रेल्वे मंत्रालय

लॉकडाऊन दरम्यानच्या काळात आवश्यक वस्तू घेऊन जाण्यासाठी भारतीय रेल्वे विशेष पार्सल गाड्या चालवणार


ई-कॉमर्स कंपन्यांंना लाभ

Posted On: 29 MAR 2020 7:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मार्च 2020
 


कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक आणि इतर वस्तूंचा अखंडित आणि सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय रेल्वे आवश्यक व इतर वस्तूंची देशभरात वाहतुक करण्यासाठी पार्सल ट्रेनची सेवा सुरू करत आहे.

ही अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी, जलद आणि मोठया प्रमाणात वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वेने गरजू ई-कॉमर्स कंपन्या आणि राज्य सरकारांसह इतर ग्राहकांना देशभरात रेल्वे पार्सल व्हॅन उपलब्ध करुन दिल्या आहेत.

छोट्या पार्सल आकारातील वैद्यकीय सामग्री, वैद्यकीय उपकरणे, अन्न अशा अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक लॉकडाऊन काळात महत्त्वपूर्ण आहे.

लॉक डाऊन काळात गृह मंत्रालयाने देशभरात वस्तूंच्या वाहतुकीवरील निर्बंध आधीच हटवले आहेत.

मुंबई मुख्यालयाच्या मध्य रेल्वे पार्सल विशेष गाड्या पुढील मार्गावर धावतील:

  1. कल्याण - नवी दिल्ली
  2. नाशिक - नवी दिल्ली
  3. कल्याण - सांतरागाछी
  4. कल्याण - गुवाहाटी.

याव्यतिरिक्त, उत्तर रेल्वे दिल्ली ते मुंबई पार्सल गाड्यादेखील चालवणार आहे.

भारतीय रेल्वेचे विविध विभाग या पार्सल गाड्या चालविण्यासाठी स्वतःच्या योजना आखत आहेत.

पार्सल गाड्यांची तरतूद आणि वस्तूंच्या जलद वाहतुकीमुळे पुरवठा साखळीची कार्यक्षमता आणखी वाढेल. स्पेशल पार्सल गाड्या चालविण्याच्या निर्णयामुळे दुग्धजन्य पदार्थ, वैद्यकीय उपकरणे आणि औषधे, किराणा सामान, खाद्यतेल आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्याबरोबरच छोट्या प्रमाणातल्या वस्तूंची ने आण करायला मदत होईल.

भारतीय रेल्वे आधीच मालवाहतूक रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून देशातील विविध भागात आवश्यक वस्तूंची वाहतूक करीत आहे. रेल्वेची ही मालवाहू वाहतूक अन्नधान्य, खाद्यतेल, मीठ, साखर, कोळसा, सिमेंट, दूध, भाज्या व फळे इत्यादी आवश्यक वस्तूंच्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या गरजा भागवत असताना, अशा अनेक वस्तू आहेत ज्या तुलनेने कमी प्रमाणात वितरीत करण्याची आवश्यकता आहे. विमानांनंतर रेल्वे अशा वस्तूंसाठी आंतरराज्य वाहतुकीचा वेगवान मार्ग आहे.

औद्योगिक समूह, इतर कंपन्या, स्वारस्य असलेले गट, संस्था, व्यक्ती या सेवांचा लाभ घेऊ शकतात. इच्छुक, या कामाच्या नोंदणीसाठी रेल्वे पार्सल कार्यालये आणि विभागांकडे संपर्क साधू शकतात. 

#IndiaFightsCorona

 

 

R.Tidke/S.Tupe/D.Rane



(Release ID: 1609120) Visitor Counter : 157


Read this release in: English