पंतप्रधान कार्यालय
सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी प्रधानमंत्र्यांचे टेलिफोनद्वारे संभाषण
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2020 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2020
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे राजपुत्र, मोहम्मद बिन सलमान यांच्याशी टेलिफोनद्वारे संपर्क साधून वार्तालाप केला.
कोविड-19 या जागतिक महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी सखोल चर्चा केली. ज्या रोगाने जगातील लाखो लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, इतकेच नव्हे तर जगाच्या अनेक भागांमधील देशांच्या अर्थव्यवस्थांवर ज्याचे दुष्परिणाम झाले आहेत अशा या जागतिक आव्हानाचा संपूर्ण तयारीने सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
या संदर्भात, सार्क देशांच्या प्रमुखांदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा आयोजित करण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचा प्रधानमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.
कोविड-19 या जागतिक महामारीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी तसेच जगातील सर्व जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, जी-20 गटाचा विद्यमान अध्यक्ष असणाऱ्या सौदी अरेबियाने पुढाकार घेऊन जी-20 गटाच्या नेत्यांसाठी अशाच प्रकारचा कार्यक्रम आखायला हवा यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
या विषयासंदर्भात दोन्ही देशांमधील अधिकारी सतत एकमेकांच्या संपर्कात राहतील असा निर्णय प्रधानमंत्री मोदी आणि सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी घेतला.
B.Gokhale/S.Chitnis/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1606865)
आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English