पंतप्रधान कार्यालय
इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या प्रमुख हितसंबंधीयांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
कोविड-19 हे जीवनातील मोठे आव्हान, सामना करण्यासाठी नवीन व अभिनव उपायांची गरज- पंतप्रधान
वार्ताहर, कॅमेरापर्सन आणि तंत्रज्ञांचे अथक परिश्रम ही मोठी देशसेवाच- पंतप्रधान
माध्यमांनी सकारात्मक संवादातून निराशावाद आणि घबराट यांना आळा घालावा- पंतप्रधान
Posted On:
23 MAR 2020 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2020
कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न होणाऱ्या आव्हानांविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील प्रमुख हितसंबंधीयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
या साथीच्या आजारातील धोक्याचे गांभीर्य पहिल्या दिवसापासून ओळखल्याबद्दल आभार मानत, जनजागृतीची जबाबदारी उत्तम पद्धतीने निभावल्याबद्दल पंतप्रधानांनी वाहिन्यांचे कौतुक केले. देशभरात वार्ताकक्षात बसून तसेच प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन अविरत काम करणारे वार्ताहर, कॅमेरापर्सन, आणि तंत्रज्ञ यांच्या कामावरील निष्ठेची आणि वचनबद्धतेची त्यांनी प्रशंसा केली. ‘त्यांचे हे काम म्हणजे देशाची सेवाच आहे’, असेही ते म्हणाले. काही वाहिन्यांनी घरातूनच वृत्तनिवेदन करण्यासारखे जे अभिनव प्रयोग केले, त्यांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
“कोविड -19 हे आयुष्यातील कदाचित सर्वात मोठे आव्हान आहे” असे सांगत, “त्याचा सामना करण्यासाठी नवीन आणि अभिनव उपायांची आवश्यकता आहे”, असेही ते म्हणाले. आपल्यासमोर एक दीर्घ लढाई वाढून ठेवली आहे आणि त्यात सामाजिक ठिकाणी व्यक्ती-व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याविषयी जागरूकता पसरविणे अत्यावश्यक आहे, तसेच नवनवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णय याबद्दलची माहिती वाहिन्यांनी सोप्या भाषेत आणि त्वरित मात्र, व्यावसायिकतेचे भान राखून जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे.
“लोक बेसावध आणि बेफिकीर होणार नाहीत याची काळजी वाहिन्यांनी घेतली पाहिजे, मात्र त्याचवेळी निराशावाद आणि घबराट याला प्रत्युत्तर देणारा सकारात्मक संवादही साधला पाहिजे”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सर्व लढ्यामध्ये डॉक्टर आणि आरोग्यसेवक आघाडीवर असल्याने, त्यांचे मनोधैर्य व मनोबल उंच ठेवण्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
वृत्तवाहिन्या हे अभिप्राय देण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे व सरकार या अभिप्रायाच्या आधारे सतत काम करत असते. “प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन काम करणाऱ्या वार्ताहरांसाठी वाहिन्यांनी स्वतंत्र बूम माईक पुरवावेत आणि मुलाखती घेताना एक मीटर अंतर सांभाळण्याची काळजी घावी”, असेही त्यांनी सुचविले.
“वाहिन्यांनी शास्त्रीय अहवालांचा प्रसार करावा, तसेच चर्चांमध्ये माहीतगार व्यक्तींचा अंतर्भाव करावा, जेणेकरून अफवा आणि चुकीची माहिती पसरण्याला आळा बसेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी शिस्त पाळण्याचे महत्त्व अधोरेखित करत, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी सामाजिक ठिकाणी व्यक्ती-व्यक्तीमधील अंतराचे भान राखण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
सदर आव्हानाला तोंड देण्यासाठी पंतप्रधान घेत असलेल्या परिश्रमांबद्दल, तसेच त्यांच्या सक्षम नेतृत्वाबद्दल प्रसारमाध्यमांनी यावेळी त्यांचे आभार मानले. या साथीच्या आजाराविरुद्ध दोन हात करण्यासाठी पंतप्रधानांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची ग्वाही माध्यमांनी दिली.
‘पंतप्रधानांचे देशवासीयांशी जिव्हाळ्याचे नाते आहे’ असे नमूद करत माध्यमांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांना देशाशी वारंवार संवाद साधण्याची विनंती केली. तसेच, या संवादांमध्ये पंतप्रधानांनी आशादायक गोष्टींचा, खासकरून कोविड-19 मधून यशस्वीपणे बरे झालेल्यांच्या अनुभवांचा अंतर्भाव करावा, अशी विनंतीही त्यांनी केली. वार्ताहरांवर देखरेख करण्यासाठी आणि अफवांचा बंदोबस्त करण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस 24 तास डॉक्टर उपलब्ध असणारा एका स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी अपेक्षा माध्यमांनी व्यक्त केली. तसेच, 'प्रसारभारतीने दिवसातून दोन वेळा अधिकृत माहिती द्यावी आणि दूरचित्रवाणीच्या अन्य वाहिन्यांनी ती माहिती वापरावी', असेही सुचविण्यात आले.
या सूचना दिल्याबद्दल आणि महत्त्वाचे मुद्दे मांडल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. चलनी नोटांद्वारे होणारा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, डिजिटल पेमेंट अर्थात, पैसे भरण्याच्या डिजिटल पद्धतींविषयी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी वाहिन्यांना केले. शास्त्रीय आणि वैज्ञानिक वृत्तांकन करून, अंधश्रद्धांना आणि गैरसमजांना चाप लावण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी, सुयोग्य वेळेत आणि स्वतःहून माहितीचा प्रसार केल्याबद्दल आरोग्य मंत्रालयाचा ‘बीट’ सांभाळणाऱ्या पत्रकारांचे आभार मानले. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार वापरत असलेल्या श्रेणीयुक्त प्रतिसाद प्रणालीचा, तसेच, क्षमता-उभारणीसाठी सरकार करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचाही आढावा त्यांनी घेतला. आव्हानांचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या महासंचालकांनी सांगितले की, “तपासण्यांचे धोरण, श्रेणीयुक्त प्रतिसाद प्रणालीनुसार आखले आहे. तसेच, तपासण्याच्या किट्स ला मंजुरी देण्याची प्रक्रिया जलद करण्यात आली आहे.”
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री, आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांच्यासह इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि संपादक यांनी या संवाद कार्यक्रमात भाग घेतला.
B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar
(Release ID: 1607818)
Visitor Counter : 267