राष्ट्रपती कार्यालय

कोविड -19 च्या प्रतिसादाविषयी, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल, नायब राज्यपाल व प्रशासकांशी केली चर्चा

Posted On: 27 MAR 2020 9:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मार्च 2020

 

कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना जोड देण्याचे मार्ग शोधण्याबद्दल, भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती श्री.वेंकैय्या नायडू यांनी आज (27 मार्च 2020) राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल, नायब राज्यपाल व प्रशासकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

समाजाच्या सामूहिक शक्तीला प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रपतींनी संवाद सुरु केला व राज्यपाल, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना असे आवाहन केले की लवकरात लवकर हे संकट दूर करण्यासाठी त्यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी, तसेच सामाजिक व धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी जबाबदाऱ्या सोपवून काम करण्यास उद्युक्त करावे.

'सहभावना व सहसंवेदना' सांभाळणारी भारतीय समाजाची आंतरिक शक्ती व सरकारचे प्रयत्न यामुळे समाजातील वंचित घटक, असंघटित क्षेत्रातील कामगार अन्य दुर्बल वर्गांना या संकटाची झळ बसण्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल', अशी अशा राष्ट्रपती कोविंद आणि उपराष्ट्रपती नायडू यांनी व्यक्त केली. या साथरोगाचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांपैकी 14 राज्यांचे राज्यपाल व दिल्लीचे नायब राज्यपाल यांची, सदर विडिओ कॉन्फरन्समध्ये अनुभवकथनासाठी निवड करण्यात आली होती.  

उपराष्ट्रपतींनी प्रचलित केलेल्या या विडिओ कॉन्फरन्समध्ये, देशात लॉकडाउन प्रत्यक्षात आणताण जनतेचा त्रास कमी करण्यासाठी विविध राज्यांनी योजलेले  सर्वोत्कृष्ट उपाय सर्वांसमोर मांडले गेले.

विविध राज्यांतील कोविड -19 ची स्थिती, दुर्बल घटकांच्या संबंधाने रेड क्रॉसची भूमिका, कोरोना विषाणूच्या  प्रसाराला आळा घालण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी सामान्य जनतेची व स्वयंसेवी संस्थांची भूमिका या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. विशेषतः  लॉकडाउन आणि सध्याच्या स्थितीत उद्भवणाऱ्या अन्य आव्हानांबद्दल चर्चा करण्यात आली.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या प्रारंभी, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगत सिंग कोश्यारी यांनी, राज्य सरकारने या साथीचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केरळात सामाजिक ठिकाणी व्यक्ती-व्यक्तींतील योग्य अंतर राखण्यासाठी लोकांचा पाठपुरावा करण्याच्या कामी सरकार, स्वयंसेवी संघटना, वैद्यकीय व्यावसायिक, निमवैद्यकीय व्यक्ती आणि पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेचे केरळचे राज्यपाल श्री.अरिफ मोहम्मद खान यांनी कौतुक केले. "विनाकारण रस्त्यात फिरत राहू नका, घरी सुरक्षित राहा" अशा अर्थाच्या काव्यपंक्तीही त्यांनी उद्धृत केल्या. शिवाय, 1800 निवृत्त डॉक्टर्स आणि राज्यातील वैद्यक शाखेचे विद्यार्थी यांनी गरज उत्पन्न झाल्यास स्वतःहून सेवा करण्याची तयारी दाखवत  सरकारकडे तसे नोंदविल्याचेही त्यांनी सांगितले. विलगीकरण अवघड वाटत असणाऱ्यांना सल्ला व समुपदेशन देण्यासाठी 375 मानसशास्त्रज्ञही तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. अन्य राज्यांनाही अनुकरण करता येईल असे हे केरळमधील एक महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.

कर्नाटकचे राज्यपाल श्री.वजुभाई वाला यांनी, या संकटाचा सामना करण्यासाठी समाजाच्या सामूहिक शक्तीचे गुणगान गायले. या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी कर्नाटकमध्ये रेड क्रॉस सोसायटीचे सुमारे 8000 कार्यकर्ते काम करत आहेत. तर राज्यभर अन्नवितरण करण्यासाठी अक्षय पात्र या सामाजिक संस्थेचे काम अविरत चालू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हरयाणा पूर्ण तयार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.सत्यदेव नारायण आर्य यांनी केले. दिल्लीचे नायब राज्यपाल श्री.अनिल बैजल यांनी सांगितले की, "लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी आणि लोकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत." तसेच "मुख्यमंत्र्यांबरोबर होत असलेल्या रोजच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला जातो . तर जिल्हा पातळीवर जनजागृतीसाठी समन्वयाने काम सुरु आहे", असेही त्यांनी सांगितले.

तेलंगणात आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरु असून, जनजागृतीसाठी सरकार समाजमाध्यमांचा प्रचंड वापर करत असल्याची माहिती राज्यपाल डॉ.तामिळीसाई सौन्दरराजन यांनी दिली. राजभवनाजवळ राहणाऱ्या 800 गरजू कुटुंबांना अन्न पुरविण्यासाठी राजभवनाच्या वतीने पावले उचलली असल्याचेही त्या म्हणाल्या. जनजागृतीसाठी कलाकार, चित्रपट अभिनेते, लेखक आदींची मदत घेता येईल, असे उपराष्ट्रपती एम.वेंकैया नायडू यांनी त्यांना सुचविले.

पश्चिम बंगालमधील विद्यापीठे गरज पडल्यास उपयोगात आणता येतील अशा दृष्टीने तयार असल्याची माहिती राज्यपाल श्री.जगदीप धांखड यांनी दिली. जनजागृतीसाठी रेड क्रॉस मार्फत उत्तम कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल श्री.बंडारू दत्तात्रय यांनीही, रेड क्रॉस सोसायटी जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असल्याचे सांगितले. आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.

बिहारच्या लगत आंतरराष्ट्रीय सीमा असल्याने जास्त धोका असल्याचे सांगत प्रादुर्भावाला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारकडून चांगले प्रयत्न सुरु असल्याचे राज्यपाल श्री.फागू चौहान यांनी सांगितले. जनजागृतीसाठी रेड क्रॉस प्रयत्न करत असून त्यांच्या रुग्णवाहिकाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.

तामिळनाडूमध्ये बांधकामावरील कामगारांना डाळ-भात वगैरे पुरविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे राज्यपाल श्री.बनवारीलाल पुरोहित यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गतच्या सर्व भातशिधापत्रिका धारकांना 1000 रुपये रोख देण्यात येणार आहेत. अम्मा कॅन्टीन्सच्या माध्यमातून अनुदानित अन्नपुरवठा सुरु आहे. जनजागृतीसाठी प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी तामिळनाडूच्या राज्यपालांनाही दिला.

मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री.लालजी टंडन यांनी प्रशासनाच्या तत्परतेचे व कार्यकुशलतेचे कौतुक केले. रोजंदारीवरील कामगारांना जेवण पुरविण्याची खबरदारी घेतली जात असल्याचे सांगत रेड क्रॉस सोसायटीकडून होत असलेल्या कामाची माहितीही त्यांनी दिली.

पंजाबचे राज्यपाल आणि चंडीगडचे प्रशासक श्री.व्ही.पी.सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडमध्ये खाद्यपदार्थांची पाकिटे पुरविण्यासाठी रेड क्रॉसची मदत होत आहे. व अन्य आवश्यक पावले पंजाब आणि चंदीगडमध्ये उचलली जात आहेत.

राजस्थानमध्ये लोकांना देणगी देता येण्यासाठी एका निधीची निर्मिती करण्यात आल्याची माहिती राजस्थानचे राज्यपाल श्री. कालराज मिश्रा यांनी दिली. व्यक्ती-व्यक्तींमध्ये उचित अंतर राखण्यासाठी सर्व स्तरांत प्रयत्न सुरु असून सर्व संस्था आणि यंत्रणा सुयोग्यपणे हे आव्हान पेलत आहेत, असेही ते म्हणाले.

या विडिओ कॉन्फरन्सचा समारोप करताना राष्ट्रपती कोविंद यांनी, संबंधित राज्य सरकारशी सतत संपर्कात राहून परिस्थितीचा नियमित आढावा घेत राहण्याचे आवाहन सर्वांना केले. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत यशस्वी होण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले. या परिषदेत मांडलेल्या चांगल्या उपाययोजना देशाच्या अन्य भागांतही अमलात आणल्या जाऊ शकतात, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.

 

U.Ujgare/J.Vaishampayan/P.Kor



(Release ID: 1608666) Visitor Counter : 163


Read this release in: English