कंपनी व्यवहार मंत्रालय
भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाने व्यावसायिकांना अंशत: दिलासा देणाऱ्या सुधारणा केल्या लागू
Posted On:
30 MAR 2020 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2020
कोविड-19 संसर्गामुळे केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या संपूर्ण संचारबंदीच्या काळात, आर्थिक व्यवहांरांवर आलेल्या अंशत: निर्बंधांमुळे व्यावसायिकांना येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाने नादारी आणि दिवाळखोरी बाबतच्या नियमांमध्ये सुधारणा जारी केल्या आहेत. या सुधारणांनुसार, आता सुरु असलेल्या संपूर्ण संचारबंदीमुळे व्यावसायिक नादारी निर्णय प्रक्रियेशी संबंधित एखादी कार्यवाही नियत वेळेत पूर्ण होऊ शकली नाही तर त्यावर विलंबासंदर्भातील कोणतीही कारवाई केली जाणार नाही. अर्थात, याकरिता नियमावलीत संमत केलेला एकूण कालावधी लक्षात घेतला जाईल.
कोविड-19 च्या साथीचा समर्थपणे सामना करून ती नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारने 25 मार्च पासून 21 दिवसांसाठी संपूर्ण संचारबंदी लागू केली. त्यामुळे या काळात, नादारी संबधीची प्रकरणे हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबतची प्रक्रिया सुरु ठेवणे, समिती सदस्यांना या संदर्भातील बैठकांना हजर राहणे तसेच या संदर्भातील निर्णय घेऊन त्यासाठीच्या प्रस्तावांचा मसुदा तयार करून सादर करणे या सर्वच व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. म्हणून व्यावसायिक दिवाळखोरी बाबतच्या प्रक्रिया या संदर्भातील कायद्याने घालून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करणे कठीण झाले आहे. म्हणूनच मंडळाने कालमर्यादेबाबतची अट शिथिल करणारी सुधारणा केली आहे.
U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar
(Release ID: 1609331)
Visitor Counter : 200