आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19


देशात 73 रुग्ण, यापैकी केरळमधल्या तिघांची उपचारानंतर रुग्णालयातून मुक्तता

Posted On: 12 MAR 2020 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2020

 

जागतिक आरोग्य संघटनेने आता नोवेल कोरोना विषाणू आजार (कोविड-19) जागतिक साथीचा आजार म्हणून घोषित केला आहे. 114 देशांमध्ये कोरोनाचे 1,18,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत कोविड-19चे 73 रुग्ण आढळले आहेत. यापैकी केरळमधले तिघे जण बरे झाले असून, रुग्णालयातून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सातत्याने आढावा घेत आहेत. भारताने 8 जानेवारीपासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली असून, केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या साथीने अनेक प्रतिबंधात्मक पावले उचलली.

पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार, परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी, सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आणि कोविड-19 रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. या मंत्रिगटाच्या 6 बैठका झाल्या आहेत. काल संध्याकाळी झालेल्या बैठकीत मंत्रिगटाने काही महत्वाचे निर्णय घेतले.

  • सर्व व्हिसा (राजनैतिक, सरकारी, संयुक्त राष्ट्रे/आंतरराष्ट्रीय संस्था, रोजगार, प्रकल्प व्हिसा वगळता) 15 एप्रिल 2020 पर्यंत स्थगित करण्यात आले आहेत.
  • अनिवासी भारतीय कार्डधारक भारतात हवा तितका काळ राहू शकतात.
  • भारतात आधीच दाखल सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा वैध असून, ते ई-एफआरआरओच्या माध्यमातून जवळच्या एफआरआरओ/एफआरओशी संपर्क साधू शकतात.
  • परदेशी नागरिकाला अनिवार्य कारणासाठी भारतात प्रवास करणे आवश्यक असेल, तर त्याने जवळच्या भारतीय दुतावासाशी संपर्क साधावा.
  • चीन, इटली, इराण, कोरिया प्रजासत्ताक, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांचा प्रवास करु नये, असा सल्ला भारतीय नागरिकांना देण्यात आला आहे.
  • 15 फेब्रुवारी 2020 नंतर चीन, इटली, इराण, कोरिया प्रजासत्ताक, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना, भारतीय नागरिकांनाही किमान 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवले जाईल. 13 मार्च 2020 पासून हा निर्णय अमलात येईल.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 

 



(Release ID: 1606132) Visitor Counter : 221


Read this release in: English