आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ हर्षवर्धन यांच्या हस्ते राष्ट्रीय टेलीकन्सलटेशन (CoNTeC) केंद्राचे उद्घाटन

Posted On: 28 MAR 2020 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2020


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात राष्ट्रीय टेलीकन्सलटेशन (CoNTeC) केंद्राचे उद्घाटन केले. तसेच राज्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रमुख अधिकारी आणि देशभरातील इतर एम्समधल्या डॉक्टरांशी संवाद साधत कोविड-19 च्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला.  

CoNTeC हे राष्ट्रीय टेलीकन्सलटेशन केंद्राचे लघुरूप असून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकल्पनेनुसार हे केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्राची अंमलबजावणी दिल्लीच्या एम्स म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेद्वारे केली जाणार आहे.

देशभरातील सर्व डॉक्टरांना थेट वेळेत एम्स च्या डॉक्टरांशी सल्लामसलत करता यावी आणि कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी, हे राष्ट्रीय टेलीकन्सलटेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना 24 तास सल्ला आणि मार्गदर्शन मिळू शकणार आहे. ही सेवा हाताळणाऱ्या डॉक्टरांची एम्स मध्येच राहण्या-खाण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ हर्षवर्धन यांनी दिली.

देशभरातील छोट्या रूग्णालयातल्या डॉक्टरांना एम्स मधल्या तज्ञ, अनुभवी डॉक्टरांचा लाभ मिळावा, यासाठी हे केंद्र सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील डॉक्टर्स कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत, किमान भारतात तरी, सर्व ठिकाणी उपचारासाठी एकच पद्धत पाळली जावी, यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असे डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून टेलीमेडिसिनच्या मार्गदर्शक सूचना अधिसूचित करण्यात आल्या आहेत, त्याचा लाभ केवळ कोरोनाच नव्हे तर इतर आजारांचा सामना करण्यासाठी देखील होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

भारत हा विशाल देश असून अशा देशात गरिबांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत गरीब जनता योग्य उपचारांपासून वंचित राहणार नाही, यासाठी ह्या केंद्राची मदत होईल, असे ते म्हणाले.  

सध्याची जगभरातील परिस्थिती बघता आणि सद्यस्थितीचा आढावा घेऊन, देशातल्या वैद्यकीय सुविधा वाढवल्या जातील, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

या केंद्राच्या कामाची चाचणी म्हणून डॉ हर्षवर्धन यांनी आजयेथून एक टेली कम्युनिकेशन देखील केले.

CoNTeC या टेलीमेडिसिन केंद्रात दृकश्राव्य माध्यमातून देशभरातील सर्व रुग्णालयातील डॉक्टरांना 24 तास मार्गदर्शन मिळणार आहे. साधा फोन, whatsapp, स्काईप आणि गुगल डूओ अशा संपर्क माध्यमातून या सेवेचा लाभ घेता येणार आहे

 

CoNTeC वर संपर्क कसा साधायचा?

या सेवेचा लाभ घेऊन संपर्क करण्यासाठी +91 911544415 हा क्रमांक असून ते देशभरातून/जगभरातून कुठूनही त्यावर संपर्क साधता येईल. या केंद्राचे सहा टेलिफोन लाईन्स असतील, आणि त्या सहाही लाईन्सवर एकाचवेळी संपर्क साधता येईल. भविष्यात गरज पडल्यास, ह्या लाईन्स वाढवल्या जातील. CoNTeC केंद्राचे व्यवस्थापक हे दूरध्वनी उचलतील आणि त्यानंतर संबंधित तज्ञ डॉक्टरांकडे हा दूरध्वनी जोडला जाईल

 

 

R.Tidke/R.Aghor/D.Rane


(Release ID: 1608940) Visitor Counter : 167


Read this release in: English