संरक्षण मंत्रालय

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी भारतीय हवाई दलाचे सहकार्य सुरूच

Posted On: 26 MAR 2020 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मार्च 2020

देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय हवाई दल देखील सरसावले असून नागरी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.

यासाठी भारतीय हवाई दलाने देशभरातील आपल्या महत्वाच्या तळांवर विलगीकरण सुविधा कक्ष स्थापन केले असून त्यांची क्षमता 200-300 रुग्ण इतकी आहे.

बेंगरूळूच्या कमांड या हवाई दलाच्या रुग्णालयात कोविड संसर्गाच्या चाचणीसाठी हवाई दलाची पहिली प्रयोगशाळा सुरु केली आहे. या प्रयोगशाळेमुळे, त्या प्रदेशातील संशयितांची चाचणी करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली असून, त्यानुसार चाचणीचे निदान लगेच आल्यास, त्यानुसार उपचार करता येणार आहेत.

सध्याच्या परीस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि लोकांना 24 तास कुठलीही मदत किंवा सहकार्य हवे असल्यास, हवाई दलाच्या मुख्यालयात आणि इतर कमांड मुख्यालयांमधेही एक पूर्णवेळ आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.भारतीय हवाई दलाची विमाने लेह येथे वैद्यकीय औषध पुरवठा आणि तपासणीसाठी चंदिगड व दिल्ली येथे रक्ताचे नमुने पोहचवण्याचे काम करत आहेत.

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या सर्व उपाययोजना आणि निर्देशांचे पालन हवाई दलाच्या सर्व कार्यालयांमध्ये काटेकोरपणे केले जात आहे.

कोविड-19 चा सामना करण्याच्या या लढाईत, भारतीय हवाई दल सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे असून देशाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 



(Release ID: 1608408) Visitor Counter : 133


Read this release in: English