पंतप्रधान कार्यालय
कोविड-19 संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी घेतली बैठक
Posted On:
18 MAR 2020 11:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2020
कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथे आढावा बैठक घेतली. या विषाणूचा संसर्ग निश्चित करण्यासाठीच्या चाचण्यांच्या सुविधा वाढविण्याबरोबरच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सध्या सुरु असलेली तयारी भविष्यात आणखी जोमाने करण्यासाठीच्या प्रयत्नांची या बैठकीत चर्चा करण्यात आली.
कोविड-19 च्या संकटाचा सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये अधिकाधिक व्यक्ती, स्थानिक समुदाय आणि संस्थांचा सक्रीय सहभाग मिळवण्याच्या मुद्यावर प्रधानमंत्र्यांनी जोर दिला. भविष्यात यासंदर्भात हाती घ्यायच्या उपक्रमांबाबत सखोल चर्चा करायची विनंती त्यांनी सर्व सरकारी अधिकारी आणि तंत्रज्ञांना केली.
कोविड-19 या रोगाशी सामना करण्यासाठी युद्धपातळीवर पहिल्या फळीत काम करीत असलेल्या सर्व राज्य सरकार प्रशासन, आरोग्य विभाग, निमवैद्यकीय कर्मचारी, लष्करी आणि निमलष्करी दले, हवाई वाहतूक विभाग, महानगरपालिका यात कार्यरत कर्मचारी आणि इतर सर्व सहभागी व्यक्तींबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
प्रधानमंत्री उद्या दि. 19 मार्च रोजी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या भाषणातून ते कोविड-19 रोगाशी संबंधित विविध मुद्द्यांबाबत आणि या रोगाशी सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांबाबत देशवासियांना माहिती देतील.
B.Gokhale/S.Chitnis/P.Kor
(Release ID: 1607082)
Visitor Counter : 199