पंतप्रधान कार्यालय

लोकांनी घाबरून जावू नये आणि अनावश्यक प्रवास टाळावा: पंतप्रधानांचे आवाहन


सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्याचे आणि सूचनांचे पालन करावे - पंतप्रधान मोदी

विनाखंड, अथक सेवा देणारे सहकर्मचारी, कामगार आणि आयटी क्षेत्रातल्या व्यावसायिकांचे पंतप्रधानांकडून कौतुक

Posted On: 21 MAR 2020 11:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2020

 

देशात विषाणूचा प्रसार होत असताना लोकांनी घाबरून जावू नये आणि जर आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. सर्वांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे आणि सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही मोदी यांनी लोकांना सांगितले आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना आपल्या घरामध्येच वेगळे राहण्याचा (होम क्वारेंटाईन) सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यांनी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही मोदी यांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांनी आज व्टिटरच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे. या मालिका संदेशांमध्ये त्यांनी म्हटले आहे की,”कोणीही कधीही विसरू नका- सावधानता बाळगणे अतिशय गरजेचे आहे. घाबरून जावू नका! सर्वांनी केवळ आपल्या घरामध्येच राहणे आवश्यक आहे. आपण जिथे आहात, त्याच गावात, शहरामध्ये रहा. विनाकारण प्रवास करणे टाळा. कारण तुम्ही जो प्रवास करणार आहात, त्यामुळे तुम्हाला अथवा इतर कोणालाही मदत होणार नाही. अशा अत्यंत कठीण काळात आपल्याकडून केला जाणारा प्रत्येक लहानसा प्रयत्नही खूप व्यापक, सकारात्मक परिणाम करणारा ठरणार आहे.’’

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की,”आत्ता सर्व डॉक्टर आणि अधिकारी जे काही सल्ले देत आहेत, ते अगदी लक्षपूर्वक ऐकून, त्याचे काटेकोर पालन करण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे. ज्या लोकांना ‘होम क्वारेंटाईन’मध्ये राहण्यास सांगितले आहे, त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मी करतो. त्यामुळे आपल्याबरोबरच आपल्या मित्रांचे आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण होणार आहे.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या कार्यरत असलेले सहकारी नागरिक, सेवा प्रदान करणारे आयटी व्यावसायिक आणि कामगार वर्गाच्या कामाचे कौतुक केले आहे. कोविड-19 बरोबर दोन हात करण्यामध्ये आपण सर्वजण खूप महत्वपूर्ण भूमिका निभावत आहात. आगामी काळात, भविष्यात आपल्या कार्याचे स्मरण केले जाईल.

पंतप्रधानांनी एका व्टीटमध्ये म्हटले आहे की,”हे लोक नायक आहेत. हे महान अभूतपूर्व व्यक्ती आहेत. त्यांनी निभावलेली असामान्य भूमिका आगामी काळात कायमची आठवणीत राहील.’’

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की,”अगदी बरोबर! भारताला आपल्या आयटी व्यावसायिकांविषयी खूप अभिमान आहे. सहकारी नागरिकांना विनाखंड सेवा प्रदान करण्यासाठी हे व्यावसायिक अथक परिश्रम करीत आहेत. नवसंकल्पना शोधक आणि अत्यंत परिश्रम घेत असलेल्या या व्यावसायिकांच्या वर्गाला ‘कोविड-19’ बरोबर सामना करताना प्रमुख आणि महत्वपूर्ण भूमिका निभवावी लागणार आहे.”

 

 

 

 

 

 

S.Pophale/S.Bedekar/D.Rane

 



(Release ID: 1607576) Visitor Counter : 152


Read this release in: English