विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

महाराष्ट्रातील कोविड-19 शी लढा देणाऱ्या रुग्णालयांना निर्जंतुक करण्यासाठी पुण्यातील सायटेक पार्कमधील उदयोन्मुख स्टार्टअपने आणले नवे तंत्रज्ञान


‘सायटेक एरॉन’ नामक ऋण आयन जनित्र, कोणत्याही बंदिस्त वातावरणातील विषाणू, जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार

कोविड-19 चे रुग्ण व संशयित यांच्यामुळे संसर्गित होऊ शकणारे बंदिस्त क्षेत्र निर्जंतुक करण्यासाठी व हवा स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग होणार

विलगीकरण सुविधांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचारी व डॉक्टर यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तसेच विषाणूशी लढण्याची क्षमता वाढवून त्यांच्या आरोग्याची काळजी यामुळे घेतली जाणार

सदर यंत्राचे उत्पादन व वाढीसाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाने दिले 1 कोटी रुपये

महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये बसविण्यासाठी लवकरच अशी 1,000 यंत्रे तयार होणार

Posted On: 30 MAR 2020 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मार्च 2020

पुण्याच्या सायटेक पार्कमधील एका उदयोन्मुख कंपनीने, निर्जंतुकीकरणाच्या एका नवीन तंत्रज्ञानाच्या रूपाने कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या लढाईमध्ये एक प्रभावी तोडगा शोधून काढला आहे. बंदिस्त व संसर्गित अशा कक्षातील विषाणूंच्या प्रमाणात तासाभरात लक्षणीय घट करणारे हे तंत्रज्ञान, DST अर्थात, विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या 'निधी प्रयास' कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आले आहे.

या यंत्रांच्या निर्मिती व उत्पादनवाढीसाठी DST ने 1 कोटी रुपये दिले असून, अशी 1000 यंत्रे लवकरच महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये बसवली जाणार आहेत. पुण्यातील जेक्लीन वेदर टेकनॉलॉजिसनामक कंपनी या यंत्रांची निर्मिती करणार आहे.

सायटेक एरॉन’ नावाच्या या ऋण आयन जनित्रामुळे बंदिस्त कक्षातील विषाणू, जीवाणू व बुरशीजन्य संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास मदत होऊ शकणार आहे. कोविड-19 चे रुग्ण व संशयित यांच्यामुळे संसर्गित होऊ शकणाऱ्या बंदिस्त क्षेत्रातील हवा स्वच्छ करण्याचे तसेच ती क्षेत्रे निर्जंतुक करण्याचे काम या यंत्रामुळे होऊ शकणार आहे. परिणामी, विलगीकरण क्षेत्रात अहोरात्र काम करणारे कर्मचारी, परिचारिका व डॉक्टर्स यांची रोगप्रतिकारक शक्ती व विषाणूशी लढण्याची क्षमता वाढून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.

रोगकारक विषाणू व जीवाणू नष्ट करण्यासाठीची याची उपयोगिता जगभरातील अनेक सुप्रसिध्द प्रयोगशाळांनी- घरे,रुग्णालये, शाळा, उद्योग, इ. विविध बंदिस्त वातावरणांमध्ये- वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासलेली आहे. आयन जनित्र 1 तास चालविले असता त्या बंदिस्त कक्षातील विषाणूंचे प्रमाण 99.7.%नी कमी होते. (कक्षाच्या आकारानुसार).

हे यंत्र, दर 8 सेकंदांत अंदाजे 10 कोटी इतके (10 आयन प्रति सेकंद) ऋणभारित आयन तयार करते. हे ऋणभारित आयन, हवेतील सूक्ष्म कणांभोवती- जसे हवेतून पसरणारे मोल्ड, कोरोना  आणि फ्ल्यू चे विषाणू, ॲलर्जीकारक सूक्ष्मजंतू, जीवाणू, परागकण, धूलिकण, इत्यादींभोवती क्लस्टर अर्थात पुंज तयार करतात. त्यानंतर अतिक्रियाशील असे हायड्रॉक्सिल (OH) मूलकण आणि  वातावरणीय डिटर्जन्ट अर्थात अपमार्जके (H O) तयार करून, म्हणजेच रासायनिक अभिक्रियेद्वारे, ते विषाणूंना व जीवाणूंना निष्प्रभ करतात.

ॲलर्जीकारक सूक्ष्मजंतू, विषाणू आणि जीवाणू यांच्याभोवतीचे प्रथिनयुक्त बाह्य आवरण फोडण्यासाठी, आयन जनित्राद्वारे निर्माण झालेल्या अपमार्जक द्रव्यांचा उपयोग होतो. तसेच संसर्गाविरुद्ध व वातावरणातील घातक घटकांविरुद्ध शरीराची प्रतिकारक्षमता वाढविण्यासही यामुळे मदत होते. कार्बन मोनॉक्साइड (कार्बन डाय ऑक्साइडच्या 1,000 पट धोकादायक), नायट्रोजन डाय ऑक्साइड, आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे अशा वायुजन्य प्रदूषकांचेही हे यंत्र विघटन करते.

फ्लू चा विषाणू, कॉक्ससॅकी विषाणू, पोलिओचा विषाणू, मानवी कोरोना विषाणू, विविध ॲलर्जीकारक सूक्ष्मजंतू, जीवाणू आणि बुरशी/ कवके अशा निरनिराळ्या रोगकारक घटकांविरुद्धही या आयन जनित्राची परिणामकारकता दिसून आली आहे. तसेच, रहदारीच्या ठिकाणी, रेल्वेस्थानके, विमानतळ अशा ठिकाणी, आणि खासकरून विमानातील केबिन, घर, रुग्णालयातील वॉर्ड, अशा बंदिस्त भागात आढळणाऱ्या हवेतील तरंगत्या विषाणूंविरूद्धही हे आयन जनित्र उपयोगी ठरू शकते.

 

G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1609351) Visitor Counter : 267


Read this release in: English