नागरी उड्डाण मंत्रालय

मालवाहू विमानांद्वारे देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा सुरु, खासगी विमान कंपन्यांनी देखील आवश्यक साहित्याच्या वाहतुकीसाठी सेवा सुरु केली

Posted On: 31 MAR 2020 2:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 31 मार्च 2020

 

देशभरात सध्या सुरु असलेली कोविड–19 संसर्गाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी एयर इंडिया आणि भारतीय हवाई दलाने देशाच्या दक्षिण, पूर्व आणि ईशान्येकडील भागांसाठी मालवाहू विमानांची सेवा सुरु केली आहे. कोविड – १९ च्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक रसायने, संप्रेरके, वैद्यकीय उपकरणे, चाचणीसाठी लागणारे किट,वैयक्तिक संरक्षणाची साधने, मास्क, हातमोजे आणि आरोग्यसेवेसाठी लागणारी सामग्री आणि त्या भागातील राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांनी केलेल्या मागणीनुसार इतर आवश्यक सामानाचा यात समावेश आहे.

एयर इंडियाने बेंगळूरूला पाठविलेल्या विमान फेऱ्यांमधून नागालँड, केरळ, कर्नाटक, मेघालय या भागांसाठी वैद्यकीय साहित्य तर कोईम्बतूर साठी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सामान पाठविण्यात आले.

भारतीय हवाई दलाने गोवाहाटीला पाठविलेल्या विमानांतून वैयक्तिक संरक्षणाची साधने तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या चाचणी किट्स पाठविण्यात आली.

या कामात मदत करण्यासाठी इंडिगो,स्पाईसजेट तसेच ब्लू डार्ट सारख्या खासगी विमान सेवांनी देखील व्यावसायिक तत्वावर वेमान सेवा सुरु केली आहे.

माल वाहतूक करणाऱ्या विमानांच्या दळणवळणात सुसंगती साधण्याच्या हेतूने हवाई वाहतूक  मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा आणि सर्व संबंधित महत्वाच्या सहकारी अधिकाऱ्यांचा संयुक्त गट स्थापन करण्यात आला आहे. वैद्यकीय साहित्याची वाहतूक सुनिश्चितपणे करण्यासाठी हब तसेच विशेष सेवा यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळूरू, तसेच कोलकाता येथे माल हब तयार करण्यात आले आहेत. तिथून दूरस्थ वाहतुकीसाठी गुवाहाटी, दिब्रुगढ, आगरताळा, ऐझवाल, इम्फाळ, कोइम्बतुर तसेच तिरुवनंतपुरम येथे संपर्क केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

कोविड संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी गेला गुरुवार ते रविवार या कालावधीत  एयर इंडियाच्या 14, भारतीय हवाई दलाच्या 6, दोन्हींच्या संयुक्त 27, इंडिगोच्या 6 तर स्पाईसजेटच्या 2 विमान फेऱ्या करण्यात आल्या आहेत. या कालावधीत एकूण 10 टन मालाची वाहतूक करण्यात आली.

वैद्यकीय सामान वाहतूक सेवेला समर्पित संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे. हे संकेतस्थळ एक एप्रिल पासून पूर्णतः कार्यरत होईल. हवाई वाहतूक  मंत्रालयाच्या संकेतस्थळावर खालील लिंक उपलब्ध आहे

www.civilaviation.gov.in

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठीचे वैद्यकीय सामान नियत स्थळी वेळेत पोहोचावे यासाठीच्या माहितीची देवाण घेवाण, चौकशीला उत्तरे देणे आणि अचूकतेने काम होण्यासाठीची तयारी चोवीस तास सुरु आहे.

 

B.Gokhale/S.Chitnis/P.Kor



(Release ID: 1609520) Visitor Counter : 117


Read this release in: English