कोळसा मंत्रालय
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या संपूर्ण बंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक ठिकाणी कोळशाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने उचलली पावले: प्रल्हाद जोशी’
Posted On:
28 MAR 2020 1:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2020
कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू केलेल्या संपूर्ण बंदीच्या काळात वीजनिर्मिती आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांचे कार्य अखंडित सुरु राहावे यासाठी कोळसा पुरवठ्याचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये केला आहे अशी ग्वाही कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. या बंदीच्या काळात अतिमहत्त्वाच्या क्षेत्रांना कोळशाचा आवश्यक पुरवठा केला जाईल याची खात्री करून घेण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी कोळसा मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले.
कोळशाचे पुरेसे उत्पादन, पुरवठा आणि तो योग्य ठिकाणी वेळेवर पाठविणे या सर्व टप्प्यांवर नीट लक्ष ठेवण्यासाठी कोळसा मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोज बैठका होत आहेत. कोळसा सचिव अनिल कुमार जैन यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यासंदर्भातील पहिली बैठक घेतली. त्या बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार देशाच्या वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये आगामी 24 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक आहे. अशा प्रत्येक दैनंदिन बैठकीचा अहवाल कोळसा मंत्र्यांना दिला जाणार आहे. देशातील कोळश्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक उद्योगाला तसेच वीज निर्मिती क्षेत्राला सुलभपणे कोळश्याचा पुरेसा आणि खात्रीशीर पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत अशी माहिती जोशी यांनी दिली.
कोविड संसर्गाने निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत कोळसा उत्पादन आणि पुरवठा व्यवस्थित होईल याची खात्री करून घेण्यासाठी कोल इंडिया कंपनीचे सर्व अधिकारी करत असलेल्या कामाचे केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक केले.
या बंदीच्या काळात कोळसा मंत्रालय कोणत्याही नवीन प्रस्तावांच्या मंजुरीला प्रलंबित ठेवणार नाही अशी ग्वाही प्रल्हाद जोशी यांनी दिली.
B.Gokhale/S.Chitnis/P.Kor
(Release ID: 1608783)
Visitor Counter : 157