रेल्वे मंत्रालय

देशभरात आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी भारतीय रेल्वे अहोरात्र कार्यरत


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालवाहू गाड्यांची सेवा सुरु असून प्रवासी रेल्वे सेवा स्थगित

Posted On: 24 MAR 2020 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या महामारीच्या  पार्श्वभूमीवर  भारतीय रेल्वेने 31 मार्च 2020 पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे परिचालन स्थगित केले आहे.

सध्या  देशभरात फक्त मालगाड्या सुरु आहेत. रेल्वे आपल्या अखंडित मालवाहतूक सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे सर्वतोपरी  प्रयत्न करत आहे.

विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या परिस्थिती असून या काळात देशातील अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अनेक शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांवर तैनात असलेले भारतीय रेल्वे कर्मचारी 24/7 कार्यरत आहेत.

23 मार्च 2020 रोजी 474 डब्यांमधून अन्नधान्य, मीठ, खाद्यतेल, साखर, दूध, फळे आणि भाज्या, कांदा, कोळसा आणि पेट्रोलियम उत्पादने अशा आवश्यक वस्तूची वाहतूक  करण्यात आली. दिवसभरात रेल्वेने एकूण 891 रॅक च्या माध्यमातून पोलाद, स्टील, सिमेंटखते, कंटेनर इत्यादी महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा केला.

राज्य सरकारांशी समन्वय साधला जात आहे जेणेकरून कोविड -19. च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांदरम्यान जीवनावश्यक वस्तूंचे मालवाहतुक डबे कोणत्याही विलंबाशिवाय सहजतेने हाताळले जातील.

जीवनावश्यक वस्तूंच्या अखंड वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी, रेल्वे मंत्रालयात एक आपत्कालीन मालवाहतूक नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून मालवाहतुकीवर देखरेख  ठेवली जात आहे.

मालगाडी वाहतूक, देखभाल कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि  रेल्वे रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी नियंत्रण कक्षात तैनात असलेले रेल्वे कर्मचारी 24/7 कार्यरत आहेत.

या कठीण काळात भारतीय रेल्वे आपली महत्त्वपूर्ण भूमिका जाणून आहे आणि सर्व संबंधितांना आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1607964) Visitor Counter : 154


Read this release in: English