शिक्षण मंत्रालय
उपलब्ध डिजिटल ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा पुरेपूर उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवावा - रमेश पोखरियाल ‘निशंक’
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्र्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे केले आवाहन
Posted On:
21 MAR 2020 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2020
कोविड-19 विरूद्ध खबरदारीचा उपाय म्हणून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या असून या काळात विद्यार्थ्यांनी उपलब्ध डिजिटल ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करून आपला अभ्यास सुरू ठेवावा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक' यांनी केले आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून पुरविल्या जाणाऱ्या विविध डिजिटल / ई-लर्निंग प्लॅटफॉर्मविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचे आवाहनही त्यांनी शैक्षणिक संस्थांना केले आहे. 22 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेल्या ‘जनता कर्फ्यू'चे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना केले.
शालेय शिक्षणासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे काही डिजिटल उपक्रम / प्लॅटफॉर्म खालीलप्रमाणे आहेतः
1 . दीक्षा-
यावर सीबीएसई, एनसीईआरटी आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांद्वारे तयार केलेल्या इयत्ता 12 वी साठी 80000 पेक्षा जास्त ई-पुस्तके आहेत आणि ती विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत. पाठ्यपुस्तकांवरील क्यूआर कोडद्वारे यातील मजकूर पाहता येऊ शकतो. हे ॲप आयओएस आणि गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते: संकेतस्थळ : https://diksha.gov.in or https://seshagun.gov.in/shagun
2. ई-पाठशाला:
या वेब पोर्टलमध्ये एनसीईआरटीने इयत्ता पहिली ते बारावीसाठी विविध भाषांमध्ये 1886 ऑडिओ, 2000 व्हिडिओ, 696 ई-बुक (ई-पब) आणि 504 फ्लिप बुक्स उपलब्ध केले आहेत. मोबाइल ॲप उपलब्ध आहे. संकेतस्थळ :http://epathshala.nic.in or http://epathshala.gov.in
3. नॅशनल रिपॉझिटरी ऑफ ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस (एनआरओईआर)
एनआरओइआर पोर्टलवर एकूण 14527 फाईल्स आहेत, ज्यात विविध भाषांमधील 401 संग्रह, 2779 दस्तावेज, 1345 इंटरॲक्टिव, 1664 ऑडिओ, 2586 छायाचित्रे आणि 6153 व्हिडिओ आहेत. संकेतस्थळ : http://nroer.gov.in/welcome
उच्च शिक्षणासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे प्लॅटफॉर्म खालीलप्रमाणे आहेत
स्वयं :
स्वयं हे राष्ट्रीय ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे ज्यात शालेय (इयत्ता नववी ते बारावी) आणि उच्च शिक्षणा (पदवी , पदव्युत्तर कार्यक्रम) साठी अभियांत्रिकी, मानववंशशास्त्र आणि सामाजिक विज्ञान, कायदा आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम यासह सर्व विषयांचे 1900 अभ्यासक्रम आहेत. स्वयंचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते पारंपरिक शिक्षणाशी एकात्मिक आहे. स्वयं अभ्यासक्रमांसाठी (जास्तीत जास्त 20% ) क्रेडिट ट्रान्सफर शक्य आहे. संकेतस्थळ : swayam.gov.in
स्वयंप्रभा
24/7 आधारावर 32 डी 2 एच दूरचित्रवाणी वाहिन्या शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करतात. या वाहिन्या डीडी फ्री डिश सेट टॉप बॉक्स आणि अँटेना वापरून संपूर्ण देशभरात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. वाहिन्यांचे वेळापत्रक आणि अन्य तपशील पोर्टलवर उपलब्ध आहे. या वाहिन्यांवर कला, विज्ञान, वाणिज्य, उपयोजित कला, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कायदा, औषध, कृषी विषयांचे शालेय शिक्षण (इयत्ता नववी ते बारावी) आणि उच्च शिक्षण (पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शिक्षक प्रशिक्षण) दोन्ही अभ्यासक्रम आहेत. संकेतस्थळ : swayamprabha.gov.in
वरील सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवेश / लॉग-इन विनामूल्य आहेत. या व्यतिरिक्त, विद्यार्थी 'एक भारत श्रेष्ठ भारत', 'स्वच्छ भारत अभियान', 'जल शक्ती अभियान', 'सिंगल यूज प्लॅस्टिक' वर बंदी आणि 'फिट इंडिया' कार्यक्रमांतर्गत घरी करायचे प्रकल्प घेऊ शकतात.
S.Pophale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1607539)
Visitor Counter : 215