पंतप्रधान कार्यालय

औषध निर्मिती उद्योजकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

कोविड-19 साथ लक्षात घेता आरएनए चाचणी संचांची युद्धपातळीवर निर्मिती करण्याची पंतप्रधान मोदी यांची औषध उद्योजकांना सूचना

औषध उद्योगाला आवश्यक त्या घटकांचा, साहित्याचा पुरवठा सातत्याने करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध – पंतप्रधान

आवश्यक औषधांचा पुरवठा कायम ठेवणे त्याचबरोबर साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्याची आवश्यकता - पंतप्रधान

Posted On: 21 MAR 2020 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2020

 

देशात पसरत चाललेल्या कोविड-19 ची साथ लक्षात घेता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व औषध निर्मिती क्षेत्रातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

कोविड-19 चे आव्हान समर्थपणे पेलण्यामध्ये आणि या साथीला त्वरित आटोक्यात आणण्यासाठी औषध उत्पादक आणि वितरकांची अतिशय महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या उत्पादकांनी आवश्यक औषधांचा, वैद्यकीय संच आणि इतर वैद्यकीय साहित्याचा पुरवठा देशभर सुरळीत होत आहे, इतकंच पाहिलं पाहिजे असं नाही तर नवीन संकल्पना आणून काही नवा पर्याय मिळतो का हे पहावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

औषध निर्मिती उद्योगाला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आणि साहित्याचा (एपीआय) पुरवठा सातत्याने होईल, त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड पडणार नाही, यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. अशा संकटप्रसंगी ‘एपीआय’चा पुरवठा देशभरामध्ये विनाखंड होणे किती आवश्यक आहे, हेही मोदी यांनी अधोरेखित केले. अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय सामुग्री यांची देशांतर्गत उपलब्धता व्हावी यासाठी सरकारने अनुक्रमे 10,000 कोटी आणि 4,000 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

कोविड-19 साथ लक्षात घेता आरएनए चाचणी संचांची युद्धपातळीवर निर्मिती करण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी औषध आणि वैद्यकीय सामुग्री निर्मिती उद्योजकांना केली.

किरकोळ औषध विक्रेत्यांनी अत्यावश्यक औषधांचा पुरवठा कायम ठेवणे त्याचबरोबर साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्याची आवश्यकता असल्याचेही  पंतप्रधानांनी सांगितले. सध्याच्या काळात औषधांच्या मोठ्या साठ्यांचे वितरण टाळणे गरजेचं असल्याचं मोदी यांनी सांगितलं.

कोविड-19 चा प्रसार लक्षात घेता औषध क्षेत्रामध्ये विनाखंड काम केले जाणे गरजेचे आणि अपेक्षित आहे. अर्थात यासाठी कामगारांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्वांना आणि आवश्यक तिथं औषधे वेळेवर घरपोच मिळावीत यासाठी ही सेवा देणारी आदर्श यंत्रणा तयार केली जावी. तसेच विनाकारण गर्दी टाळण्यासाठी आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी डिजिटल पद्धतीने पेमेंट घेण्याची यंत्रणा तयार करावी. यामुळे विषाणू प्रसार कमी होण्यास मदत होईल, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

अशा संकटप्रसंगी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशभरात उत्तम व्यवस्था केली जात असल्याबद्दल औषध उत्पादकांच्या संघटनांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण देशभर अत्यावश्यक असलेली औषधे आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा विनाखंड केला जाण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे औषध निर्माता संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच कोविड-19 वर गुणकारी ठरणारी लस विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने औषध उद्योगासाठी जाहीर केलेल्या धोरणामुळे औषध क्षेत्राला चांगली बळकटी येईल आणि चालना मिळेल, असे मत औषध उद्योजकांनी व्यक्त केले.

औषध उद्योग ज्या समर्पण आणि बांधिलकीच्या भावनेने कार्यरत आहे, त्याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. त्यांच्यावर लोकांचा विश्वास असल्यामुळे अशा प्रसंगामध्ये लोकांना योग्य आणि शास्त्रीय माहिती देण्यासाठी औषध कंपन्याना  महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

या साथीच्या रोगाविरोधामध्ये सरकार सातत्याने अथक प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर विमानतळ, बंदरे  अशा स्थानांवर आवश्यक औषधांचा पुरवठा होत असल्याची खात्री करून घेतली जात आहे, अशी माहिती औषध पुरवठा विभागाच्या सचिवांनी यावेळी दिली. आरोग्य विभागाच्या सचिवांनी औषध निर्मिती संघटनेचे आभार मानले. आणि आत्तापर्यंत देशात कोणत्याही भागात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे आढळले नाही, असं सांगितलं. त्याचबरोबर सुरक्षेसाठी वापरले जाणारे मास्क आणि इतर वस्तूंच्या उत्पादकांच्या संघटनेबरोबर संयुक्त चर्चा करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी केंद्रीय जहाज, रसायन आणि खतं खात्याचे राज्यमंत्री, मुख्य सचिव, मंत्रिमंडळाचे सचिव, आरोग्य, वस्त्रोद्योग, औषध खात्यांचे सचिव आणि औषध निर्माण उद्योग संघटनेचे ज्येष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

औषध निर्माण क्षेत्राशी संबंधित इतर संघटनांचे प्रतिनिधी, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे प्रतिनिधी, टोरेंट फार्मास्युटिकल्स, बल्क ड्रग मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्री यांनी आज पंतप्रधानांबरोबर झालेल्या संवादामध्ये भाग घेतला.

 

 

M.Chopade/S.Bedekar/D.Rane(Release ID: 1607564) Visitor Counter : 114


Read this release in: English