालयाने तयार केलेल्या सॅनिटायझर तसेच चेहेऱ्याचे मास्क यांचा दिल्ली पोलीस आणि देशात इतर ठिकाणी केलेल्या पुरवठ्याचा तपशील डीआरडीओचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांनी संरक्षण मंत्र्यांना दिला. सध्याच्या व्हेंटीलेटर यंत्रात मध्ये काही छोटे बदल करून एकच यंत्र चार रुग्णांच्या उपयोगी पडू शकेल असा व्हेंटीलेटर विकसित करण्याचा प्रयत्न डीआरडीओ करीत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या संरक्षण दलाच्या विविध कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक जाणीव निधीतून 40 कोटी रुपये कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या कामी देणगी म्हणून दिले आहेत.
शस्त्रास्त्रे निर्मिती मंडळ देखील सॅनिटायझर, चेहेऱ्याचे मास्क तसेच वैयक्तिक संरक्षण उपकरणे यांची निर्मिती करीत आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना देण्यात आली. 

 

 

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane

 


(Release ID: 1609988) Visitor Counter : 221


Read this release in: English