पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात 2.0"(10वा भाग) द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (29 मार्च 2020)

Posted On: 29 MAR 2020 12:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मार्च 2020

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, सहसा मन की बात मध्ये मी अनेक नव्या विषयांना घेऊन येत असतो. पण आज देश आणि जगाच्या मनात केवळ आणि केवळ एकच गोष्ट आहे- कोरोना जागतिक महामारीमुळे आलेले भयंकर संकट.

अशात मी दुसऱ्या काही गोष्टींबद्दल बोललो तर ते योग्य होणार नाही. खूप काही महत्वपूर्ण गोष्टी बोलायच्या आहेत, पण माझं मन मला सांगत आहे की या महामारीच्या संदर्भातील काही गोष्टी सांगू.

पण सर्वात आधी सर्व देशवासियांची माफी मागतो. आणि माझा आत्मा मला सांगत आहे की आपण मला जरूर क्षमा कराल कारण असे काही निर्णय घ्यावे लागत आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत  आहे. खास करून माझ्या गरिब बंधुभगिनींना पहातो तेव्हा असं जरूर वाटतं की हा कसा प्रधानमंत्री आहे, आम्हाला संकटात टाकलं आहे, असं त्यांना वाटत असेल. त्यांची सुद्धा मी विशेषत्वाने माफी मागतो.

असंही होऊ शकतं की, खूपसे लोक माझ्यावर नाराजही झाले असतील की असं कसं सगळ्यांना घरात बंद करून ठेवलं आहे. मी आपल्या अडचणी समजू शकतो, आपल्याला होणारा त्रास समजू शकतो, परंतु भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला, कोरोनाच्या विरूद्घ लढाईसाठी, हे पाऊल उचलण्याशिवाय दुसरा कोणता मार्गच नव्हता.

कोरोनाच्या विरोधातील लढा, हा जीवन आणि मृत्यु यांच्यातील लढाई आहे आणि या लढाईत आम्हाला जिंकायचं आहे आणि यासाठीच  ही कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक होतं. अशी पावलं उचलायला कुणाचीच इच्छा नसते, पण जगातील परिस्थिती पाहता असं वाटतं की हाच एक मार्ग उरला आहे. आपल्याला, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं आहे. मी पुन्हा एकदा, आपली जी गैरसोय झाली, अडचण झाली आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. मित्रांनो, आमच्याकडे असं म्हटलं गेलं आहे- एवं एवं विकारः, अपि तरून्हा साध्यते सुखं म्हणजे आजार आणि त्याच्या प्रकोपाचा निपटारा त्याच्या सुरूवातीलाच केला पाहिजे. नंतर रोग असाध्य होतात आणि तेव्हा उपचार करणंही अवघड होऊन बसतं. आणि आज संपूर्ण हिंदुस्थान, प्रत्येक हिंदुस्थानी हेच करत आहे. भाऊ, बहिणी, माता, ज्येष्ठांना, कोरोना विषाणुनं जगाला कैद करून ठेवलं आहे. हे ज्ञान, विज्ञान, गरिब, श्रीमंत, दुर्बल, सामर्थ्यवान प्रत्येकाला आव्हान देत आहे. हा ना राष्ट्रांच्या सीमांमध्ये बांधला गेला आहे,  हा विषाणु ना कोणता विभाग पहातोय आणि ना कोणता ऋतु. हा विषाणु मनुष्याला मारण्याची, त्याला संपवण्याची जिद्द घेऊन बसला आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी, पूर्ण मानवजातीला या विषाणुला नष्ट करण्यासाठी एकजूट होऊन संकल्प करावाच लागेल. काही लोकांना असं वाटतं की, ते लॉकडाऊनचं पालन करत आहेत म्हणजे असं करून ते इतरांची मदत करत आहेत. अरे बाबांनो, या गैरसमजात रहाणं योग्य नाही. हा लॉकडाऊन आपल्या स्वतःच्या बचावासाठी आहे. आपल्या स्वतःचा बचाव करायचा आहे, आपल्या परिवाराला वाचवायचं आहे. आता आपल्याला येणारे अनेक दिवस याच प्रकारचे धैर्य दाखवावंच लागणार आहे, लक्ष्मणरेषेचं पालन करायचंच आहे.

मित्रांनो,

मला हेही माहित आहे की कायदा तोडण्याची, नियमाचा भंग करायची कुणाचीच इच्छा नसते पण काही लोक असं करत आहेत कारण अजूनही ते परिस्थितीचं गांभीर्य समजू शकत नाहीयेत. अशा लोकांना मी हेच सांगेन की, लॉकडाऊनचे नियम तोडाल तर कोरोना विषाणुपासून वाचणं अवघड होईल. जगभरातल्या अनेक लोकांचाही असाच गैरसमज  होता.आज त्या सर्वांना पश्चात्ताप होत आहे. 

मित्रांनो,

आपल्याकडे असं म्हटलं गेलं आहे-आर्योग्यम परं भाग्यम, स्वास्थ्यं सर्वार्थ साधनं अर्थात आरोग्य हेच सर्वात मोठं भाग्य आहे. जगातल्या सर्व सुखांचं साधन, आरोग्यच आहे. अशात नियम तोडणारे आपलं आयुष्य धोक्यात घालत आहेत. मित्रांनो, या लढाईत अनेक योद्धे असे आहेत की जे घरांमध्ये नाहीत, घरांच्या बाहेर राहून कोरोना विषाणुचा सामना करत आहेत. ते आपले आघाडीवरील सैनिक आहेत. खासकरून आमच्या परिचारिका भगिनी आहेत, परिचारिकांची कामं करणारे भाऊ आहेत, डॉक्टर आहेत, निमवैद्यकीय कर्मचारी आहेत. असे मित्र, ज्यांनी कोरोनाला पराभूत केलं आहे. आज आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची आहे. गेल्या काही दिवसांत मी अशा काही लोकांशी दूरध्वनीवरून बोललो आहे, त्यांचा उत्साह वाढवला आहे आणि त्यांच्याशी बोलण्यानं माझाही उत्साह वाढला आहे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. माझी खूप इच्छा होती म्हणून यावेळी मन की बात मध्ये अशा मित्रांचे अनुभव, त्यांच्याशी झालेली बातचीत त्यातील काही गोष्टी तुमच्यासमोर सांगाव्यात. सर्वप्रथम आमच्याशी जोडले जातील ते रामगम्पा तेजा जी. तसं तर ते एक व्यावसायिक आहेत, या त्यांचे अनुभव ऐकू या.

हां राम

रामगम्पा तेजाः नमस्ते जी.

मोदीजीः कोण, राम बोलत आहेत काय?

रामगम्पा तेजाः हो साहेब. राम बोलतोय.

मोदीजीः हा राम, नमस्ते.

रामगम्पा तेजाः नमस्ते, नमस्ते!

मोदीजीः मी ऐकलं आहे की आपण कोरोना विषाणुच्या गंभीर संकटातून बाहेर पडला आहात? 

राम गम्पा तेजा: हो, खरं आहे|

मोदी जी: मला आपल्याशी काही बोलायचं होतं. आपण सांगा, या साऱ्या संकटातून बाहेर निघालात, तर आपला अनुभव मला ऐकायची इच्छा होती.

राम गम्पा तेजा: मी आयटी क्षेत्राचा कर्मचारी आहे. कामानिमित्तानं मी दुबईला, एका मीटिंगसाठी गेलो होतो. पण तिथं कळत नकळत असं घडून गेलं होतं. परत आल्याआल्या, ताप आणि ते सर्व काही लक्षणं सुरू झाली. तेव्हा पाच सहा दिवसांनी डॉक्टर्सनी कोरोना विषाणुची चाचणी केली आणि तेव्हा निकाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा गांधी रूग्णालय, हैदराबादचं सरकारी रूग्णालयात मला दाखल केलं होतं आणि त्यानंतर 14 दिवसांच्या उपचारानंतर मी बरा झालो. आणि मला रूग्णालयातनं डिस्चार्ज दिला. तर, हे सारं थोडं घाबरवणारं होतं.

मोदी जी:  म्हणजे, आपल्याला जेव्हा संसर्ग झाल्याचं समजलं.  

राम गम्पा तेजा: हो|

मोदी जी: आणि त्याच्या अगोदर तुम्हाला हा विषाणु अतिशय भयंकर आहे, त्रासदायक आहे, असं तुम्हाला वाटत असेल.

राम गम्पा तेजा: हो.

मोदी जी: तर, जेव्हा आपल्याबाबतीत असं घडलं, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय होती?

राम गम्पा तेजा: पहिल्यांदा तर खूपच घाबरून गेलो होतो मी, प्रथम तर माझा हे कसं झालं,यावर विश्वासच बसत नव्हता. कारण तेव्हा भारतात दोन ते तीन लोकांनाच त्याची लागण झाली होती, त्यावेळी त्याच्याबाबतीत काहीच माहिती नव्हती. रूग्णालयात जेव्हा मला दाखल केलं तेव्हा मला विलगीकरण कक्षात ठेवलं होतं. तेव्हा तर, पहिले दोन दिवस तर असेच गेले. परंतु तिथले डॉक्टर्स आणि परिचारिका ज्या आहेत..

 मोदी जी: हा

राम गम्पा तेजा: ते माझ्याशी अतिशय चांगले वागले. दर रोज मला कॉल करून माझ्याशी बोलत होते आणि काही होणार नाही, असा धीर देत होते.

तुम्ही बरे व्हाल, अशा गोष्टी करत असायचे. दिवसात, दोन तीन वेळा डॉक्टर बोलायचे, परिचारिकाही बोलत असायच्या.  तर, पहिल्यांदा जी भीती होती, त्यानंतर असं वाटलं की इतक्या चांगल्या लोकांबरोबर मी आहे. त्यांना काय करायचं आहे हे माहित आहे आणि मी चांगला होईनच,असं वाटू लागलं होतं.

मोदी जी: कुटुंबातल्या लोकांची मनःस्थिती कशी होती?

राम गम्पा तेजा: जेव्हा मी रूग्णालयात दाखल झालो, तेव्हा पहिल्यांदा तर सारेच तणावाखाली होते. आणि माध्यमांचीही थोडी समस्या होती तिथं. जास्त लक्ष देणं वगैरे होतं. परंतु, सर्वप्रथम परिवारातल्या लोकांचीही चाचणी केली गेली होती. त्यांच्या चाचणीचे निकाल निगेटिव्ह आले होते. तो आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, त्यावेळी माझ्या आसपास होते त्या सर्वासाठी, सर्वात मोठं वरदान होतं. त्यानंतर तर प्रत्येक दिवशी सुधारणा दिसत होती. डॉक्टर आमच्याशी बोलत होते आणि ते कुटुंबावाला माहिती देत होते.

मोदी जी: आपण स्वतः काय काय खबरदारी घेतली होती, आपल्या परिवारानं काय खबरदारी घेतली?

राम गम्पा तेजा: कुटुंबियांना तर प्रथम जेव्हा समजलं तेव्हा मी विलगीकरण कक्षात होतो. पण क्वारंटाईननंतरसुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं की, आणखी 14  दिवस घरातच रहायचं आहे आणि आपल्या खोलीतच रहायचं तसंच स्वतःला घरात कुटुंबापासून वेगळं ठेवायचं अस डॉक्टर बोलले होते. तेव्हा आल्यापासून मी माझ्या घरातच आहे. बहुतेक वेळ माझ्याच खोलीत रहातो. मास्क घालूनच असतो दिवसभर आणि बाहेर जेव्हा काही खाद्यपदार्थ असतील तर हात धुणं तर सर्वात महत्वाचं आहे.

मोदी जी: चला राम, आपण ठीक होऊन आला आहात. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत|

राम गम्पा तेजा: धन्यवाद.

मोदी जी : पण माझी इच्छा आहे की आपला हा अनुभव..      

राम गम्पा तेजा: हो

मोदी जी: आपण तर आयटी व्यवसायात आहात ना

राम गम्पा तेजा: हो

मोदी जी: तर ध्वनिफित बनवून

राम गम्पा तेजा: हां

मोदी जी: लोकांना सांगा. सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार करा. त्यामुळे लोक घाबरणारही नाहीत आणि त्याचवेळेस, काळजी कशी घ्यायची, कोरोनापासून हेही अगदी व्यवस्थितरित्या लोकांपर्यत जाईल. 

राम गम्पा तेजा: हां जी. असं आहे की मी बाहेर येऊन पहातो तेव्हा विलगीकरण कक्षात जाणं म्हणजे जणू तुरूंगात जाण्यासारखं आहे, असा विचार लोक करू लागले आहेत. असं नाहीय. सर्वांना याची माहिती झाली पाहिजे की, सरकारी क्वारंटाईन त्यांच्यासाठी आहे, त्यांच्या परिवारासाठी आहे. त्याबाबतीत जास्तीत जास्ता लोकांना सांगू इच्छितो की चाचणी करून घ्या, क्वारंटाईन याचा अर्थ घाबरू नका. कुणी क्वारंटाईनमध्ये असेल याचा अर्थ त्याच्यावर तो शिक्का बसू नये.

मोदी जी: चला राम, खूप खूप शुभकामना आपल्याला.

राम गम्पा तेजा: धन्यवाद,सर .

मोदी जी: धन्यवाद

 

मित्रांनो, जसं की राम यांनी सांगितलं की त्यांनी कोरोनाची शंका आल्यावर  डॉक्टरांनी दिलेल्या प्रत्येक निर्देशाचं पालन केलं, आणि त्यामुळेच आज ते व्यवस्थित होऊन पुन्हा निरोगी जीवन जगत आहेत. आपल्याबरोबर असे आणखी एक मित्र जोडले गेले आहेत ज्यांनी कोरोनाला पराभूत केलं आहे आणि त्यांचं तर पूर्ण कुटुंबच या संकटात अडकलं होतं. तरूण मुलगाही अडकला होता. या आग्रा इथले श्रीमान अशोक कपूर यांच्याशी आपण बोलू या.

मोदी जी: अशोक जी नमस्ते-नमस्ते |

अशोक कपूर: नमस्कार जी | माझं सौभाग्य आहे की मी आपल्याशी बोलतो आहे.

मोदी जी: आमचंही सौभाग्य आहे. मी फोन यासाठी केला की कारण आपल्या संपूर्ण कुटुंबवर हे संकट आलं होतं.

अशोक कपूर: हो, हो.|

मोदी जी: तर मला हे अवश्य जाणून घ्यायचं आहे की ही समस्या, या संसर्गाची माहिती आपल्याला कशी झाली?काय झालं?रूग्णालयात काय झालं? ज्यामुळे मी आपले अनुभव  ऐकून काही गोष्टी देशाला सांगण्यासारख्या असतील तर त्यांचा उपयोग मी करेन.

अशोक कपूर: बिलकुल साहेब| माझी दोन मुलं आहेत. ते इटलीला गेले होते. तिथं, एक प्रदर्शन होतं बुटांचं. आम्ही इथं बूट बनवण्याचं काम करतो. कारखाना आहे. उत्पादन करतो.

मोदी जी: हां.

अशोक कपूर: तर तिथं इटलीला प्रदर्शनात गेलो होतो. जेव्हा ती परत आली नं.

मोदी जी: हां.

अशोक कपूर: आमचे जावईही गेले होते, ते दिल्लीला राहतात. त्यांना थोडी समस्या झाली तर ते राम मनोहर लोहिया रूग्णालयात गेले

मोदी जी: हां

अशोक कपूर: तेव्हा त्यांना कोरोना पॉझिटिव्ह सांगण्यात आलं. त्यांना नंतर तिथनं सफदरजंगला हलवण्यात आलं.

मोदी जी: हां.

अशोक कपूर: आम्हाला तिथनं दूरध्वनी आला की आपणही त्यांच्यबरोबर गेला होता. आपणही चाचणी करून घ्या. तेव्हा दोन्ही मुलं गेली चाचणी करायला. इथंच आग्रा जिल्हा रूग्णालयात त्यांना सांगण्यात आलं की आपण आपल्या कुटुंबातल्या सर्वाना बोलवून घ्या. कुणाचीही चाचणी राहून जाऊ नये. शेवटी आम्ही सर्व जण गेलो.

 मोदी जी: हां

अशोक कपूर: तर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की आपण जे सहाजण आहात, माझी दोन मुलं, मी, माझी पत्नी, मी तसाही ७३ वर्षांचा आहे, माझ्या मुलाची पत्नी आणि माझा नातू जो सोळा वर्षांचा आहे. आम्हा सर्वांना त्यांनी पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. आपल्याला दिल्लीला जायचं आहे, असंही सांगितलं.      

मोदी जी: ओ माय गॉड

अशोक कपूर: पण सर आम्ही घाबरलो नाही. आम्ही म्हटलं, चला चांगलं आहे की कोरोना असल्याचं कळलं तरी. आम्ही दिल्लीला सफरदरजंग रूग्णालयात गेलो. आग्रा रूग्णालयानंच आम्हाला रूग्णवाहिका दिली. त्यांनी तिचं काही भाडं घेतलं नाही. आग्र्याचे डॉक्टर्स, प्रशासनाची कृपा आहे. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं.

मोदी जी: रूग्णवाहिकेतनं आलात आपण?

अशोक कपूर: हो साहेब, रूग्णवाहिकेतनं. व्यवस्थित होतो, जसं त्यात बसून येतात तसंच आलो. आम्हाला त्यांनी रूग्णवाहिका दिली. बरोबर डॉक्टरही होते.आणि आम्हाला त्यांनी सफदरजंग रूग्णालयात आणून सोडलं.

सफदरजंग रूग्णालयात जे फाटकापाशीच डॉक्टर उभे होते त्यांनी आम्हाला आमच्या वॉर्डमध्ये हलवलं. आम्हा सहाही जणांना वेगवेगळ्या खोल्या दिल्या. चांगल्या खोल्या होत्या, सर्वकाही तिथं होतं. सर, आम्ही 14 दिवस रूग्णालयात तिथं एकटे रहात होतो. आणि डॉक्टरांपुरतं सांगायचं  तर त्यांचं सहकार्य खूप होतं. त्यांची आणि कर्मचाऱ्यांचीही वागणूक खूप चांगली होती.  ते आपले ड्रेस घालून येत नसत त्यामुळे सर, डॉक्टर आहेत की वॉर्डबॉय हेच कळत नसायचं. आणि ते जे काही सांगत होते ते मान्य करत होतो. तिथं आम्हाला अगदी एक टक्कासुद्धा अडचण झाली नाही.

मोदी जी: आपला आत्मविश्वासही खूप पक्का दिसतोय.

अशोक कपूर: सर, आम्ही अगदी व्यवस्थित आहोत. मी तर सर माझ्या गुडघ्यांवर शस्त्रक्रियाही करून घेतली आहे. तरीही मी व्यवस्थित आहे.

मोदी जी: ते नाही. पण इतकं मोठं संकट आपल्या कुटुंबावर आलं आणि 16 वर्षाच्या मुलापर्यंत पोहचलं, तेव्हा

अशोक कपूर: त्याची परिक्षा होती सर. आयसीएसईची परिक्षा सुरू होती नं तेव्हा. तर त्याची परिक्षा होती. तर त्याने पेपर दिला नाही. म्हटलं नंतर बघू. आयुष्य राहिलं तर सगळे पेपर देता येतील. काही हरकत नाही.

 मोदी जी: खरी गोष्ट आहे. चला आपला अनुभव यात कामाला आला. आपण सर्व कुटुंबाला विश्वास दिला, धीर दिला.

अशोक कपूर: जी, आमच्या पूर्ण कुटुंबाला तिथं एकमेकांचा आधार राहिला. आम्ही भेटत नव्हतो. पण फोनवरून बोलत होतो. एकमेकांशी भेटू शकत नव्हतो आणि डॉक्टरांनी आमची पूर्ण काळजी घेतली- जितकी घ्यायला हवी. आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यानी आम्हाला छान सहकार्य केलं. जे कर्मचारी, परिचारिका होत्या, त्यांनी आम्हाला पूर्ण सहयोग दिला.

मोदी जी: चला, माझ्या आपल्याला आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आहेत.

अशोक कपूर: धन्यवाद जी, धन्यवाद | आपल्याशी बोलणं झालं यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत.

मोदी जी: नाही, आम्ही सुद्धा.

अशोक कपूर: यानंतरही सर, आम्ही कुठंही जनजागृतीसाठी कुठं जायचं असेल तर आम्ही सतत तयार आहोत.

मोदी जी: नाही. आपण आपल्या पद्धतीनं आग्र्यामध्ये करा. कुणी उपाशी असेल तर त्याला जेवण द्या. गरिबाची चिंता करा, आणि नियमांचं लोकांनी पालन केलं पाहिजे. लोकांना समजवा की आपला परिवार या आजारात फसला होता, पण आपण नियमांचं पालन केल्यानं आपल्या परिवाराला वाचवलं. सर्व लोकांनी नियमांचं  पालन केलं तर देश वाचेल. 

अशोक कपूर: आम्ही मोदी सर,आमचा व्हिडिओ बनवून चॅनल्समध्ये दिला आहे.

मोदी जी: अच्छा |

अशोक कपूर: लोकांमध्ये जागृती रहावी म्हणून त्यानी तो दाखवलाही आहे.

मोदी जी: सोशल मीडियात खूप लोकप्रिय केला पाहिजे.

अशोक कपूर: जी जी, आणि आम्ही आमच्या कॉलनीत जिथं रहातो ती अतिशय स्वच्छ कॉलनी आहे. आम्ही सर्वाना सांगितलं आहे, की पहा आम्ही आलो आहोत यावरून घाबरायचं काहीच कारण नाही. कुणाला काही समस्या असेल तर जाऊन चाचणी करून या. आणि जे लोक आम्हाला भेटले होते त्यांनीही चाचणी करून घ्यावी. ईश्वराच्या दयेनं सर्व ठीक आहे,सर.

मोदी जी: चला खूप शुभकामना आपल्याला. 

     

मित्रांनो, आपण अशोकजी आणि त्यांच्या कुटुंबाच्या दिर्घआयुष्यासाठी कामना करुया. जसं त्यांनी सांगितलं की न घाबरता, कोणत्याही भीतीशिवाय त्यांनी योग्य पावलं उचलून, वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधला आणि योग्य सावधानता बाळगली तर या महामारीला हरवता येतं. मित्रांनो, वैद्यकीय स्तरावर आम्ही या महामारीचा कसा मुकाबला करत आहोत, याचे अनुभव जाणून घेण्यासाठी मी काही डॉक्टरांशीही बोललो आहे, जे या लढाईत आघाडीच्या फळीत आहेत. त्यांचा दिनक्रम याच रूग्णांबरोबर सुरू असतो. आता आपल्यासोबत दिल्लीचे डॉक्टर नितेश गुप्ता जोडले गेले आहेत.

मोदी जी: नमस्ते डॉक्टर |

डॉ० नीतेश गुप्ता: नमस्ते सर

मोदी जी: नमस्ते नितीश जी, आपण तर अगदी आघाडीची फळी सांभाळत आहात. मला जाणून घ्यायचंय की, रूग्णालयातल्या आपल्या बाकी साथीदारांची मनःस्थिती कशी आहे? काय आहे जरा सांगा तर

डॉ० नीतेश गुप्ता: सर्वांची मनःस्थिती चांगली आहे. आपला आशिर्वाद सर्वाच्या सोबत आहे. आपण सर्व रूग्णालयाला जो काही पाठिंबा देत आहात, ज्या वस्तु आम्ही मागत आहोत, त्या सर्व आपण पुरवत आहात. तर आम्ही सर्वजण लष्कर सीमेवर कसं लढतं तसंच आम्ही इथे लढा देत आहोत. आणि, आमचं साऱ्यांचं एकच ध्येय आहे की रूग्ण ठीक होऊन घरी गेला पाहिजे.

मोदी जी: आपलं म्हणणं खरं आहे. ही युद्धासारखीच स्थिती आहे आणि आपण सर्व आघाडीवर आहात.

डॉ० नीतेश गुप्ताः हो सर.

मोदी जी: आपल्याला तर उपचारांबरोबर रूग्णांचं समुपदेशन पण करावं लागत असेल? 

डॉ० नीतेश गुप्ता: हो सर, ते सर्वात जास्त गरजेचं आहे. कारण रूग्ण, एकदम ऐकून घाबरतो की आपल्याबरोबर हे काय होत आहे, असं त्याला वाटत असतं. त्याला समजवावं लागतं की यात काहीच नाही. पुढल्या 14 दिवसात तुम्ही ठीक होणार आहात. तुम्ही आपल्या घरी जाल अगदी. अशा पद्घतीनं आम्ही 16 रूग्णांना घरी पाठवलं आहे.

मोदी जी:  जेव्हा आपण बोलत असता तेव्हा एकंदरीत आपल्यासमोर काय येतं, जेव्हा घाबरलेले लोक असतात, तेव्हा त्यांना कशाची चिंता सतावत असते?

डॉ० नीतेश गुप्ता: त्यांना हेच वाटत असंत की पुढं काय होईल? आता काय होईल? एकदम बाहेरच्या जगात ते पाहत असतात की इतके लोक मरत आहेत, आपल्याही बाबतीत असंच होईल का, असं त्यांना वाटतं. तेव्हा आम्ही त्यांना समजावतो की, कोणती अडचण किती दिवसात ठीक होईल. आपली केस अगदी सौम्य  स्वरूपाची आहे. साधी सर्दी पडसं होतं तशीच ही केस आहे. तो जसा पाच सात दिवसात ठीक होतो तसंच तुम्हीही व्हाल. नंतर आम्ही तुमच्या चाचण्या करू आणि त्या निगेटिव्ह आल्या तर आपल्याला  घरी पाठवता येईल. म्हणूनच वारंवार, दोन तीन चार तासात त्यांच्याजवळ जातो, त्यांना भेटतो , त्यांची चौकशी करतो. त्यांना बरं वाटतं. दिवसभरात त्याना चांगलं वाटतं.

मोदी जी: त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सुरूवातीला तर घाबरून जात असतील नं?

डॉ० नीतेश गुप्ता: सुरूवातीला तर ते घाबरतात,पण जेव्हा आम्ही त्यांना समजावतो तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना स्वतःलाच बरं वाटायला लागतं. त्यानाही वाटू लागतं की आपण ठीक होऊ शकतो.

मोदी जी: पण सर्व डॉक्टरांना असं वाटतं की जीवनातला सर्वात मोठया सेवा भावाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. ही सर्वांची भावना असते का? 

डॉ० नीतेश गुप्ता: हां जी, अगदी तशीच भावना असते. आम्ही आमच्या टीमला नेहमी  प्रोत्साहन देत असतो की घाबरण्याची काही गरज नाही. आपण जर पूर्ण  काळजी घेतली तर., रूग्णाला चांगल्या तर्हेने समजावलं की आपल्याला असं करायचं आहे, तर सारं काही ठीक होईल.

मोदी जी: चला डॉक्टर. आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर रूग्ण येत असतील आणि आपण तर अगदी तनमनानं सेवा करत आहात. आपल्याशी बोलून छान वाटलं या लढाईत मी आपल्याबरोबर आहे. आपण ही लढाई सुरू ठेवा.

डॉ० नीतेश गुप्ता: आपला आशीर्वाद रहावा, हीच आमची इच्छा आहे. 

मोदी जी: खूप-खूप शुभकामना, भैया|

डॉ० नीतेश गुप्ता: सर धन्यवाद.

 

मोदी जी: थँक यू. नितीश जी आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपल्यासारख्या लोकांच्या प्रयत्नांनीच भारत कोरोनाच्या विरोधातली ही लढाईमध्ये जरूर जिकणार आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की आपण आपली सतत काळजी घ्या. आपल्या साथीदारांची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जगातल्या  अनुभवानं हेच दाखवून दिलं आहे की या आजारानं संसर्ग झालेल्या व्यक्तिंची संख्या अचानक वाढते. अचानक होणारऱ्या या वाढीच्या कारणामुळे परदेशात आम्ही चांगल्यातली चांगली आरोग्य सेवा अपयशी ठरत असल्याचं पहात आहोत. भारतात अशी स्थिती येऊ नये, यासाठी आम्हाला सातत्यानं प्रयत्न करायचे आहेत. आणखी एक डॉक्टर आमच्याशी पुण्याहून जोडले जात आहेत.

श्रीमान डाक्टर बोरसे

मोदी जी: नमस्ते डॉक्टर |

डॉक्टर: नमस्ते | नमस्ते |

मोदी जी: नमस्ते | आपण तर अगदी एक ‘जन-सेवा, प्रभु-सेवा’ च्या पद्धतीनं कामात गुंतला आहात. मी आज आपल्याशी काही गोष्टी बोलू इच्छितो, ज्या देशवासियांसाठी संदेश ठरतील. एक तर अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की केव्हा डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे आणि केव्हा त्यांनी कोरोना चाचणी करायची आहे? एक डॉक्टर या नात्यानं आपण संपूर्णपणे आपल्याला या कोरोनाच्या रूग्णांसाठी समर्पित केलं आहे. तर आपल्या संदेशात मोठी ताकद आहे तो मी ऐकू इच्छितो.

डॉक्टर: सर जी, इथल्या बी जे मेडिकल कॉलेजात मी प्राध्यापक आहे. आणि आमच्या पुणे महानगरपालिकेचं रूग्णालय आहे नायडू हॉस्पिटल. तिथं जानेवारी 2020 पासून तपासणी केंद्र सुरू केलं आहे. तिथं आजपर्यंत 16 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी आम्ही उपचार करून, त्यांना क्वारंटाईन करून, त्यांचं विलगीकरण करून, उपचारांद्वारे 7 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आणि बाकीच्या ज्या 9  केसेस आहेत, त्या रूग्णांची प्रकृती अत्यंत स्थिर आहे आणि ते चांगला प्रतिसाद देत आहेत. ते विषाणु शरिरात असतानाही बरे होत आहेत, कोरोना विषाणुपासून ते बरे होत आहेत. आता इथं सँपल साईझ लहान आहे, सर 16 रूग्णच आहेत. परंतु असं दिसतंय की तरूणांनाही संसर्ग होत आहे. त्यांना होणार संसर्ग जास्त गंभीर नाहीये सर.

तो सौम्य आजार आहे आणि रूग्ण पूर्ण तंदुरूस्त होत आहेत सर. आणि हे 9 रूग्ण आहेत तेही 4 ते 5 दिवसांत ठीक होणार आहेत, त्यांची प्रकृती आता ढासळणार नाहीये, त्यांच्यावर आम्ही रोज लक्ष ठेवून आहोत. जे लोक आमच्याकडे संशयित म्हणून येतात, आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत आणि जे संपर्कात आले आहेत, अशा लोकांचा सर आम्ही स्वॅब घेत आहोत सर. त्यांच्या श्वासनलिकेचा स्वॅब, नासिकेचा स्वॅब घेत आहोत आणि नासिकेच्या स्वॅबचा अहवाल आल्यावर जर तो पॉझिटिव्ह असेल तर त्यांना पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये दाखल करतो. निगेटिव्ह निकाल आला तर त्यांना होम क्वारंटाईन करण्याचा संदेश देऊन, होम क्वारंटाईन कसं करायचं आहे, घरी गेल्यावर काय करायचं आहे, असा सल्ला देऊन त्यांना आम्ही घरी पाठवत आहोत.

मोदी जी: आपण काय समजावता त्यांना? घरी रहाण्यासाठी काय काय त्यांना समजावता आपण जरा सांगा.

डॉक्टर: सर, एकतर आपण घरी राहिला तर आपल्याला घरातही क्वारंटाईन करायचं आहे. आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे  6 फूट अंतर ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला मास्क वापरायचा आहे आणि वारंवार हात स्वच्छ करायचे आहेत. जर आपल्याजवळ सॅनिटायझर नाही तरीही आपण साध्या साबणानं आणि पाण्यानं हात स्वच्छ करायचा आहे आणि तेही वारंवार हात धुवायचे आहेत. जर आपल्याला खोकला आला किंवा शिंक आली तर रूमाल घेऊन साधा रूमाल लावून त्यावरच खोकायचं आहे. त्यामुळे जे काही तुषार उडतील ते जास्त दूर जाऊ शकणार नाहीत आणि जमिनीवर ते पडणार नाहीत. जमिनीवर न पडल्याने हात लागला तरीही विषाणुचा प्रसार शक्य होणार नाही. हे आम्ही समजावतो आहोत सर. दुसरी गोष्ट अशी समजावतो आहोत की त्यांना होम क्वारंटाईनमध्ये रहायचं आहे. त्यांना घरातून बाहेर पडायचं नाहीये. आता तर लॉकडाऊन झालं आहे. खरंतर. या विशिष्ट स्थितीत त्यांनी होम क्वारंटाईनमध्ये किमान 14 दिवस रहायचं आहे. अशी सूचना आम्ही त्यांना देत आहोत.

मोदी जी: चला डॉक्टर. आपण तर खूप चांगली सेवा करत आहात आणि समर्पण भावनेनं करत आहात. आपली पूर्ण टीम यात गुंतली आहे. मला विश्वास आहे की आमचे जितके रूग्ण आले आहेत, सर्व जण सुरक्षित होऊन आपल्या घरी जातील आणि देशातही आपल्या सर्वांच्या मदतीनं या लढाईत आपण जिंकूच.

डॉक्टर: सर, आम्हाला विश्वास आहे की आम्ही जिंकू. ही लढाई आम्ही जिंकणार आहोत.

मोदी जी: खूप खूप शुभकामना डॉक्टर आपल्याला. धन्यवाद डॉक्टर|

डॉक्टर: थँक यू सर.

मित्रांनो, आमचे हे सर्व साथी, आपल्याला, पूर्ण देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी गुंतले आहेत. ते ज्या गोष्टी आपल्याला सांगत आहेत त्या केवळ ऐकायच्याच नाहीत तर जीवनात अमलात आणायच्या आहेत. आज मी जेव्हा डॉक्टरांचा त्याग, तपस्या, समर्पण पहातो तेव्हा मला आचार्य चरक यांनी सांगितलेली गोष्ट आठवते. आचार्य चरक यांनी डॉक्टरांसाठी अगदी स्पष्ट सांगितलं होतं आणि आज ते आम्ही डॉक्टरांच्या जीवनात पहात आहोत. आचार्य चरक यांनी म्हटलं आहे

न आत्मार्थम् न अपि कामार्थम् अतभूत दयां प्रति ||

वतर्ते यत् चिकित्सायां स सवर्म इति वर्तते ||

अर्थात, धन आणि एखाद्या खास कामनेसाठी नव्हे तर केवळ रूग्णाच्या सेवेसाठी, दयाभाव ठेवून कार्य करतो तो  सर्वश्रेष्ठ चिकित्सक असतो.

मित्रांनो,

मानवतेने भरलेल्या प्रत्येक परिचारिकेला आज मी नमन करतो. आपण सर्व ज्या सेवाभावानं काम करता, तो अतुलनीय आहे. हाही योगायोग आहे की यावर्षी 2020 ला संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय परिचारिका आणि दाई वर्ष म्हणून साजरं करत आहे. याचा संबंध 200 वर्षांपूर्वी 1820 मध्ये जन्मलेल्या फ्लोरेन्स नायटिंगलशी आहे. ज्यांनी मानवसेवेला, नर्सिंगला एक नवी ओळख दिली. एका नव्या उंचीवर नेऊन पोहचवलं. जगातल्या प्रत्येक परिचारिकेच्या सेवाभावानं समर्पणभावनेला समर्पित हे वर्ष निश्चितपणानं नर्सिंग समुदायासाठी एक मोठा कसोटीचा काळ म्हणून समोर आला आहे. मला विश्वास आहे की आपण सर्व या परिक्षेत यशस्वी व्हाल इतकंच नव्हे तर अनेक जीवही वाचवाल.

आपल्यासाऱख्या सर्व साथीदारांचा निर्धार आणि भावनांच्यामुळेच ही इतकी मोठी लढाई आम्ही लढू शकत आहोत. आपल्यासारखे साथी जसे की डॉक्टर असो, परिचारिका असो, निमवैद्यकीय कर्मचारी,  आशा, एएनएम कार्यकर्ता,सफाई कामगार, आपल्या आरोग्याची देशाला खूप चिंता आहे. हे लक्षात घेऊनच, अशा जवळपास 20 लाख मित्रांसाठी 50 लाख रूपयांपर्यत आरोग्य विमा योजनेची घोषणा सरकारने केली आहे, ज्यामुळे आपण या लढाईत अधिक आत्मविश्वासानं देशाचं नेतृत्व करू शकाल.  

माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोना विषाणुच्या या लढाईत आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत जे समाजातील खरे नायक आहेत आणि या परिस्थितीत सर्वात पुढे उभे आहेत. मला NarendraModi App वर, नमो App वर बंगळुरूच्या निरंजन सुधाकर हेब्बाले यांनी लिहिलं आहे की असे लोक दैनंदिन जीवनातील नायक आहेत. ही गोष्ट खरीही आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्यामुळे आमचं दैनंदिन आयुष्य सहजपणे सुरू राहतं.  आपण कल्पना करा एक दिवस आपल्या घरी नळाला येणारं पाणी बंद होतं किंवा आपल्या घरातील विजपुरवठा अचानक खंडित होतो. तेव्हा हे दैनंदिन आयुष्यातले नायकच आमच्या अडचणी दूर करतात. आपण जरा आपल्या घराच्या शेजारी असलेलं किराणा दुकानाचा विचार करा. आज इतक्या अवघड काळात तो जोखिम पत्करतो आहे. अखेर कशासाठी? यासाठीच नं की आपल्याला

गरजेच्या वस्तु मिळण्यात काही अडचण होऊ नये. अगदी याच प्रकारे, ते चालक, ते कामगार यांच्याबद्दल विचार करा जे न थांबता आपल्या कामात गुंतलेले आहेत ज्यामुळे देशात आवश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीत व्यत्यय येणार नाही. आपण पाहिलं असेल, बँकिंग सेवा सरकारनं सुरू ठेवली आहे. बँकिंग क्षेत्रातले आमचे लोक पूर्ण चिकाटीनं, मनापासून या लढाईचं नेतृत्व करत बँकांना सांभाळत आहेत, आपल्या सेवेत उपस्थित आहेत. आजच्या घडीला ही सेवा लहान नाही. त्या बँक कर्मचाऱ्यांना आम्ही जितके धन्यवाद देऊ तितके कमीच आहेत. मोठ्या संख्येनं आमचे साथी ई कॉमर्स कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉय. म्हणून काम करत आहेत.हे लोक या अवघड काळातही गृहोपयोगी वस्तुंचं वितरण करण्याच्या कामाला लागले आहेत. जरा विचार करा आपण लॉकडाऊनच्या काळात जो दूरचित्रवाणी पाहू शकत आहात, घरात राहूनही फोन आणि इंटरनेटचा वापर करत आहात, त्या सर्वांना व्यवस्थित ठेवण्यासाठी कुणी ना कुणी तरी खपत आहे. या काळात आपल्यातील बहुतांश लोक डिजिटल पेमेंट सहजपणे करू शकत आहात, त्यामागे खूप लोक काम करत आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान हेच लोक आहेत की जे देशाचं कामकाज पहात आहेत. आज सर्व देशवासियांच्या वतीनं, मी त्यां सर्व लोकांचे आभार मानतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतःसाठी सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी. स्वतःची काळजी घ्यावी, कुटुंबियांची काळजी घ्यावी.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मला काही अशा घटना समजल्या आहेत की ज्यात कोरोना विषाणुच्या संशयितांना ज्यांना होम क्वारंटाईनमध्ये रहाण्यास सांगितलं आहे, त्यांच्याबरोबर काही लोक वाईट वर्तन करत आहेत. अशा गोष्टी ऐकून मला अतिशय दुःख झालं आहे. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्हाला हे समजून घ्यायला हवं की, सध्याच्या परिस्थितीत आम्हाला केवळ एक दुसऱ्यापासून सामाजिक अंतर राखायचं तर आहेच, पण भावनिक किंवा मानवी अंतर राखायचं नाही. असे लोक कुणी गुन्हेगार नाहीत केवळ ते विषाणुचे संशयित पीडित आहेत. या लोकांनी दुसऱ्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी स्वतःला अलग केलं आहे आणि क्वारंटाईनमध्ये रहात आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी आपली जबाबदारी गांभिर्यानं घेतली आहे. इथपर्यंत की काहींनी तर विषाणुची कोणतीही लक्षणं दिसत नसतानाही स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. त्यांनी असं यासाठी केलं आहे की ते परदेशातनं परतले आहेत आणि दुहेरी सावधानता बाळगत आहेत.

ते हे सुनिश्तिच करू पहात आहेत की, कोणत्याही परिस्थितीत दुसरी व्यक्ति त्यांच्यामुळे विषाणुनं संसर्गित होऊ नये. म्हणून हे लोक इतकी जबाबदारी दाखवत आहेत तर त्यांच्याबरोबर वाईट वर्तणूक कोणत्याही पद्धतीने योग्य नाही. त्यांच्याप्रति सहानुभूतीपूर्वक सहयोग आवश्यक आहे.

कोरोना विषाणुशी लढण्याची सर्वात परिणामकारक पद्धत सोशल डिस्टन्सिंग हीच आहे, पण, आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, सोशल डिस्टन्सिंग याचा अर्थ सामाजिक संवाद संपवणं हा नाही. वास्तवात, ही वेळ, आता सर्व जुन्या सामाजिक नात्यांमध्ये जीव ओतण्याची आहे. त्या नात्यांना नव्यानं ताजं करण्याची आहे. एक प्रकारे ही वेळ आम्हाला हे सांगत आहे की सोशल डिस्टन्सिंग वाढवा मात्र भावनिक अंतर कमी करा. मी पुन्हा सांगतो की, सोशल डिस्टन्सिंग वाढवा आणि भावनिक अंतर कमी करा. कोटाहून यशवर्धन यांनी NarendraModi Appवर लिहिलं आहे की ते लॉकडाऊनमध्ये कुटुंबाचे बंध मजबूत करत आहेत. मुलांबरोबर बोर्ड गेम्स आणि क्रिकेट खेळत आहेत. स्वंयपाकगृहात नवे नवे पदार्थ बनवत आहेत. जबलपूरच्या निरूपमा हर्षेय जी NarendraModi App वर लिहितात की त्यांना प्रथम रजई बनवण्याचा आपला छंद पूर्ण करण्याची संधी मिळाली. इतकंच नाही तर बागकामाचा छंद त्या पूर्ण करत आहेत. तर रायपूरचे परिक्षित, गुरूग्रामचे आर्यमन आणि झारखंडचे सूरजजी यांची पोस्ट वाचायला मिळाली. ज्यात त्यांनी आपल्या शाळेतील मित्रांबरोबर पुनर्भेटीबद्दल चर्चा केली आहे. त्यांची ही कल्पना खूप मनोरंजक आहे. असं होऊ शकतं की, आपल्याला आपल्या दशकांपासून आपली शाळा, महाविद्यालय आणि मित्रांशी बोलण्याची संधी मिळाली नसेल. आपणही कल्पना अमलात आणून पहा. भुवनेश्वरचे प्रत्युष देवाशिष आणि कोलकत्याच्या वसुधा माधोगडिया यांनी सांगितलं की, आजकाल त्या पुस्तकं वाचत आहेत की जी त्या इतके दिवस वाचू शकल्या नव्हत्या. सोशल मिडियामध्ये मी पाहिलं की, काही लोकांनी, वर्षांपासून घरात पडलेले तबले, वीणा अशी अनेक संगीत वाद्ये काढून रियाज सुरू केला आहे. आपणही असं करू शकता. यामुळे, आपल्याला संगीताचा आनंद तर मिळेलच पण जुन्या आठवणीनांही उजाळा मिळेल. म्हणजे या बिकट प्रसंगात असा एक क्षण मुश्किलीने मिळाला आहे ज्यात, आपल्याला आपल्याशी जोडले जाण्याची संधी मिळेल, उलट आपण आपल्या आवडीच्या छंदाशी जोडले जाल. आपल्याला, आपले जुने मित्र आणि कुटुंबियांशी जोडण्याची पूर्ण संधी मिळेल.

नमो app वर मला रूडकीच्या शशिजी यांनी विचारलं आहे की लॉकडाऊनच्या काळात, मी माझ्या फिटनेससाठी काय करतो? या परिस्थितीत मी नवरात्रिचे उपास कसे करतो? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुम्हाला घराबाहेर पडण्याची मनाई केली आहे पण आपल्याला आपल्या अंतर्मनात डोकावण्याची संधीही दिली आहे. ही संधी आहे, बाहेर निघू नका, आपल्या अंतरात प्रवेश करा आणि स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न करा.

नवरात्रीच्या उपासाबाबत सांगायचं तर तो मी आणि माझी शक्ती, भक्ति यांच्यातील विषय आहे. तंदुरूस्तीची गोष्ट  आहे तर मला वाटतं की चर्चा फार लांबेल. मी असं करतो की मी सोशल मिडियात मी काय करत आहे असे काही व्हिडिओ अपलोड करेन. NarendraModi App वर आपण ते व्हिडिओ जरूर पहा. जे मी करतो त्यातील काही गोष्टी कडाचीय आपल्या उपयोगाला येतील.पण एक गोष्ट समजून घ्या की मी काही फिटनेस तज्ञ नाही. ना ही मी योगशिक्षक आहे. मी केवळ सराव करणारा आहे. हा, मी हे जरूर मानतो की, योगाच्या काही आसनांचा मला लाभ झाला आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान आपल्याला यातल्या काही गोष्टी कामाला येतील.

मित्रांनो, कोरोनाच्या विरोधातील हे युद्ध अभूतपूर्व आहे आणि आव्हानात्मकही आहे. म्हणून, या दरम्यान काही निर्णय असे घेतले जात आहेत की, जे जगाच्या इतिहासात कधीही पहायला आणि ऐकायला मिळणार नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी भारतवासियांनी जी काही पावलं उचलली आहेत, जे प्रयत्न आपण करत आहोत, ते भारताला कोरोना महामारीवर विजय मिळवून देतील. प्रत्येक भारतीयाचा संयम आणि

संकल्प आपल्याला या अवघड स्थितीतून बाहेर काढेल. त्याबरोबर गरिबांप्रती आपल्या संवेदना अधिक तीव्र असल्या पाहिजेत. आपली माणुसकी यातच आहे की कुणी गरिब, दुःखी, उपाशी दिसतो तेव्हा या संकटाच्या घडीला आम्ही प्रथम त्याचे पोट भरू आणि त्याच्या गरजेची चिंता करू. हे भारत करू शकतो.हे आमचे संस्कार आहेत, ही आमची संस्कृती आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्रत्येक भारतीय, आपल्या आयुष्याच्या रक्षणासाठी आपल्या घरात बंद आहे. पण येणाऱ्या काळात हाच भारतीय आपल्या देशाच्या विकासासाठी सर्व भिंती तोडून पुढे जाईल, देशाला पुढे घेऊन जाईल. आपण, आपल्या कुटुबियांसमवेत घरातच रहा, सुरक्षित आणि सावध रहा, आपल्याला हे युद्ध जिंकायचं आहे. जरूर जिंकणार. खूप खूप धन्यवाद, मन की बातसाठी, पुन्हा पुढच्या महिन्यात भेटू आणि तोपर्यंत या संकटावर मात करण्यात आपण यशस्वी होऊ, याच एका भावनेसह, याच शुभकामनेसह, आपल्या सर्वांना धन्यवाद!

 

 

 

S.Tupe/AIR/R.Aghor/D.Rane

 



(Release ID: 1608962) Visitor Counter : 652


Read this release in: English , Hindi