विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड -19 विरोधात स्टार्ट अप उद्योगांनी आणलेल्या तंत्रज्ञानाच्या जोडणीसाठी विज्ञान-तंत्रज्ञान विभागाकडून कृतिदल स्थापन


निदान, चाचण्या, आरोग्यसेवा आणि उपकरणांचा पुरवठा यासंबंधी बाजारपेठेत वापरण्याजोग्या तयार उपायांना निधीपुरवठा करण्याचा उद्देश

Posted On: 26 MAR 2020 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मार्च 2020

 

कोविड -19 मुळे उत्पन्न झालेले अनेकविध प्रश्न सोडविण्यासाठी उचित तंत्रज्ञानाचा आणि कारखानदारी क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीने, DST म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञान विभाग, समन्वयाने प्रयत्न करीत आहे. तसेच कोविड -19 साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या अनेक तातडीच्या गरजा भागविण्यासाठी देशाला सज्ज करण्याकरिता नवनवीन मार्ग शोधून काढण्यातही विभागाचा पुढाकार आहे.

संशोधन-विकास प्रयोगशाळा, शिक्षणसंस्था, नवे म्हणजे स्टार्टअप उद्योग व सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांकडील तंत्रज्ञान जोडून घेण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाने 'कोविड -19 ' कृतिदलाची स्थापना केली आहे. निदान, चाचण्या, आरोग्यसेवा आणि उपकरणांचा पुरवठा यासंबंधी बाजारपेठेत वापरता येण्याइतक्या तयार उत्पादनांच्या निर्मिती साठी निधीपुरवठा करणे, हा त्यामागचा उद्देश आहे. मास्क व अन्य सुरक्षा उपकरणेसॅनिटाइझर म्हणजे हात स्वच्छ करणारा अल्कोहोलयुक्त द्रव, तपासण्यांसाठी परवडण्याजोग्या किमतीतील किट्स, व्हेंटीलेटर अर्थात जीवरक्षक प्रणाली, ऑक्सिजनेटर म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा आदींचा त्या उपायांत समावेश होतो. याखेरीज, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आणि IOT वर आधारित मार्गांनी विषाणूच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवणे, आणि नियंत्रण यासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचाही यात अंतर्भाव होतो. 

क्षमता जोडणी गटात विज्ञान तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग(DBT), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), अटल नवोन्मेष अभियान (AIM), सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, स्टार्ट अप इंडिया आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांचे प्रतिनिधी आहेत. मोठी झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभे असलेले, कदाचित आर्थिक किंवा अन्य साहाय्याची गरज असणारे  तसेच, वाढीसाठी मोठी मागणी मांडणारे स्टार्ट अप उद्योग ओळखणे, हे या कृतिदलाचे काम आहे.

संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना अशी विनंती करण्यात आली आहे, की त्यांच्या पाठबळावर उभे असणाऱ्या आणि कोविड -19 च्या कोणत्याही महत्त्वपूर्ण पैलूवर तंत्रज्ञानात्मक उत्तर देऊ शकणाऱ्या स्टार्ट अप आणि अन्य उद्योगांबद्दलची माहिती वेगाने मिळविण्यासाठी, त्यांनी व्यक्तिश: प्रयत्न करावेत.

योग्य तंत्रज्ञानात्मक उपाय जलदगतीने विकसित करणे, त्यांचे उत्पादन आणि ठिकठिकाणी ते पोहोचवून प्रत्यक्ष अंमलबजावणी यासाठी वापरण्याच्या यंत्रणांचा भाग म्हणून विज्ञान तंत्रज्ञान विभागाने दोन स्वतंत्र प्रस्ताव मागवले आहेत. यापैकी एक, विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (SERB) तर दुसरा तंत्रज्ञान विकास मंडळ (TRB) अंतर्गत मागवण्यात आला आहे. विज्ञाननिष्ठ उपाय आणि नव्या व रूढ उपायांचे व्यापारी दृष्टिकोनातून उत्पादन, या दोन्हींना पाठबळ देण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव महत्त्वाचे आहेत.  

 

G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1608386) Visitor Counter : 163


Read this release in: English