शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय ऑनलाईन शिक्षणासाठीच्या स्वयम् आणि इतर डिजिटल उपक्रमांच्या वापरात तिपटीने वाढ – मनुष्यबळ विकास मंत्री

Posted On: 28 MAR 2020 5:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 मार्च 2020

 

देशात सध्या सुरु असलेल्या संपूर्ण बंदीच्या कालावधीत घरी राहावे लागलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यार्जन सुरु राहण्याचा खात्रीशीर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध ऑनलाईन, डिजिटल शिक्षणाचे उपक्रम राबविले आहेत. या शैक्षणिक मंचाचा लाभ घेऊन, विद्यार्थ्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ अधिकाधिक प्रमाणात सत्कारणी लावावा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी केले आहे.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, राष्ट्रीय ऑनलाईन शिक्षण मंच स्वयम आणि इतर डिजिटल उपक्रमांचा वापर करणाऱ्या व्यक्तींची संख्या गेल्या एका आठवड्यात तिपटीने वाढली, अशी माहिती त्यांनी दिली. शिकविण्याच्या उत्तम साधनांचा अंतर्भाव असलेल्या स्वयम या मंचाला निःशुल्क प्रवेश घेण्यास मान्यता दिल्यानंतर ही वाढ झाली, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या आधी स्वयम मधील प्रवेशासाठी पूर्व नोंदणी आवश्यक होती. मात्र आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यायला प्रोत्साहन देणे आणि देशातील बंदी कालावधीचा सदुपयोग करून घेण्यासाठी स्वयम मधील अभ्यासक्रमात देशातील कोणत्याही व्यक्तीला नोंदणी न करता निःशुल्क प्रवेश घेऊन शिक्षण सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या सोमवारपासून 50 हजार नविन लोकांनी स्वयम ला भेट देऊन नोंदणी केली आहे. यापूर्वी स्वयम मध्ये 25 लाख व्यक्तींनी जानेवारी पासून सुरु झालेल्या सत्रात ५७१ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणाला सुरुवात केली आहे.

स्वयम द्वारे सरकारने एकूण 1900 अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले आहेत. दररोज सुमारे 50 हजार प्रेक्षक स्वयमप्रभा डीटीएच वाहिनीवरचे व्हिडिओ बघतात तर राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाचा वापर करणाऱ्यांमध्ये बंदीच्या काळात दुपटीने वाढ होऊन त्यांची संख्या 43 हजार झाली आहे, अशी माहिती पोखरीयाल यांनी दिली. केंद्र सरकारने सुरु केलेल्या या सर्व उपक्रमांचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी परिणामकारक उपयोग करून घ्यावा आणि समृद्ध शैक्षणिक अनुभवाने संपन्न व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री पोखरीयाल यांनी केले आहे.

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Kor



(Release ID: 1608855) Visitor Counter : 105


Read this release in: English